अर्थशास्त्र
विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र अर्थशास्त्र – अर्थशास्त्र हा शब्द फार जुना आहे. या विषयावर संस्कृतमध्यें अनेक ग्रंथ आहेत. त्या सर्व ग्रंथांत चाणक्याचा ग्रंथ ( कौटिल्यनीति ) सुप्रसिद्ध आहे. हा ग्रंथ अलीकडेच सांपडला आणि त्याचा पद्धतशीर अभ्यास बराच झाला आहे, तरी अजून बराच व्हावयास पाहिजे आहे. राज्याचें बलाबल मोजण्यासाठीं अर्थशास्त्राचा उपयोग असे आणि याचें महत्त्व इतकें मोठें मानलें जात असे कीं, धर्माच्या खालोखाल हा पुरुषार्थ आहे, असें प्राचीन पंडीत समजत असत. अर्वाचीन अर्थशास्त्रचें स्थूल स्वरूप. – अलीकडे अर्थशास्त्र या शब्दाचा उपयोग “पोलीटिकल एकॉनमी” किंवा “एकानामिक्स” या शब्दांनी यूरोपीयास जो बोध होतो आणि त्यांस जें ज्ञानक्षेत्र त्या शब्दानीं दर्शविलें जातें, तें दर्शविण्यासाठीं लावतात. पाश्चात्त्यांनीं जी माहिती आणि जे सिद्धांत गोळा केले आहेत ते त्यांच्या विवेचनाच्या पद्धतींत न सांगतां येथें स्वतंत्रपणें व्यक्त केले आहेत आणि संज्ञालक्षणजाल बरेचसें टाकलें आहे. शब्दांच्या व्याख्या ग्रंथकारांच्या समजुतीप्रमाणें असतात आणि दुसर्यास त्या व्...