अर्थशास्त्र
अर्थशास्त्र – अर्थशास्त्र हा शब्द फार जुना आहे. या विषयावर संस्कृतमध्यें अनेक ग्रंथ आहेत. त्या सर्व ग्रंथांत चाणक्याचा ग्रंथ ( कौटिल्यनीति ) सुप्रसिद्ध आहे. हा ग्रंथ अलीकडेच सांपडला आणि त्याचा पद्धतशीर अभ्यास बराच झाला आहे, तरी अजून बराच व्हावयास पाहिजे आहे. राज्याचें बलाबल मोजण्यासाठीं अर्थशास्त्राचा उपयोग असे आणि याचें महत्त्व इतकें मोठें मानलें जात असे कीं, धर्माच्या खालोखाल हा पुरुषार्थ आहे, असें प्राचीन पंडीत समजत असत.
अर्वाचीन अर्थशास्त्रचें स्थूल स्वरूप.– अलीकडे अर्थशास्त्र या शब्दाचा उपयोग “पोलीटिकल एकॉनमी” किंवा “एकानामिक्स” या शब्दांनी यूरोपीयास जो बोध होतो आणि त्यांस जें ज्ञानक्षेत्र त्या शब्दानीं दर्शविलें जातें, तें दर्शविण्यासाठीं लावतात. पाश्चात्त्यांनीं जी माहिती आणि जे सिद्धांत गोळा केले आहेत ते त्यांच्या विवेचनाच्या पद्धतींत न सांगतां येथें स्वतंत्रपणें व्यक्त केले आहेत आणि संज्ञालक्षणजाल बरेचसें टाकलें आहे. शब्दांच्या व्याख्या ग्रंथकारांच्या समजुतीप्रमाणें असतात आणि दुसर्यास त्या व्याख्या कबूल नसतात आणि त्यामुळें भांडणें उत्पन्न होतात आणि तात्विक वादाचें वाङ्मय पुष्कळ वाढतें. तें कसे तें दाखवून शास्त्रांच्या संवर्धनाच्या ज्या पद्धति आहेत, त्याचे विवेचन अन्यत्र केलेच आहे. ( विज्ञानेतिहास प्र. १ पहा. )
अर्थशास्त्र हा व्यावहारिक विषय असल्यामुळें याविषयी जें वाङ्मय उत्पन्न होतें, त्यांत पुष्कळसें चालू आर्थिक प्रश्नांमुळें उत्पन्न होतें. ज्या ज्या वेळेस मनुष्यहिताचे जे प्रश्न असतात, त्यांसच प्राधान्य येतें असें नाही, तर लेखक ज्या वर्गाचा असेल त्या वर्गापुढें असलेल्या प्रश्नांस प्राधान्य येतें व त्यांवर ग्रंथ उत्पन्न होतात. या प्रकारच्या परिस्थितींमुळें नेहमीं अर्थशास्त्रीय वाङ्मयाच्या इतिहासाबरोबर त्या इतिहासाच्या स्पष्टीकरणार्थ तत्कालविषयक आर्थिक परिस्थितीचेंहि स्थूल विवेचन करावें लागतें. आर्थिक परिस्थिति वाङ्मस्वरूपच निर्णीत करते असें नाहीं, तर त्या वाङ्मयांत व्यक्त होणार्या मतांसहि कारण होते; मात्र विचारांस कारण केवळ परिस्थितीच होत नाहीं, वाङ्मयामध्यें जे विचार द्दष्टीस पडतात त्यांमध्यें कांहीं अंशी सातत्य किंवा परंपरा दृष्टीस पडते. अर्थशास्त्रीय वाङ्मयाचा इतिहास देतांना हें सातत्य स्पष्ट केलें पाहिजे. वाङ्मयांतील विषयांचें स्वरूप ठरविण्यास मुख्य कारण शासनसंस्था होय. अर्थशास्त्राविषयीं असें सांगतां येईल कीं, जोपर्यंत राज्यकर्ते प्रजेचा व्यापार वाढविणें, देशांत निरनिराळे धंदे उत्पन्न करणें, देशाची उत्पादनशक्ति वृद्धिंगत करणें व या गोष्टी आपल्या करांचें उत्पन्न वाढविण्यास आवश्यक आहेत, हें समजून त्याप्रमाणें आपली राजनीति बनविण्याचा प्रयत्नास लागले नाहीं, तों पर्यंत अर्वाचीन प्रकारच्या अर्थशास्त्रास प्रारंभहि होत नाहीं. चाणक्याचें अर्थशास्त्र आणि जर्मन लोकांचें कामेराल शास्त्र ही एकस्वरूपीच होतीं. हिंदुस्थानांतील राज्यकर्ते अनेक धंदे करीत, खाणी, शेतकी हीं सुद्धां करीत, व सावकारीहि करीत. ही राज्यपद्धषत आपणांस चंद्रगुप्ताच्या काळीं जशी दिसते, तशीच अजूनहि दिसते. मुसुलमानी अमदानी व मराठेशाही व इंग्रजी यांत कांहीं थोडेंबहूत फरक असतील; पण तत्वत: फारसे नाहींत. हिंदुस्थानाच्या राज्यकर्त्यांना स्वत: धंदा करण्याची जोपर्यंत जरूर भासते तोंपर्यंत त्यांचें लक्ष देशाच्या उन्नतीकडे पूर्णपणें जाणार नाहीं. कारण हे सरकार उत्पन्नासाठीं पूर्णपणें करावर अवलंबून नाहीं. लोकांची प्रगति व्हावी आणि त्यांच्या नफ्यांतून आपण कर घ्यावा, या कल्पनेऐवजीं जमीनदारी करण्यांत सरकार गढलें आहे. यामुळें येथील सरकारी सावलीखालीं वाढलेलें वाङ्मय कामेराल पद्धतीचे आहे व खरें अर्थशास्त्रीय नाहीं. येथें अर्थशास्त्रीय वाङ्मय न वाढण्याचें कारण येथील लोकमतास सरकार अजूनहि फारसें जबाबदार नाहीं, आणि १९१९ पूर्वीं जर लोकमताची किंमत सरकारी शासनपद्धतींत कांहीं एक नव्हती. फक्त सरकारी अधिकार्यांवर गोळया झाडण्याकडे किंवा इंग्रजांवर बाँबगोळे फेंकण्यास उत्तेजन देण्याकडे एतद्देशीय लेखकवर्ग प्रवृत झाला तरच त्याच्याकडे लक्ष देण्याचें प्रयोजन येथील बेजबाबदार सरकारास असे. अशा स्थितीत देश्य अर्थशास्त्राची वाढ कशी होणार. इंग्लंडांतील किंवा यूरोपांतील अर्थशास्त्रावरील पुस्तकांचें वेदांताप्रमाणें अध्ययन करावें, अशीच परिस्थिति कालपर्यंत होती. देशी लोकांकडून अर्थशास्त्रविषयक वाङ्मय आतां कोठें सुरू होऊं लागलें आहे.
क्यामेराल शास्त्र आणि पोलिटिकल एकानमी यांमध्यें फरक हा आहे कीं, कामेराल शास्त्राचें ध्येय, शासनसंस्थेची दौलत वाढविणें हें होतें, आणि पोलिटिकल एकॉनमीचा हेतु शासनसंस्था श्रीमंत करण्याचा नसून शासनसंस्था हें ज्या राष्ट्राचें किंवा संस्थानचें यंत्र आहे तें राष्ट्र अथवा संस्थान श्रीमंत करण्याचा आहे. राजाची दौलत रूपये आणे पैनी जशी सहज मोजतां येते, तशी सर्व राष्ट्राची मोजणें सोपें नाहीं आणि दोन राष्ट्रांमध्यें कोणतें राष्ट्र अधिक संपत्तिमान आहे हें पहाणें, हें दोन सरकारांतील कोणतें सरकार अधिक श्रीमंत आहे हें पहाण्यापेक्षां अधिक कठिण आहे. चाणक्यादिकाचें अर्थसास्त्र आणि अर्वाचीन अर्थशास्त्र यांमध्यें फरक हा आहे कीं, चाणक्याचें अर्थशास्त्र कामेराल शास्त्र होईल, तर अर्वाचीन अर्थशास्त्र पोलिटिकल एकॉनमी होय.
चाणक्याच्या काळांत जी अर्थशास्त्रीय प्रगति दिसत आहे तिचा प्रकर्ष पुढील काळांत झालेला दिसत नाहीं. मुसुलमानी स्वारीच्या निकट काळांत हिंदु राज्यामध्यें राजे लोकांचें शासनशास्त्र किती व्यापक होतें हें कळत नाहीं. दंडीच्या दशकुमराचरित्रांत शासनशास्त्रीय उल्लेख आहेत; पण राजे लोकांस अनुरूप अशा शास्त्रांचा विकास झालेला दिसत नाहीं. तो झाला असता तर देशवर्णनविषयक आणि इतिहासविषयक अनेक पुस्तकें अस्तित्वांत असतीं. कनिष्कादि राजांनीं सरकारी नाण्याचा प्रघात आणला आणि खासगी नाण्यांच्यां ऐवजीं सरकारी नाणीं झालीं एवढा मात्र परकीय स्वार्यांचा परिणाम झाला, असें म्हणतां येईल. राजे लोकांनीं खासगी धंदे करूं नयेत, यासारखें तत्व कल्हणाच्या राजतरंगिणींतून दिसून येतें. त्यानें शेतकी करणार्या राजावर कडक टीका केली आहे. येथील सामाजिक आयुष्यक्रमामध्यें यूरोपांतील सर्फडमसारखीं घातुक व्यंगें नव्हतीं किंवा फ्रान्समधील गिल्ड पद्धतीसारखी पद्धति नव्हती; पण जातिभेद होताच आणि तो समाजांत प्रत्येकानें गुणकर्माप्रमाणें स्थान पटकावावें, या योजनेस अपकर्षक होता. मुसुलमान राजंनीं येथें ज्या गोष्टी केल्या त्यांत आर्थिक महत्त्वाच्या म्हटल्या म्हणजे खडया फौजा ठेवल्या आणि कांहीं अंशी अधिक बलवान राजसत्ता उत्पन्न करून देशांतील आर्थिक आयुष्यक्रमास स्थैर्य उत्पन्न केलें असावें; पण त्यांची शहरें हिंदु राजांच्या शहरांपेक्षां श्रमविभागास किती अधिक उत्तेजन देणारी होतीं हें समजत नाहीं. गोवळकोंडा हें मोठें भरभराटीचें शहर होतें असें म्हणतात; पण त्याच्या चतुःसीमा लक्षांत घेतल्या म्हणजे आजच्या हैदराबादेच्या एकचतुर्थांश तें असावें असें वाटतें. विजयानगर गोवळकोंडयापेक्षां कमी भरभराटलेलें नसावें.
मुसुलमानी संपर्काचा देशाच्या आर्थिक स्थितीवर कांहींच परिणाम झाला नसणें अशक्य आहे. जेथें रस्ते नसतील तेथें अनेक ठिकाणीं मुसुलमान राजांनीं रस्ते बांधले ते लष्करी योजनेसाठीं असतील पण त्यांचा व्यापारावर परिणाम झाल्यावांचून राहिला नसेल. मुसुलमानांनीं ज्या वस्तूंचा प्रचार केला त्यांत कागद, व गुलाबासारखीं फुलें या येतील. पाश्चात्य संसर्गाचा परिणाम मात्र मुसुलमानी अमदानींत झाला असावा. पोर्तुगीजांमार्फत बर्याच नवीन गोष्टी देशांत आल्या. तंबाखु, मिरच्या, रताळीं, बटाटे व मका हीं पिकें देशात रुजलीं. म्हणजे पंधराव्या शतकाच्या अंताला जे भौगोलिक शोध झाले त्यांचा हिंदुस्थानाच्याहि आर्थिक आयुष्यावर परिणाम झाला. मुसुलमानी अमलाखालीं अनेक चैनीच्या व सुखाच्या गोष्टी देशांत प्रसृत झाल्या असतील. मेज, खुर्ची इत्यादि फारसी शब्द, घरांतील सोयीची व सुखाची कल्पना हिंदुंपेक्षां अधिक असावी असें दाखवितात. संस्कृतमध्यें वेदकालापासून आसंदी म्हणून एक आसनवाचक शब्द आहे. पण या आसंदीचा गृहांतून प्रवेश किती झाला असेल याची शंकाच आहे.
मुसुलमानी अमदानींत सौख्याच्या वस्तू पुष्कळ वाढल्या. मराठेशाहींतील अर्थशास्त्र कसें काय होतें हें आज सांगतां येत नाहीं. शाहूच्या मृत्यूनंतर शासनसंस्था मोठया करामतीनें पेशव्यांनीं टिकविली ही गोष्ट खरी पण आर्थिक विकासाकडे त्यांचें लक्ष फारसें नव्हतें, किंवा तें देण्यास त्यांस अवकाशच नव्हता. युद्धोपयोगी चिजा देखील करण्याकडे फारसें लक्ष पेशव्यांनीं दिलें नाहीं. सर चार्लस मालेट यांनीं मराठे सरकारच्या अर्थशास्त्रावर अशी टीका केली आहे कीं, मराठे सरकारचें अर्थशास्त्र म्हणजे कंजूषपणा. त्यामुळें कलाकौशल्याची वृद्धि झाली नाहीं. मुसुलमानांचें अर्थशास्त्र मराठयांच्या अर्थशास्त्रांपेक्षां उंच प्रतीचें होतें, ते खर्च करीत त्यामुळे उद्योगवृद्धि होई आणि त्यामुळें पुन्हां सरकारी तिजोरीस मिळकत होई. परंतु ब्राम्हणाच्या तिजोरींत गेलेला पैसा बाहेरच पडत नसे असें त्यांचें म्हणणें आहे.
पाश्चात्त्यांचा अर्थशास्त्रावर जो अभ्यास झाला आहे त्याचें सामान्य स्वरूप येणेंप्रमाणें: -
एका शासन सत्तेखालीं असणारीं राष्ट्रें हा त्यांचा इष्टवर्ग असून त्या राष्ट्रांचा उत्कर्ष कसा काय होईल त्यासंबंधानें त्यांनीं विचारपरंपरा निर्माण केली. संस्थानांच्या मुत्सद्यांनीं आपल्या प्रजेचा व्यापार वाढविण्यासाठीं, कलाकौशल्य वाढविण्यासाठीं किंवा इतर दुसर्या प्रकारची संपत्ति वाढविण्यसासाठीं संस्थानांनीं काय करावें, कोणत्या कृत्याचे परिणाम काय होतील याविषयीं तात्त्विक विवेचन आणि शासनविषयक धोरण यांची संगति लावण्यासाठीं प्रयत्न केला आहे. जर्मन लोकांची `नाशनल ओकोनमी’ आणि इंग्रजांची पोलिटिकल एकॉनमी ह्या दोन विचारपद्धतीचें उद्दिष्ट हेंच आहे.
शास्त्राचें जें वर्धन होतें तें कांहीं व्यावहारिक कारणामुळें होत असतें; समाजांतील एकंदर क्रियांचा कार्यकारणभाव ओळखण्यासाठीं प्रवृत्ती होते, तिच्या मुळाशीं त्या ज्ञानाचा व्यवहारांत उपयोग हें प्रयोजन मोठें असतें. इष्ट वर्गाचें हित लक्षांत ठेवून त्याचें संवर्धन करण्यासाठीं मनुष्य पद्धतशीर विचार करूं लागतो आणि या प्रकारच्या प्रयत्नामुळें समाजांतील क्रियांचे पृथक्करण, वर्गीकरण, आणि अन्योन्याश्रय ह्यांचा आणि दोन निराळया परिस्थितींतील कार्यकारणभावाचा विचार होऊं लागतो. याप्रमाणें पाश्चात्य ग्रंथकारानें समाजांतील व्यवहारांचें पृथक्करण आणि निरनिराळया स्थितीसंबंधानें कार्यकरण याचा बराच अभ्यास केला आहे. त्याप्रमाणें त्यांनीं ज्या शास्त्रीय पद्धतीचा उपयोग करून आपल्या उत्कर्षाकरितां जीं धोरणें उपदेशिलीं तीं केवळ स्थानिक आणि विशिष्ठ काळीं आणि परिस्थितींत उपयोगी पडावयाची. तथापि त्यावर जो अन्योन्याश्रयाचा तात्विक अभ्यास झाला तोच केवळ शास्त्राचा भाग होय. प्रकृत प्रश्नाला सोडून त्यांनीं शोधलेले कार्यकारणसंबंधाचें जें ज्ञान पैदा केलें आहे त्याचें एकीकरण केलें असतां तो समुच्चय फार मोठा व्हावयाचा नाहीं, व अभ्यासकाला तत्त्वें एकीकडे काढून ठेविलीं असतां उपयोगीं पडावयाचीं नाहींत. ज्याप्रमाणें एखाद्या कायदेपंडितास कायदा समजून सांगण्याकरितां तो विशिष्ठ परिस्थितीशीं सबंद्ध असाच घ्यावयाचा असतो, त्याप्रमाणेंच अर्थशास्त्राचे पाश्चात्यांचे नियम “केस लॉ” म्हणजे विषिष्ठप्रसंगानुरूप झालेले नियम असे समजूनच घेतले पाहिजेत.
क्रियांच्या अन्योन्याश्रयांचे जे सिद्धांत प्रथम निघाले ते केवळ प्रवृत्तिदर्शकच असावयाचे. उदाहरणार्थ मागणी मोठी असली आणि पुरवठा कमी असला म्हणजे किंमत वाढते एवढेंच सांगणें झालें म्हणजे, केवळ आपणांस प्रवृत्तिच समजली. तथापि आपणांस या गोष्टीचें ज्ञान अधिक सूक्ष्म पाहिजे. पुरवठा पूर्वींच्या पाऊणपट झाला तर परिणाम दोन होणें शक्य आहे (१) किंमती वाढणें आणि (२) मागणीच कमी होणें. पुरवठा कमी झाला तर प्रथमच किंमती वाढतील. परंतु त्यामुळें मागणी अधिक नियमित होईल व त्यामुळें वस्तूची किंमत शेकडा ३३ १/३ न वाढतां कमीच वाढणें शक्य आहे. तर असें खरोखर वाढतें किती हें बाजारांतील आंकडे खरोखरच घेऊन ठरवावें लागणार आणि अशा तर्हेचा अभ्यास वस्तुस्थितीचे आंकडे घेऊन करूं लागलें तर आपलें ज्ञान प्रवृत्तिविषयक न राहतां त्या प्रवृत्तीचें परिणाम देखील समजेल तर या विषयांचें ज्ञान केवळ प्रवृत्तीचें करण्याऐवजीं परिणामात्मक करावें म्हणून अभ्यास अवश्य आहे. ज्ञान परिणामात्मक करण्यासाठीं आंकडेशास्त्राचा उपयोग पाश्चात्यांनीं केला आहे. ( आंकडेशास्त्र पहा )
सर्व उद्यमास लागू पडणार्या किंवा उपयोगी पडणार्या ज्या गोष्टी समाजांत दिसून येतात अशा गोष्टी कोणत्या, असा विचार करून भांडवल, मजुरी, योजकाचे परिश्रम इत्यादि घटक शोधून काढिले आहेत आणि त्यांचें स्वरूप काय ? त्यांचा परस्परांशीं संबंध काय ? वस्तूला किंमत आणि महत्त्व जें येते तें कशामुळें येतें ? याविषयीं त्यांच्यामध्यें तात्त्विक चर्चेचे देखील ग्रंथ आहेत आणि या प्रकारच्या पृथक्करणांत व घटकांचा परस्पर संबंध लावण्यांत मतभेद किंवा विचारभेद दृष्टीस पडतात. या प्रकारच्या विवेचनास एकानामिक थिअरी असें म्हणतात. अर्थशास्त्रामध्यें जीं निरनिराळीं मतें आहेत किंवा विचारसंप्रदाय आहेत त्या विचारभेदांच्या मूळाशीं एक तर विज्ञानरचनाविषयक मतभेद असेल किंवा इष्टवर्गमूलकभेद असेल. इष्टवर्गाहितसंबंधाचे मतभेद जेव्हां ज्या मानानें कमी कमी होतील तेव्हां तो केवळ शास्त्ररचनाविषयक व चिज्ञानविषयक मतभेद होय. परंतु मतभेदाचें कारण आपल्या इष्टवर्गविषयक हिताची भावना जेव्हां असतें तेव्हां कांहीं वर्गविषयक विचारसंप्रदाय निर्माण होतात. त्या तर्हेचें विचराभेद मुख्यत: येणेंप्रमाणें: -
समाजसत्तावाद विरुद्ध व्यक्तिसत्तावाद. समाजामध्यें जें द्रव्य उत्पादन होतें त्या द्रव्योत्पादनाचा मोठा वांटा कोणी घ्यावा ? तो मजुरांनी घ्यावा अगर भांडवलवाल्यांनीं घ्यावा ? या तर्हेचा वाद उत्पन्न होऊन त्याचें परिणत स्वरूप समाजानें माल उत्पन्न करावा आणि परिश्रमाचा फायदा सर्व समाजाला द्यावा, अशा तर्हेची विचारमालिका सुरू होते ती विचारमालिका केवळ विज्ञानविषयक नाहीं. यांतील मतभेद हा समजुती गैरसमजुतीवर नाहीं तो इष्टवर्गहित भावनेवर रचला आहे. ज्या वादविवादांत विशेष भावनायुक्त विवेचन दृष्टीस पडतें, तें वाङ्मय इष्टवर्गविषयक हित साध्य करून घेण्याकरितां निर्माण झालेलें होय.
राष्ट्रीय अर्थशास्त्र आणि जागतिक अर्थशास्त्र असेहि भेद झाले आहेत. पहिले अर्थशास्त्र म्हणतें कीं प्रत्येक राष्ट्राचें अर्थशास्त्र निराळें आणि जगाचें अर्थशास्त्र निराळें. कित्येक ग्रंथकार असें म्हणतात कीं, अर्थशास्त्र हें सर्व जगाला लागू पडणार्या नियमांचें आहे, त्यांत राष्ट्राराष्ट्रांचा संबंध कांहीं नाहीं. एखाद्या राष्ट्रानें काय करावें यांची विचारमालिका ज्यांत असेल तें शास्त्र नाहीं. शास्त्र म्हटलें म्हणजे जागतिक सिद्धांताचें होय. ज्या वेळेस वाद उपस्थित होत. त्यावेळेस वादाच्या प्रसंगीं परस्पराविरुद्ध पक्षांत जीं भांडणे लागत असत त्यांचीं कारणे बरीचशीं संकीर्ण होतीं. शास्त्र हें नांव कोणच्या प्रकारच्या विचरामालिकेस द्यावें यासंबंधानें अनिश्चय हें एक कारण होतें व आपल्या आवडत्या परिश्रमास महत्त्व पावलेलें नांव द्यावें ही भावना अभ्यासकांत असतें हें दुसरें कारण होतें. तिसरें कारण असें कीं “सर्व जग हा एकच समाज आहे” आणि “अर्थशास्त्र जागतिक आहे” असें उदार मतानें प्रतिपादन करणें अत्यंत बलवान् व पुढें गेलेल्या समाजासच हितावह असतें; व त्या समाजांतील लोक विश्वव्यापी किंवा जगद्व्यापी तत्वज्ञानाच्या गप्पा करूं लागले म्हणजे उद्योगधंद्यांत मागें राहिलेल्या देशांतील तत्त्वज्ञांस असें वाटूं लागतें कीं, हे दुसर्यास खावून लठ्ठ बनलेले चोर जगद बंधुत्वाचें पांडित्य करीत आहेत आणि इतरांकडून आत्महित साधण्यासाठीं प्रयत्न बिघडविण्यासाठीं हें जागतिक तत्त्वज्ञानाचा आव घालीत आहेत. अशा तर्हेच्या आत्महित हेतूमूलकतेचा जेव्हां संशय उत्पन्न होतो तेव्हां विशिष्टविचारपद्धतीला शास्त्र म्हणून मान्यता मिळण्याचा संभव कमी होतो. अर्थशास्त्राच्या इतिहासांत जागतिक अर्थशास्त्र बोधणार्या इंग्रज अर्थशास्त्रकारांच्या आणि त्यांचीं पुस्तकें वाचून पांडित्य करणार्या शिक्षकांच्या आणि लेखकांच्या विरुद्ध अमेरिका व जर्मनी येथील शास्त्रज्ञानीं स्वार्थमूलकतेचा आरोप करणारे आक्षेप काढले आहेत. तसल्याच प्रकारच्या आक्षेपांचा ध्वनि हिंदुस्थानांतहि गेल्या दशकापर्यंत निघत असे.
सध्यां अर्थशास्त्राचा अभ्यास अनेक तर्हेनें व अनेक क्षेत्रांत होत आहे, त्याचें सामान्य स्वरूप स्पष्ट करणें जरूर आहे. अर्थशास्त्राच्या अभ्यासाचें साहित्य जें सध्यांचा एकंदर मनुष्यसमाज, त्याची सांपत्तिक स्थिति, त्यांचा अन्योन्याश्रय, त्यांत प्रत्येक ठिकाणीं दृष्टीस पडणारे श्रमविभाग, मनुष्यमात्राच्या परिश्रमानें उत्पन्न झालेल्या द्रव्याचें मापन इत्यादि गोष्टीची माहिती हा खुर्चीवर बसणारा व ग्रंथ लिहिणारा शास्त्री मिळवीत नाहीं. या प्रकारचें साहित्य जमविणें हें कार्य सरकार अगर मोठमोठया संस्थांचें असतें. अर्थशास्त्राच्या पूर्वीं जे ग्रंथ झाले त्यावेळीं ह्या साहित्याची अत्यंत अल्पता असे. सध्यां हें ज्ञान पुष्कळच वृद्धिंगत झालें आहे. अर्थशास्त्राचा अध्यापक केवळ या प्रकारच्या साहित्याचा अभ्यास करून आपला निर्णय काढीत असतो.
सर्व जग आर्थिकदृष्टया एक समाज आहे असें धरून त्याचा अभ्यास पद्धतशीर करण्याकडे अजून जितकें लागावें तितकें लक्ष लागलें नाहीं, आणि या विषयावर चांगले ग्रंथ झाले नाहींत. याचें कारण असें कीं, सर्व जगाबद्दल जबाबदार अशी सत्ता नाहीं, आणि त्यामुळें जगाचें आर्थिक धोरण ठरविलें जात नाहीं; असें आहे तरीहि जागतिक अर्थशास्त्रास जागा आहे. ज्याप्रमाणें ज्या एखाद्या भूभागांत स्थिर शासनसत्ता नसतें तेथें देखील निरनिराळया व्यक्तीमध्यें आर्थिक क्रिया असतातच, आणि प्रत्येक मनुष्य आपापलें वर्तन ठरवितो आणि त्याच्यायोगानें स्पर्धेचें किंवा अंतर्गत अन्योन्याश्रयाचे नियम निघतातच. निरनिराळीं राष्ट्रें आपापलीं इतरांशीं वागावयाची व्यवहारनीति ठरवितात. त्या राष्ट्रीय नीतिनियमांच्या व धोरणांच्या समुच्चयेंकरून जागतिक व्यवहारांतलें कांहीं नियम उत्पन्न होतात. निरनिराळे देश हे कांहीं अंशीं जगाचे निरनिराळे अवयव आहेत आणि त्यांमध्यें अन्योन्याश्रय उत्पन्न झाला आहे. जगांतील स्पर्धा व अन्योन्याश्रय ही अवगमिणें हें जागतिक अर्थशास्त्राचें कार्य होय. जागतिक अर्थशास्त्र तात्त्विक विचार सोडून जेव्हां कर्तव्यक्षेत्रांत उतरतें तेव्हां, आपल्या देशाव्यतिरिक्त इतर देशांची सुधारणा कशी करतां येईल इकडे तें लक्ष देतें. प्रत्येक देशांतील सरकारचे आर्थिक दृष्टया मोठें कार्य असतें. सरकार केवळ न्याय व संरक्षण एवढेंच करीत नसून शिक्षणाचें कार्य करतें. ज्या सुधारणांच्या योगानें देशाची समृद्धता वाढेल पण पैसे घालणाराला ताबतोब फायदा होणार नाहीं अशा गोष्टीहि सरकार करतें. नद्यांनां धरणें बांधून पाणी अडवणें आणि त्याचा शेतकीकडे उपयोग करणें व त्या शेतांवर पट्टी वाढवून धरणांचा खर्च वसूल करणें यांसारख्या गोष्टींस मोठमोठया रकमा खर्च कराव्या लागतात. ज्या सुधारणांनीं प्राप्ती कालांतरानें होईल अशा अन्य देशांत सुधारणा करण्याकडे एखाद्या देशाचें भांडवल खर्च होणें शक्य आहे काय ? ज्याचा मला फायदा नाही त्याबद्दल मी खर्च कशाला करूं ही मनुष्याची वृत्ति असते तीच राष्ट्रांतहि असावयाचीच. परकीय देशांतील शिक्षणासाठीं लोक कितपत खर्च करतील याविषयीं देखील असें म्हटलें पाहिजे कीं, परक्या देशांत शिक्षणासाठीं पैसा खर्च करण्याची प्रवृत्ति थोडी थोडकी नाहीं. प्रत्यक्ष शिक्षणासाठीं जरी पैसा बेतानेंच खर्च केला जातो तरी ख्रिस्तीसंप्रदायाच्या प्रसाराच्या निमित्तानें पुष्कळच पैसा खर्च होतो.
निरनिराळया देशांतील मजूर, भांडवल आणि जमीन यांचा चढाओढीच्या तत्त्वानें उपयोग व्हावयास अडचणी अनेक आहेत. भांडवलवाले परक्या देशांत भांडवल फारसें घालूं इच्छीत नाहींत, आणि निरनिराळया देशांतील शासनसंस्था परक्या देशांतील भांडवल आपल्या देशांत येऊं देण्याविषयीं कांहीं अंशीं साशंक असतात. परक्या देशांतील भांडवल घेतलें आणि तें वेळेवर फेडतां आलें नाहीं म्हणजे तें पुष्कळदां स्वातंत्र्य नाशास कारण होतें असा दुर्बल देशांचा अनुभव आहे. भांडवलवाला वर्ग आपल्या सरकारचें राज्य जेथें असेल आणि त्यामुळें त्यास जेथें सुरक्षितता वाटेल अशा ठिकाणींच भांडवल पाठवूं इच्छितो. इतक्या अडचणी आहेत तरी देखील निरनिराळया देशांत परक्या देशांतील भांडवल थोडेथोडकें आलें नाहीं. इंगलंडातील भांडवलानें वसाहती व हिंदुस्थान यांत आगगाडया बांधल्या. हिंदुस्थानाचा बाहेर देशाशीं व्यापार करविणारीं जहाजें परक्या भांडवलाचींच आहेत. हिंदुस्थानांतील खाणी खणण्यास बरेंचसे भांडवल परकें आलें आहे आणि त्या भांडवलावर हिंदुस्थानाचा आर्थिक विकास झाला आहे. येथील गिरण्यांपैकी देखील बर्याच गिरण्या परकी भांडवलावर चालल्या आहेत. हिंदुस्थान सरकारची जगांतील रोकड बाजारांत इभ्रत, दक्षिण अमेरिकेतील अनेक स्वतंत्र राष्ट्रांहून अधिक आहे, आणि या देशानें बाहेरचा पैसा स्वत:च्या सुधारणेसाठीं ओढण्याचें कार्य हिंदुस्थाननें इंग्रजी नेतृत्वाखालीं चांगल्या तर्हेनें केलें आहे. भौतिक सुधारणेसाठीं एका देशांतील पैसा दुसर्या देशांत जातो तो व्याजाच्या आशेनें जातो. पण शिक्षणासाठीं पैसा जातो तो देखील अर्थशास्त्राचाच भाग होय. राष्ट्रांत दानशक्ति व्यवस्थित होऊन दानमहत्त्व ऊर्फ समाजव्यंगनिवारणमहत्त्व वाढत आहे त्याबरोबर दानसंस्था अतिराष्ट्रीयहि होत आहे, आणि सर्व जग मिळून एक समाज आहे ही कल्पनाहि त्याबरोबर वाढत आहे. हिंदुस्थानांत जेव्हां दुष्काळ पडला होता तेव्हां जगांतील सर्व राष्ट्रांनीं हिंदुस्थानसरकारास दुष्काळनिवारणार्थ कामें उघडण्यासाठीं वर्गणी पाठविली, आणि जपानमध्यें धरणीकंपाने टोकिओ, याकोहामा हीं शहरें १९२३ च्या उत्तर भागांत उध्वस्त झाली तेव्हां सर्व जगानें मदत केली, व हिंदुस्थानानेंहि या बाबतींत माघार घेतली नाहीं. ज्या वेळेस या प्रकारचे कृत्य लोकांकडून होतें त्या वेळेस तें दानस्वरूपी धार्मिक कृत्य म्हणून होतें हें खरें. पण ज्या राष्ट्रांचा आपत्तींत असलेल्या राष्ट्रांशीं व्यवहारसंबंध अधिक असतो त्या राष्ट्रांकडून मदत अधिक होते ही गोष्ट लक्षांत घेतली म्हणजे अतिराष्ट्रीय दानास देखील व्यवहारबुद्धि कारण होते असें म्हणावें लागेल.
जागतिक अर्थशास्त्रावर पद्धतशीर विवेचन होण्यास सुरूवात जरी झाली नाहीं तरी येत्या एक दोन दशकांत या दिशेनें हें शास्त्र बरेंच वृद्धिंगत होईल असा अजमास करण्यास जागा आहे.
अर्थशास्त्राचा इतिहास — याची मांडणी आपण येणेंप्रमाणें करूं. प्राचीन भारतीय अर्थशास्त्राकडे प्रथम लक्ष देऊन मग मराठयांच्या अर्थशास्त्राकडे लक्ष देऊं आणि यानंतर पाश्चात्यांच्या विकासाकडे लक्ष देऊं आणि त्यानंतर आता तयार होत असलेल्या भारतीय अर्थशास्त्राकडे लक्ष देऊं.
संस्कृत ग्रंथकारांचें अर्थशास्त्र. – “अर्थशास्त्र” या नांवाखाली भारतीय लोक व्यावहारिक जीविताशी ज्यांचा संबंध पोचतो अशा सर्व उपदेशपर ग्रंथांचा व शिकवणींचा समावेश करितात. व्यावहारिक जीवितांत कला, गृहव्यवस्था कारभार आणि मुख्यत्वेंकरून राजकारण यांचा अंतर्भाव होतो. अर्थशास्त्राची अति महत्त्वाची शाखा राजकारणाची असून, ती स्वतंत्र शास्त्रांत गणली जाते; तिला “नीतिशास्त्र” असें नांव आहे. राजाला सुद्धां कलारचना, आर्थिक स्थिति व कारभार यांचें ज्ञान अत्यवश्यक आहे व तें राजकारणाचें एक अंग म्हणून गणलें जाते. तेव्हां कधीं अर्थशास्त्र व नीतिशास्त्र हीं नांवें समानार्थक योजिलीं जातात. प्राचीन भारतीय ग्रंथकारांनां राजसत्ताक पद्धतीखेरीज दुसरी शासनपद्धति देशांत असली तरी परिचित किंवा विचारार्ह नसल्यानें याला “राजनीति” असेंहि म्हणतात, आणि त्यांनीं शासनशास्त्राचें विवेचन राजनीति या दृष्टीनेंच केलें आहे व राजशासनाचे मुख्य साधन दंडबल असल्यानें याला “दंडनीति” असें दुसरें नांव आहे.
अर्थशास्त्राच्या प्रगतीचा संबंध आयुष्यांतील तीन प्राचीन जे हेतु त्याशीं येतो. हे तीन हेतु पतंजलीला पूर्वींच अवगत होते [ पाणिनीवर महाभाष्य २, २, ३४ र्वात्तिक ९. ] हिरण्यकेशी गृह्यसूत्रांत ( २. १९, ६ ) धर्म अर्थ आणि काम यांच्यावर चेतन धर्माचा आरोप केला आहे. या त्रिवर्गाचा लाभ करून घेणें हें यजमानाचें आद्य कर्तव्य आहे असें विष्णु स्मृतींत ( ५९, ३० ) लिहिलें आहे. अश्वघोष यांतीन हेतूंशीं परिचित होता व महाभारत, [ महाभारतांत, हेच अर्थशास्त्र, धर्मशास्त्र व कामशास्त्र असल्याचें पुढील श्लोकांत म्हटलें आहे. अर्थशास्त्रमिदं प्रोक्तं धर्मशास्त्रमिदं महत्। कामशास्त्रमिदं प्रोक्तं व्यासेनामितबुद्धिना॥ ( आदिपर्व. अ. २ श्लो. ३८४ ) मनुस्मृति आणि तंत्राख्यायिक यांतून तर या “त्रिवर्गाचा” नेहमीं उल्लेख येतो. तथापि त्रिवर्गाच्या प्रत्येक वर्गावर निरनिराळें शास्त्र कधींपासून अस्तित्त्वांत आलें याचा आम्हाला अदमास लागत नाहीं.
अर्थवेदपरिशिष्टांतील चरणव्यूहांत अर्थशास्त्राला ॠग्वेदाचा उपवेद असें नांव दिलें आहे. सर्व विद्या-शास्त्रांमधील अतिप्रापंचिक सुद्धां वेदाशीं निगडित करण्याच्या ब्राह्मणि प्रयत्नांतील हा एक प्रयत्न म्हणतां येईल. भासाला अर्थशास्त्र [ प्रतिज्ञा यौगंधरायणामध्यें ( अं. २. श्लो. १३ ) व प्रतिमा नाटकांत याचा उल्लेख केला आहे ] माहिती होतें. राजकुमार सिद्धार्थ यानें अभ्यासलेल्या शास्त्रांमध्यें हें एक म्हणून ललितविस्तरांत [ प्रत लेफमन, पान. १५६. ] उल्लेखिलें आहे. महाभारतांत ( १२. ५८, १ पुढें ) बृहस्पति विशालाक्ष, उशनस, सहस्त्राक्ष, महेंद्र, प्राचेतस, मनु, भरद्वाज व गौरशिरस या ॠषींनां राजशास्त्रप्रणेते असें म्हटलें आहे. हेच आचाय कांहींसे धर्मशास्त्रांचे कर्ते दिसतात. यावरून आपणांला असें अनुमान काढतां येईल कीं, अर्थशास्त्र हें हळू हळू धर्मशास्त्रापासून निराळें झालें. अर्थशास्त्र म्हणून स्वतंत्र शास्त्र निघण्यापूर्वीं याकोबी ( एस्. बी. ए. १९१२, पा. ८३८ पासून ) याला स्वतंत्र अर्थशाचें संप्रदाय असल्याविषयीं संशय येतो; तसेंच जाली [ झेड् डी. एम्. जी. ६७, १९१३, पा. ९५ ], हिलेब्रॅन्ट ( झेड् डी एम्. जी . ६९, १९१५ पा. ३६० ) निरनिराळया शाखा गृहीत धरितो. एकाच शाखेंतून राजधर्मशिक्षणांत हीं दोन शास्त्रें शिकविण्यांत येत. या दोन्ही शास्त्रांत नेहेमीं कांहीं विषय सदृश असत. प्राचीन धर्मसूत्रांत [ अपस्तंबीय धर्मसूत्र २. १०, २५-२६. ] देखील अर्थशास्त्राच्या कक्षेंत येणारे विषय विवेचिलेले असत. उदाहरणार्थ, शहरें आणि राजवाडे यांची रचना, अधिकार्यांची नेमणूक, मुलकी आणि जकात पद्धती, व सैन्यव्यवस्था इ. तथापि या छंदोबद्ध धर्मसूत्रांतून अर्थशास्त्रासारखें एक स्वतंत्र शास्त्र या पूर्वींचे असावें असा ध्वनि निघतो. विष्णुस्मृतीच्या ३ व ४ प्रकरणांत असेंच निघतें. मनु. ७, १५५, याज्ञवल्क १, ३४४ इ; विष्णु ३,३८ इ. या उतार्यात अर्थशास्त्रांत रूढ असलेली परिभाषा कल्पिली आहे. याज्ञवल्क्य (२,२१) आणि नारद (१. ३९) हे स्पष्टपणें पूर्वापार नियम म्हणून असें प्रतिपादतात कीं, धर्मशास्त्र आणि अर्थशास्त्र यांच्यांत विरोध उत्पन्न झाल्यास धर्मशास्त्र जास्त प्रमाणभूत मानावें. या दोन्ही शास्त्रांत विवेचिलेल्या नियमांत सुद्धां मुळांतच फरक दृष्टीस पडतात. अर्थशास्त्र खर्या वस्तुस्थितीला अनुसरतें तर धर्मशास्त्र पुष्कळवेळां केवळ ब्राह्मणेच्छेप्रमाणें नमुनेदार पण काल्पनिक स्थिति धरून चालतें. एका शास्त्राला जें विशेष महत्त्वाचें वाटतें तें दुसर्याला क्षुल्लक दिसून त्याच्याकडे त्याचा कानाडोळा होतो. उदाहरणार्थ, अर्थशास्त्रांत दैवी शिक्षा बाजूला ठेऊन कायद्याच्या अंमलबजावणींत यातना अंगिकारिली आहे, तर धर्मशास्त्रांत दैवी शिक्षेकडेच बोट दाखविलें आहे. तथापि या दोन्ही प्रकारच्या शिक्षा त्यावेळीं अस्तित्वांत असाव्यात [ जॉली. झेड. डी. एम्. झी. ६७, पान ४९ इ. ९४ इ. याशीं तुलना करा. ] या दोन शास्त्रांतील तत्त्वांत उघड उघड फरक दिसतो. धर्मशास्त्र श्रुतीवर आधारलेलीं कर्तव्यें शिकविण्याचा बाणा अगर बहाणा करतात; तर अर्थशास्त्र नीति व धर्म यांचा संबंध नसलेले [ “आत्मोन्नति व शत्रूचा पराजय या दोन गोष्टी म्हणजे सबंध नीति होय” माघ – शिशुपालवध २. ३०, ] कांहीं भौतिक सिद्धिचे मार्ग दाखवितात. या कारणाकरितांच बौद्धसंप्रदायी अर्थशास्त्र मुळींच मानीत नाहींत. जातक मालेंत [ ९, १०; ३१. ५२ इ. ] अर्थाशीं जोंपर्यंत धर्माचा विरोध येत नाहीं, तोपर्यंत तो ग्राह्य असतो हा राजशास्त्राचा सिद्धांत खोडून काढून नीतीला खोटें म्हटलें आहे.
अर्थ व नीति यासंबंधीचीं जुनी वचनें सूत्ररूपानें, त्यांच्या शाखा व शास्त्रें अस्तित्वांत येण्यापूर्वीं लोकांच्या तोंडी असत. हीं सुप्रसिद्ध वचनें छंदोबद्ध असून राजधर्मासंबंधीं त्यांत विवेचन असे.
यामुळेंच महाभारतांतींल अनेक उतार्यांतून धर्म व नीति यासंबंधीचीं वचनें एकमेकांत मिश्र केलेलीं दिसतात. [ उदाह. ५ व्या पर्वांतील विदुराचीं भाषणें; विशेषत: ३३, ३६, ३७, आणि ३९ या अध्यायांतील. १२ व्या पर्वांत नीतिवचनें पुष्कळ आहेत; अध्याय ८० इ. ९३ इ. १०३ इ. ११२, ११४ इ. ११८ इ. १६८ पाहा ] महाभारतांतील अनेक भाग असे आहेत कीं त्यांनां खरोखरीच छोटीं नीतिशास्त्रें म्हणतां येईल. [ या ठिकाणी महाभारतांतील पर्व १ अ. १४० पाहावे, त्यांत कणिक धृतराष्ट्रराजाला स्वशत्रुच्छेदाचा कसा निष्ठुरपणें प्रयत्न केला पाहिजे हें सांगतो. किंवा पर्व ४. अ. ४, येथें दरबारी लोकांनीं कसें वागावें याचें विवेचन केलें आहे. पर्व १५ यांतील अध्याय ५-७ हे खर्याखुर्या नीतिशास्त्रापासून उसने घेतां येतील.] त्याच्या १२ व्या पर्वांत अर्थशास्त्राच्या पूर्वकलीन अस्तित्वाचा पुरावा आढळतो. या ठिकाणीं असें सांतिगलें आहे कीं, “ ब्रह्मदेवानें स्वत: लोककल्याणकारक असा एक लक्ष अध्यायांचा ग्रंथ निर्माण केला. यामध्यें त्रिवर्गाचें विवेचन आहे ” ( शांतिपर्व अ. ५९ ). जगदुद्धाराकरितां व त्रिवर्गाची स्थापना करण्याकरितां त्यानें दंडनीतीचा उपदेश केला. यापुढें वरील एक लक्ष अध्यायांची विषयवारी दिली आहे. तीवरून हा ग्रंथ अर्थशास्त्राशीं किती तंतोतंत जुळतो हें दिसून येतें. नंतर असे सागितलें आहे कीं, विशालाक्ष श्रीशंकरांनीं या नीतीचा प्रथम स्वीकार करून व प्रजेचें आयुष्य र्हास पावत आहे हें जाणून या शास्त्राला संक्षिप्तरूप दिलें. या संक्षिप्त नीतिग्रंथाला वैशालाक्ष असें नांव आहें. पुढें भगवान इंद्रानें दहा हजार अध्याय असलेल्या या शांकर संक्षिप्त शास्त्राचा आणखी संक्षेप केला व पांच हजार अध्याय बनविले. या नवीन बाहुदंतक नांवाच्या नीति ग्रंथाचा बृहस्पतीनें पुन्हां संक्षेप करून अध्यायांची संख्या तीन हजारांवर आणली. या तीन हजारीला बार्हस्पत्य असे संक्षेपकारावरून नांव पडलें. शेवटीं काव्यानें ( शुक्राचार्यानें ) आणखी संक्षेप करून एक हजार अध्याय केले. या विधानांत कांहींसा इतिहास असेल पण ग्रंथ दिवसानुदिवस वाढत जाण्याऐवजी संक्षिप्त होत गेला ही मात्र येथें कविकल्पना आहे. [ महाभा. १२. ५९, २८इ. ७६ इ. ] कौटिल्य अर्थशास्त्रांत विशालाक्ष, बाहुदंतीपुत्र, बृपस्पति आणि उशनस् हे अर्थाचार्य म्हणून उल्लेखिले आहेत. त्याचप्रमाणें कामसूत्रांत ( १, १ ) असे सांगितलें आहे कीं त्रिवर्गावरील प्रजापतीच्या मोठ्या ग्रंथातील “धर्मा” चा भाग मनूनें, “अर्था” चा बृहस्पतीनें व “ कामा ” चा महादेवानुचर नंदीनें भाग तयार केला.
विद्वन भारतीय कवी नीतिशास्त्राशीं विशेष परिचित असत. नीतिशास्त्राचा अभ्यास हा एक कवीचा गुण समजला जात असे इतकेंच नव्हे तर मोठाले कवी या शास्त्रातील आपलें प्राविण्य व्यक्त करण्यासाठीं झटत. उदाह.कालिदास रघुंवशांत ( सर्ग ११, ५५; १२, ६९; १७, ४५ इ. ), भारवि किरातार्जुनीयांत ( १, आणि २ ) आणि माघ तर शिशुपालवधाच्या संबंध २ र्या सर्सोत आपलें नीतिशास्त्रज्ञान पुढें मांडतो. सोमदेव सुध्दां कथासरित्सागरांत आपण नीतिशास्त्रपटु असल्याचें दर्शवितो. कल्हणानें आपल्या राजतरंगिणीमध्यें ( ४, ३४४ इ. )राजा ललितादित्य याच्या तोंडीं घातलेलीं नीतिशास्त्रतत्त्वे काश्मीरमधील तत्कालीन ज्ञानस्थितिदर्शक म्हणतां येतील.
अर्थशास्त्रावरील अतिप्राचीन ग्रंथ उपलब्ध नाहींत. वर दिलेल्या महाभारतांतील उतार्यावरून अर्थशास्त्राच्या उत्पादकत्वाचा मान बृहस्पतीकडे जातो. बृहस्पति हा लोकायतांत सुध्दां प्रवीण होता. लोकायत आणि अर्थशास्त्र यांच्या निकट संबंधाविषयीं हिलेब्रँटनें चांगलें विवेचन केलें आहे. महाभारतांत दुसर्या एका स्थळीं ( ३. ३२, ६० इ. )द्रौपदी म्हणते कीं, एक विद्वान ब्राह्मण माझ्या भावांना शिकवीत असतां मीं बृहस्पतिप्रोक्त नीतितत्त्वे श्रवण केलीं. “मीं बार्हस्पत्य अर्थशास्त्राचें अध्ययन केलें आहे” असें भासाच्या प्रतिमा नाटकांत रावण सांगतो. दुर्दैवानें सध्यां आपणाकडे परंपरागत आलेलें जें अर्थशास्त्र आहे तें म्हणजे प्राचीन बृहस्पतीच्या अर्थशास्त्राची बरीच फरक होऊन आलेली व अर्वाचीन गोष्टींनीं भरलेली अशी प्रत होय. आज उपलब्ध असणार्या अशा प्रतींत, विशेषत: २ र्या व ३ र्या अध्यायांत पाखंड्यावर जे हल्ले चढविले आहेत ते प्राचीन अर्थशास्त्रांत मुळींच असूं शकणार नाहींत. कौटिलीय अर्थशास्त्रांत अनेक ठिकाणीं बार्हस्पत्यांचीं मतें म्हणून जीं उदधृत केलीं आहेत तीं आपल्या या ग्रंथांत मुळींच सांपडत नाहींत. यावरून असें सिध्द होतें कीं, त्या लहान ग्रंथाचा केवळ एक लहानसा भाग कायतो जुन्या बृहस्पतीच्या अर्थशास्त्राचा असावा.
कौटिलीय अर्थशास्त्र व त्यावर अभ्यास. - अर्थशास्त्रवाङ्मयांत अति महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे कौटिलीय-अर्थशास्त्र होय. हा मौर्य घराण्यांतील चंद्रगुप्त राजाचा मंत्रि कौटिल्य ( चाणक्य किंवा विष्णुगुप्त ) यानें राज्यशासनावर लिहिलेला आहे. भारतीय वाङ्मयांतील दुसर्या कोणत्याहि ग्रंथांत राज्य व आर्थिक स्थिति या संबंधीं प्राचीन काळची इतकी भरपूर व महत्त्वाची माहिती सांपडणार नाहीं. हा ग्रंथ आपल्या ऐकण्यांत बरेच दिवसांपासून आहे, पण १९०९ सालापासून याची प्रत आपल्या परिचयाची झाली [ प्रकाशक आर. शामशास्त्री, म्हैसूर १९०९; दुसरी आवृत्ति १९१९; ] याचें समग्र भाषांतर बंगलोर येथें १९१५ त प्रसिध्द झालें. तुटक तुटक उतारे व भाषातरें पूर्वींच इंडि. आँटि. मध्यें ( पु. ३४, ३८ आणि ३९ ) आलेले होते मूळ ग्रंथावर टीकात्मक निबंध पाश्चात्य व बंगाली लेखकांकडून अनेक लिहिले गेले आहेत. मराठींत प्रो. गो. गो. टिपणीस यांनीं कांहीं लिहिले आहेत. या ग्रंथाची इतर पाश्चात्य भाषांत भाषातरेंहि झाली आहेत. नरेंद्रनाथ लॉ यांनीं अर्थशास्त्राच्या पूर्वार्धावर स्टडीज इन एन्शंट हिंदु पालिटी, लंडन, ( १९१४ ) व उत्तरार्धावर “ इंटर स्टेट रिलेशनस इन् एन्शंट इंडिया भाग १ला, ( कलकत्ता आणि लंडन ) १९२० हे ग्रंथ रचिले आहेत. चाणक्याचा किंवा त्याच्या नांवावर खपला जाणारा हा ग्रंथ गद्यांत लिहिला असून, त्याची धाटणी सूत्र व भाष्य यांची मिसळ होऊन झाली आहे. मधून मधून म्हणी व स्मृतिपाठ समाविष्ट केले असून, ते बहुतेक श्लोकांत व कांहीं थोडे उपजाति वृत्तांत आहेत. प्रत्येक अध्यायाच्या शेवटीं एक किंवा अधिक श्लोक असून, त्यांतील अर्थ मागील गद्याला योग्य उपसंहारात्मक असाच असतो. भाष्यापासून सूत्रें नेमकीं निराळीं काढणें जवळ जवळ अशक्यच आहे. शामशास्त्री असें धरतात कीं, १५० अध्यायांतील प्रत्येकाच्या शिरोभागीं असणारी विषयसूचक हीं सूत्रें धरावींत, पण तेच पुढें असें म्हणतात कीं, पुष्कळ ठिकाणीं भाष्य सूत्रपध्दतीपेक्षा फारसें निराळें वाटत नाहीं, व कांही ठिकाणीं भाषा, उपनिषदें व पुढील ब्राह्मणें यांतील भाषेप्रमाणें आहे. डॉ. थॉमस ( जर्नल रायल ए. सो. १९१० ) कौटिलीयाच्या धाटणीची पंतजलीच्या धाटणीशीं तुलना करितो, व याकोबीहि यास्काचें निरूक्त व पतंजलीचें महाभाष्य यांसारख्या ग्रंथांच्या पंक्तीला कौटिलीयाला बसवितो. काहीं असलें तरी महाभाष्याचें गद्य जास्त सरस आहे हें खरें. शामशास्त्री च्या दुसर्या आवृत्तींच्या परिशिष्टांत “ चाणक्यसूत्राणि” म्हणून जो भाग आहे, त्याचें सूत्रांशीं फारच थोडें साम्य दिसतें. यांत ५७१ लहान लहान वाक्यें असून तीं सूत्रांपेक्षां गद्याशीं अधिक जुळतात. यांतील फार थोडीं वाक्यें मूळ कौटिलीयांत आढळतात.
कौटिलीय अर्थशास्त्र हा ग्रंथ तत्पूर्वींच्या विद्वानांनीं केलेल्या अर्थशास्त्रविषयक ग्रंथाच्या सामान्यत: सारांश घेऊन तयार केला आहे, असें या ग्रंथाच्या प्रमथारंभीं सागितलें असून नंतर ग्रंथांतील विषयांची अनुक्रमणिका दिली आहे. या ग्रंथाचे मुख्य भाग किंवा ‘अधिकरणें १५ असून त्यांत १८० विषय उर्फ ‘ प्रकरणें’ आहेत. या ग्रंथातील प्रत्येक अधिकरणाचे अध्यायवारहि विभाग पाडलेले आढळतात. हे ‘ अध्याय’ वार विभाग मागाहूनचे असावेत असें विंटरनिझ्झला वाटतें.
पहिलें अधिकरण - पहिल्या ‘ विनयाधिकारिक’ नांवाच्या अधिकारणांत ‘राजाचें शिक्षण व उपदेश’ याविषयीं विवेचन आहे. राजाला ज्या विद्या अवगत पाहिजेत त्या तत्त्वज्ञान ( आन्वीक्षकी ), वेद ( त्रयी ). अर्थशास्त्र ( वार्ता ) व शासनशास्त्र ( दण्डनीति ) या होत. तत्त्वज्ञान हें इतर विद्यांचा पाया आहे. त्यानें आयुष्यांतील सर्व अडचणींनां तोंड देण्यास मनुष्याची बुध्दि तयार होते. आणि विचार उच्चार व आचार यांनां लागणारें चातुर्य अंगीं येतें. त्रयी म्ह. तीन वेदांचें ( ऋक, साम, यजु ) व सहा वेदांगांचें ( शिक्षा’ कल्प, व्याकरण, निरूक्त, छंद व ज्योतिष ) ज्ञान. यावरून चार वर्ण व चार आश्रम या विषयीचीं कर्तव्यें समजून येतात. हीं कर्तव्यें किंवा वर्णाश्रमधर्म या अर्थशास्त्रांत ब्राह्मणी धर्माला पूर्णपणें अनुसूरून सांगितलीं असून स्मृतिग्रंथातल्याप्रमाणें या ग्रंथांत प्रत्येक वर्णाचीं व प्रत्येक आश्रमाचीं कर्तव्यें नमूद केलीं आहेत. अर्थशास्त्राचें ( कृषि, पशुपालन, वणिज्य ) ज्ञान राजाला अधिकार्यांनीं द्यावे आणि शासनशास्त्र ( दण्डनीति ) मुत्सद्यांनीं व राजकारणी पुरूषांनीं शिकवावें. शिवाय शिक्षण परिपूर्ण व्हावें म्हणून राजानें नेहमीं वृध्द व अनुभवी पुरूषांच्या संगतींत काल घालवावा. त्यानें सकाळीं युध्दशिक्षण घ्यावें, व सायंकाल इतिहासश्रवणांत घालवावा. ‘इतिहास’ यामध्यें पुराण, इतिव्रत्त, आख्यायिका, उदाहरण, धर्मशास्त्र व अर्थशास्त्र, यांचा समावेश होतो (१.२). राजाला सर्वांत महत्त्वाची गोष्ट: म्हणजे इंद्रियनिग्रह करणें, आणि काम, क्रोध, लोभ, अभिमान, मद व हर्षच्या षड्रिपूंवर जय मिळविणें ही होय. शिवाय वरील सर्व गोष्टी राजाच्या अंगी असल्या तरी योग्य मित्र व सेवक मिळाल्याशिवाय. कारकीर्द यशस्वी होण्याची खात्री राजाला धरतां येत नाहीं, म्हणून अमात्य मंत्री, पुरोहित वगैरे अधिकारी कसे निवडावे याबद्दल या अर्थशास्त्रांतील अनेक प्रकरणांत विवरण केलें आहे. राजाच्या सेवकांत कोणकोणते अत्यंत महत्त्वाचे गुण असावे, आणि राजाला स्वत:चें मंत्रिमंडळ पूर्ण विश्वासार्ह कशा रीतीनें बनवितां येतें यांबद्दल माहिती दिली आहे. या कार्याकरितां हेर, गुप्त दूत वगैरे ( गूढपुरूष ) नेमण्यावांचून गत्यंतर नाहीं. खरोखरच, अंतर्बाह्य शत्रूंचें निर्मूलन: करण्याकरितां राजाला हेर बाळगणें अत्यंत जरूर असतें, म्हणून अनेक प्रकारचे हेर व त्यांच्या कार्यपध्दती, या विषयाला या ग्रंथांत बरीच जागा दिली आहे. कांहीं हेर, विद्यार्थ्यांचीं, कांहीं संन्याशांची कांहीं शेतकर्यांचीं व कांहीं व्यापार्यांचीं सोंगे घेतलेले असतात. भिक्षुकिणींचीं सोंगें घेंणे हाहि बराच प्रचलित प्रकार दिसतो. ‘तीक्ष्ण’ ह्या नांवाच्या हेराचा एक वर्ग सांगितलेला आहे. शिवाय विषप्रयोग करून राजद्रोही इसमांनां किंवा शत्रूंना ठार मारण्याची कामें करणारे लोक असत. राज्यांतील अधिकारीवर्गाच्या खाजगी वर्तनावर गुप्त देखरेख ठेवण्याच्या कामीं आचारी, न्हाव्वी, नट, नर्तक, फिरते उपदेशक वगैरे लोकांचा फार उपयोग होतो. अशा अनेक प्रकारच्या हेरांचें सर्वत्र जाळें पसरून अंतर्बाह्य शत्रूंविषयीं बातम्या गुप्त रीतीनें मिळविण्याची व्यवस्था राजा करतो. याच हेरांकडून शहरांत तसेंच खेड्यापाड्यांतहि राजनिष्ठ लोक कोणकोण आहेत; व असंतुष्ट लोक कोणते हें शोधून काढण्याचें काम केलें जातें. राजनिष्ट लोकांनां योग्य मान किंवा बक्षीस राजाकडून मिळतें, आणि असंतुष्टांकडून राजाला त्रास पोचणार नाही, अशी व्यवस्था करण्यांत येते. किंवा त्यंनां नष्ट करण्यांत येतें. हेरांचा आणखी उपयोग शेजारी शत्रुराष्टांत असंतोष पसरविणें, व स्वत:च्या राजाच्या पक्षाला मिळणारे लोक तयार करणें या कामींहि करतात.
एका प्रकरणांत मंत्रिलोक कसे पारखून नेंमावे व त्यांच्या बरोबर केलेल्या मसलती कशा गुप्त राखाव्या याबद्दल विवेचन आहे. दुसर्या एका प्रकारणांत परराष्ट्रांत पाठवावयाच्या वकीलासंबंधीं माहिती दिली आहे. हे वकील नुसती बातमी पोहोचविणारे असून भागत नाहीं, तर त्यांनीं परराज्यांतील परिस्थितीची नीट पाहणी करून गुप्तहेरांच्या मार्फत आपल्या राजाला ती माहिती पुरविण्याचें काम करणें जरूर असतें. यानंतरच्या एका उदारावाण्या प्रकरणांत ‘राजपुत्रावरील देखरेखी’ चा विषय आहे. राजाचे स्वत:चे मुलगे हें राजाला एक कायमचें भयकारण असतें. त्यांच्या जन्मापासून राजानें त्यांच्यावर चांगली नजर ठेवणें जरूर असतें. कारण “राजपुत्र हें खेकड्यांप्रमाणें स्वपितृभक्षक असतात.”
या अर्थशास्त्रांतील माहितीचा धर्मशास्त्रांतील विषयांशी संबंध येतो. असें प्रकरण म्हटलें म्हणजे राजाचें नित्यर्क्म ज्यांत सांगितलें आहे तें प्रकरण होय. या प्रकरणांतील राजाच्या कर्तव्याविषयींचें वर्णन वाचलें म्हणजे राजाच्या आयुष्यक्रमाइतका अवघड व दगदगीचा आयुष्यक्रम दुसर्या कोणाचाच नसेल असें वाटूं लागतें. या प्रकरणांत शेवटीं ( १, १६ ) धर्मशास्त्रांतून उद्धृत केलेल्या पुढील ओळी आहेत:-
प्रजासुखे सुखं राज्ञ:प्रजानांच हिते हितं ||
नात्मप्रियं हितं राज्ञ:प्रजानां तु प्रियं हितं ||
म्हणजे, प्रजेच्या सुखांत राजाचें सुख असतें, आणि प्रजेच्या कल्याणांतच राजाचें कल्याण असतें. राजाला स्वत:च्या प्रिय गोष्टीनें सुख होत नाहीं तर प्रजेला जें प्रिय त्यानेंच राजाला सुख होते.
एक समग्र प्रकरण राजाच्या अन्त:पुराची रचना व व्यवस्था यांच्या वर्णनाला दिलें आहे. राजानें स्वस्त्रियांचें रक्षण क्लीब पुरूषांच्या मार्फत व स्वत:चें संरक्षण अनेक उपाययोजनांनी कसें करावें त्याची माहिती विशेष विस्तारानें दिली आहे. राजानें अन्त:पुरांत जातांना इतर कोणत्याहि ठिकाणच्यापेक्षां अधिक सावधगिरीनें असलें पाहिजे. पुष्कळ राजे अन्त:पुरातील प्राणघातक हल्ल्यांना बळी पडले आहेत या ठिकाणीं अन्त.पुरांतील कारस्थानांनां विषप्रयोगामुळें किंवा शस्त्रप्रयोगामुळें बळी पडलेल्या अनेक राजांचीं उदाहरणें दिलीं आहेत. या पहिल्या अधिकरणांतल्या शेवटल्या प्रकरणांत राजानें राजवाड्यांत, राजमार्ग व इतर सार्वजनिक ठिकाणीं विषप्रयोगादि संकटापासून स्वसंरक्षण कसें करावें याबाबत सावधगिरीच्या सूचनांची महिती दिली आहे.
दुसरें अधिकरण.- या “अध्यक्षप्रचार:” नामक अधिकरणांतील चित्ताकर्षक विषयांची कल्पना येथें त्यांची यादी दिल्यानेंच कायती येईल. राज्यकरभाराच्या प्रत्येक खात्याकरितां खास तपासनीस असतात, त्यांच्या विषयाच्या प्रकरणांत निरनिराळ्या खात्यांच्या करभाराचीहि सविस्तर माहिती दिली आहे. गांवें व नगरें : यांची रचना, जमिनीची वांटणी, उद्योगधंद्यांच्या योजना, खाणी, पाणीपुरवठा, बाजार, तसेंच निराश्रित असलेल्या अनाथ, रोगी, वृध्द, इत्यादिकांच्या व विशेषत: आसन्नप्रसव स्त्रियांच्या मदतीकरितां सार्वजनिक संस्था, यासंबंधाची; तसेंच वनरक्षणविद्या, हत्तीची शिकार, किल्ल्यांचें बांधकाम व संरक्षण, तसेंच खजिना, कर, खंडणी, खजिन्याच्या: संरक्षणाकडील अधिकारी व त्यांनीं पैशाची अफरतफर केल्यास त्याबद्दल कडक शिक्षा; अशा अनेक विषयासंबंधी या अधिकरणांत माहिती आहे. सरकारी अधिकार्यावर केव्हांहि विश्वास टाकूं नये अशाबद्दल पुढील वर्णन आढळतें ( २. २७ ).
यथा ह्यनास्वादयितुं नशक्यं जिव्हातलस्थं:मधुवा विपवा
अर्थस्तथा ह्यर्थचरेणराज्ञ:सल्पांऽप्यनास्वादयितुं नयक्य:
मत्स्या यथान्तस्सालिलेचरन्तो ज्ञातुं न शक्या सलिलंपिबन्त:
युक्तास्तथा कार्यविधौ नियुक्ता:ज्ञातुं न शक्या धनमाददाना:
याचा अर्थ असा कीं, जिभेवर मधाचा किंवा विषाचा बिंदु पडल्यावर त्याची चव न घेणें हें केव्हांहि शक्य नाहीं. त्यां प्रमाणें राजाच्या खजिनाकामगारानें राजाचें द्रव्य थोडें तरी अपहरण न करणें अशक्य आहे. तसेंच: ज्याप्रमाणें पाण्यांत राहणारा मासा पाणी पितो किंवा नाहीं हें समजणें अशक्य आहे त्याप्रमाणें राजाचे खजिन्याकडील कामगार पैसा खातात किंवा नाहीं हें कळणें अशक्य आहे.
इतर प्रकरणांतील कांहीं थोडके विषय सांगतों ते येणेंप्रमाणें:-राजाचा अपराध्यांनां क्षमा करण्याचा अधिकार व त्याचा उपयोग, रत्नपरीक्षा, खाणी खणणें, मिठाचा व्यापार, नाणीं पाडणें, खाद्य पदार्थांची निपज व देवघेव, आयात, व निर्गत व्यापार, करपद्दीवरील व्यापाराचें नियंत्रण, सूतकाम व विणकाम, कृषि ( खतें, वातावरणशास्त्र इत्यादि ), दारू तयार करण्याचे कारखाने, भोजनगृहावरील नियंत्रण, वेश्या वृत्तीवरील नियंत्रण, हत्ती माणसाळणें, पाळणें व त्यांना युध्दोपयोगी करण्यांकरितां शिक्षण देणें, करवसुली इत्यादि. वर वातावरणशास्त्र असे शब्द वापरले आहेत त्याचें कारण असें कीं, पाऊस मोजण्याचें. साधन त्या काळीं माहित होतें. ( रॉयलमिटि ऑरालॉजिकल सोसायटीचें क्कार्टलीं जर्नल १९१२ पृ.६५. )
तिसरें अधिकरण.- या “धर्मस्थीयम्” नांवाच्या अधिकरणांत न्यायदानाविषयीं विवेचन असून त्यांत न्यात मिळविण्याचे कायदेशीर मार्ग व लोकांचे नागरिकत्वाचे हक्क याविषयींची माहिती आहे.
चवथें अधिकरण.- या “कंटकशाधेनम्” नांवाच्या अधिकरणांत राज्याला अपायकारक अशा सर्व गोष्टींचा पोलीसाच्या मदतीनें व दण्डशिक्षा वगैरे करून कसा बंदोबस्त करावा तें सांगितलें आहे. यांतील पहिल्या प्रकरणांत ज्या “कंटकां” संबंधीं विचार केला आहे ते लबाड कारागीर, खोटीं नाणीं करणारे, बेइमानी वैद्य, फिरते उपदेशक नर्तक वगैरे लबाड लोक होत. अशांचा बंदोबस्त राजानें करणें जरूर आहे. कारण असले लबाड लोक प्रत्यक्ष नावानें नसले तरी वास्तविक ‘ चोर’ या सदराखालीं येतात. बाकीच्या प्रकरणांत व्यापारावरील देखरेख ( पदार्थांच्या किंमती वाढूं नयेत, खाण्याच्या जिनसांत लबाडी होऊं नये वगैरे बंदोबस्ताकरितां ), सार्वजनिक आरोग्य व इतर सामाजिक बाबींचीं व्यवस्था, आणि या बाबतींतील गुन्हेगारांस शिक्षा करण्याचा अधिकार यांविषयीं विवेचन आहे. तिसर्या व चवथ्या अधिकरणातील मजकूर पुष्कळसा धर्मशास्त्रांतल्या सारखा आहे, व त्याचें याज्ञवल्क्य व नारदस्मृतींशीं फार साम्य आहे. या ग्रथाच्या कालदृष्टया पौर्वापर्यबद्दल मतभेद आहे, पण ते जवळजवळचे असावे असा संभव दिसतो.
पांचवें अधिकरण. - या “योगवृत्तम्” अधिकरणांत प्रथम राज्याचे शत्रू व राजद्रोहादि भयंकर गुन्हे करणार्या ज्या लोकांविरूध्द उघडपणें राजाला कांहीं करतां येत नाहीं अशा लोकांनां नाहीसें करण्याकरितां कसे धूर्तपणाचे उपाय योजावे तें सांगितलें आहे. कावेबाजपणाच्या सर्व युक्त्या येथें सांगितल्या आहेत. इष्टकार्यसिध्दयर्थ योजलेला कोणातहि अश्लाध्य मार्ग त्याज्य मानला नाहीं, किंवा त्याची पर्वा केलेली नाहीं. उदाहरणार्थ, राजद्रोहाचा संशय आलेल्या एकाद्या प्रधानास राजा एकाद्या बंडखोर रानटी टोळीचा मोड करण्यास पाठवितो, आणि त्या कामांत लढाई होऊन प्रधान त्याच्या बरोबर मुद्दाम पाठविलेल्या दुष्ट लोकांकडून किंवा दरवडेखोरांच्या वेषांत आलेल्या गुप्त हेराकडून मारला गेला, तरी जनतेला असें जाहीर करण्यांत येतें कीं, प्रधान लढाईतच मारला गेला, किंवा राजा लढाईला व शिकारीला जाण्याच्या बेतांत असतां तो संशयास्पद बनलेल्या प्रधानांना गांठ घेण्यास बोलावितो, आणि ते राजाकडे निघाले आहेत इतक्यांत पूर्वसंकेतानुरूप गळेकापू लोक शस्त्रास्त्रें छपवून घेऊन राजवाड्यांत शिरतात व पकडले जाऊन त्यांची झडती होते तींत त्यांच्या जवळील हत्यारें सांपडतात व प्रधानांनीं त्यांना राजव धार्य प्रयुक्त केलें असल्याचा ते बाहाणा करतात. नंतर सर्व प्रकरण जनतेला कळवून अशा संशयित प्रधानांचा वध करण्यांत येतो, आणि गळेकापू लोकांबद्दल दुसर्याच कोणाला तरी पकडून त्यांनां मरणाची शिक्षा देण्यांत येते.
या अधिकरणांतील दुसर्या प्रकरणांत राजानें पैशांच्या अडचणींत असतां खजिना भरण्याते कोणते उपाय योजावे तें सांगितलें आहे, व या उपायांपैकीं कांहीं फारच कावेबाजपणाचे आहेत. प्रथम जमीनदार, व्यापारी व उद्योगधंदेवाले यांच्याकडून गोड बोलून किंवा धमक्या देऊन शक्य तितकें द्रव्य कररूपानें किंवा खंडणीरूपानें काढावें. नंतर श्रीमंत लोकांकडून मोठाल्या देणग्या मानाच्या जागा व पदव्या मिळण्याच्या आश्वासनावर मिळवाव्या. तसेंच पाखंडी लोकांच्या व देवालयांच्या मालमत्तेनें सरकारी खजिन्यांत भर करावी. आणि राजानें एकाद्या ठिकाणीं देवासकट एकादें देवालय एका रात्रींत तयार करून तें स्वयंभू निर्माण झालें अशी वार्ता लोकांत पसरवावी, आणि लोक तेथें यात्रेला व धार्मिक मिरवणूकींनां जमूं लागले म्हणजे त्यांपासून होणारें उत्पन्न सरकारी:खजिन्यांत टाकावें. किंवा दुसरा उपाय म्हणजे राजाच्या हस्तकांनीं मांत्रिक असल्याचें जाहीर करून व एकाद्या झाडावर एखादें भूत आहे अशी लोकांच्या मनांत भीति उत्पन्न करून तन्निवारणार्थ म्हणून लोकांकडून पैसे उकळावे. शिवाय एका दगडानें दोन पक्षी मारण्याप्रमाणें असा उपाय करावा की, गैरविश्वासू लोकांनां कांहीं तरी गुन्ह्यांत पकडून त्यांनां कैदेची किंवा मरणाची शिक्षा द्यावी, व त्याबरोबरच त्यांची इस्टेट खालसा करून खजिन्यांत भर घालावी. तिसर्या प्रकरणांत लहानमोठ्या सर्व अधिकार्यांचे व नोकरांचे पगारमान सांगितलें आहे. राजपुरोहित व प्रधान यांच्या ४८००० पासून अगदी खालच्या नोकरांच्या ६० “पण” पगारापर्यंत वार्षिक वेतनाचे आंकडे बरोबर हिशोबानें दिले आहेत. पुढील प्रकरणांत दरबारी लोकांसंबंधींचे नियम आणि मंत्रीमंडळींनां उपदेश केलेला असून त्यांनीं आपापल्या हातांत पूर्ण अधिकार कसा घ्यावा तें सांगितलें आहे.
सहावें अधिकरण. - या “मंडलयोनि:” नामक अधिकरणापासून शासनशास्त्र या विषयाला खरा आरंभ होतो. पहिल्या प्रकरणांत सात प्रकृती उर्फ मुख्य सत्तेचीं सात अंगें किंवा तत्त्वें ( राजा, मंत्री, प्रजा, जनपद, दुर्ग, ठिकाणें, खजिना, सैन्य व मित्र ) व त्या प्रत्येकाला लागणारे गुण सांगितले आहेत. दुसर्या प्रकरणांत आसपासच्या शत्रुमित्र मंडलाबद्दल व्याख्या दिल्या आहेत. शत्रुमित्र ठरविण्यांत पुढील बारकाईचे भेद दिले आहेत: शत्रू, मित्र, शत्रूचा मित्र, मित्राचा मित्र, शत्रूच्या मित्राचा मित्र, प्रच्छन्न शत्रू, प्रच्छन्न मित्र, प्रच्छन्न शत्रूचा मित्र, प्रच्चन्न मित्राचा मित्र, मध्यस्थ, तटस्थ; या वर्गीकरणानंतर मित्र व शत्रू यांचे सहज व कृत्रिम असे दोन पोटवर्ग केले आहेत. यानंतर राज्याची आर्थिक उन्नति व संरक्षण यासंबंधींच्या तत्त्वांची माहिती दिली आहे.
सातवें अधिकरण. - याला “ षाङ्गुण्यम्” असें नांव असून त्यांत शासनशास्त्रांतील सहा पध्दती आहेत त्या:- शांतता, युध्द, तटस्थपणा, युध्दाची सिध्दता, दोस्ती आणि द्वैधीभाव म्हणजे शत्रुत्व व मैत्री या उभयतांनां साजेल अशी वृत्ति. या सहापैकीं प्रत्येक पध्दति केव्हां व कशी उपयोगांत आणावी याविषयीं माहिती याच अधिकरणांत दिली आहे.
आठवें अधिकरण. - या “व्यसनाधिकारिक” नांवाच्या अधिकरणांत राजाचीं व्यसनें म्हणजे शिकार, जुगार, मद्यपान, स्त्रियांवर आसक्ति याबद्दल तसेंच राजावरील संकटें म्हणजे रोग, अग्निप्रलय, जलप्रलय इत्यादिकांबद्दल वर्णन असून त्यापैकीं अत्यंत भयंकर व्यसनें कोणतीं तें सांगितलें आहे.
नववें व दहावें अधिकरण. - या “अभियास्यत्कर्म” आणि “सांप्रामिकम्” या नांवाच्या दोन प्रकणांत सर्वस्वीं युध्दविषयक गोष्टींची म्हणजे ( सैन्यांत भरती, सैन्याचे निरनिराळे प्रकार, सैन्याच्या छावणीची रचना व व्यवस्था वगैरे ) माहीती दिली आहे. ज्याला सरळ युध्दांत शत्रूचा पराभव करण्याचें सामर्थ्य नसेल त्या राजानें शत्रूनाशाच्या कोणत्याहि कुटिल उपायाचें अवलंबन करण्यास कचरूं नये जेव्हां प्रत्यक्ष लढाईची वेळ येईल त्यावेळीं राजानें सैनिकांनां भाषणांनीं उत्तेजन द्यावें. या कामांत त्यानें ज्योतिषि, पुरोहित व दरबारचे भाट यांची मदत घ्यावी; आणि त्यांनीं शूरांनां स्वर्ग व भीरूंनां नरक हें बक्षीस मिळतें असें सैनिकांनां सांगावें. शेवटीं असें. सांगितलें आहे कीं, शत्रूचा पराजय करण्याकरितां केवळ सैन्यावर भिस्त ठेवून भागत नाहीं, तर कपटाचा प्रयोगहि करणें जरूर असतें; कारण,
एकं हन्यान्न वा हन्यादिषु : क्षिप्तो धनुष्मता |
प्राज्ञेन तु मति: क्षिप्ता हन्याद्गर्भगतानापि ||
म्हणजे योध्दयानें सोडलेल्या एका बाणानें फार तर एक इसम मरेल, कदाचित कोणीहि मरणार नाहीं. परंतु बुध्दिमान मनुष्यानें योजिलेली युक्ति गर्भांत असलेल्या शत्रूला सुध्दां मारूं शकते. ही कविता दिल्यावर पुढील अधिकरणांत युध्दप्रसंगीं योजावयाच्या अनेक युक्त्यांचें वर्णन केलें आहे.
अकरावें अधिकरण.- याचें “संघवृत्तम्” असें नांव असून त्यांत युध्दजीवी अशा संघांशीं राजानें वर्तन कसें करावें तें सांगितलें आहे. प्रथम राजानें त्यांनां स्वपक्षाकडे ओढून घेऊन त्यांचा स्वत:च्या फायद्यासाठीं उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करावा. पण हा प्रयत्न न साधल्यास राजानें अनेक युक्त्याप्रयुक्त्यांनीं अशा संघांतील लोकांत परस्पर वैमनस्यें उत्पन्न करून ते निरूपद्रवी होतील असें करावें. या कामीं राजानें स्त्रियांचा उपयोग करावा. स्त्रियांच्या प्राप्तीसाठीं त्यांची आपसांत चुरस व भांडणें लागलीं म्हणजें गळेकापू लोक धाडून त्यांतील मुख्याला ठार करावें.
बारावें अधिकरण. - यास “आबलीयसम्” नांव असून त्यांत असमर्थ राजानें प्रबल शत्रूच्या नाशासाठीं हेरांच्या, गुप्तहस्तकांच्या, गळेकापूंच्या व विषप्रयोग करणार्या इसमांच्या मदतीनें काय काय करावें तें सांगितलें आहे. उदाहरणार्थ, गुप्त हस्तकांनां मांत्रिकांचा वेष घेण्यास सांगून त्यांच्याकडून कामपीडित राजांनां कामोद्दीपक औषधें पण जें वास्तविक प्राणघातक विष असेल तें देवविणें, किंवा राजानें आपल्या हेरांनां व्यापारी, धनगर, किंवा संन्याशी अशा वेषानें सरहद्दीवर पाठविणें म्हणजे ते शत्रूच्या मुलुखांत सर्वत्र संचार करूं शकतात. किंवा मद्यमांसाचे व्यापारी या नात्यानें लोकांनां फसवून विषप्रयोग करूं शकतात. किंवा शत्रुपक्षाचे लोक ज्या देवालयांत किंवा यात्रेच्या जागीं जमत असतील त्या ठिकाणीं येत्राच्या साहाय्यानें जामलेल्या शत्रूपक्षीय लोकांच्या डोक्यांत भिंती किंवा खडक कोसळून त्यांचा नाश होईल असें करणें इत्यादि प्रकारच्या युक्त्या सुचविल्या आहेंत.
तेरावें अधिकरण.- या “दुर्गलम्भोपाय:” नामक अधिकरणांत तटबंदीचीं ठिकाणें काबीज करण्याचें उपाय सांगितले आहेत. जर शत्रूचें एखादें गांव काबीज करणें असेल तर राजानें स्वत:ला अनुकूल असलेल्या लोकांनां उत्तेजन द्यावें आणि शत्रुपक्षीयांच्या मनांत स्वत:च्या सर्वज्ञतेचे व दैवतांच्या अनुकूलतेचे चमत्कार प्रसिध्द करून धास्ती उत्पन्न करावी. सर्वज्ञतेची कीर्ति पसरविण्याकरितां गुप्त हेरांच्या व खबुतरांच्या साहाय्यानें मिळविलेली माहिती प्रसिध्द करावी व ती माहीती दैवी सामर्थ्यानें मिळाली असा बहाणा करावा. दैवतें बोलताता अशी कीर्ति पुढील उपायांनी मिळवावी.-कुंडांतून अग्निदेवता किंवा मूर्तीतून देवता बोलते असें दाखविण्याकरितां अग्निकुंडाखालीं किंवा मूर्तिमधील पोकळ भागांत स्वत:चा हस्तक गुप्तपणें बसवून त्याच्या तोंडून भाषण वदवावें. शत्रुत्व करणार्या राजाचा नाश करण्याच्या युक्त्यांपैकीं एक पुढीलप्रमाणें आहे. (१३.१७२).“शत्रूच्या गांवानजीकच्या एका डोंगरांतील गुहेंत मुण्डन केलेला किंवां जटा वाढविलेला एक कपटवेषधारी संन्याशी बसवावा. त्यानें चारशें वर्षे वय असल्याचें सांगावें व त्याचे बरेचसे शिष्य असावे. त्या शिष्यांनीं फलमूलांची भेट घेऊन प्रधान व राजा यांच्याकडे जावें आणि संन्याशी महाराजांच्या भेटीस त्यांनां बोलवावें. राजा भेटीला आला म्हणजे त्याला संन्याशानें जुन्या राजांच्या व जुन्या स्थळांच्या गोष्टी सांगाव्या आणि म्हणावें “शंभर वर्षें पुरी झालीं कीं, त्या प्रत्येक वेळीं मी अग्नींत प्रवेश करतों आणि पुन्हा तरूण होतों आतां तुझ्या देखत चौथ्या खेपेस मी अग्नींत प्रवेश करणार आहे. परंतु तूं मजजवळ असणें जरूर आहे, तूं तीन वर माग.” राजानें संमति दिली म्हणजे संन्याशानें पुन्हां म्हणावें: “हें पाहाण्याकरितां व आहुति देण्याकरितां सात दिवस व सात रात्रीं बायकामुलांसह तूं येथें राहिले पाहिजे.” याप्रमाणें राजा तेथें राहात असतां त्याचा घात करावा.”
तटबंदीचें ठिकाण काबीज करण्याच्या कपटाच्या योजनांच्या वर्णनाला बरींच प्रकरणें खर्च केल्यावर नंतरच्या एका प्रकरणांत असलें ठिकाण सरळ मार्गानें वेढा घालून कसें हस्तगत करावें तें सांगितलें आहे. नंतर एक महत्त्वाचें प्रकरण आहे त्यांत जिंकून घेतलेल्या प्रदेशांत शांतता कशी प्रस्थापित करावी तें सांगितलें आहे. त्यांत असें आहे कीं, “जेव्हां राजा एखादा नवा मुलूख हस्तगत करतो तेव्हां त्यानें तेथील पराभूत राजाचे दुर्गुण स्वत:च्या गुणांनीं झांकून टाकावे व त्याचे गुण स्वत:च्या अंगचे गुण दुप्पट वाढवून फिके पाडावेत. स्वत:चीं कर्तव्यें नियमितपणानें करून, उदार देणग्या देऊन व नव्या प्रजेला हक्क व मानमरातब देऊन त्यांचें कल्याण साधण्यास झटावें....पोषाख, रीतिभाती, भाषा व रहाणी या बाबतींत त्यानें या नव्या प्रजेचें अनुकरण करावें. तसेंच त्यांच्या देवता, समारंभ, उत्सव, वगैरे धार्मिक बाबी त्यानें पाळाव्या. त्यानें विद्वानांचा व इतर शिष्टांचा सन्मान इनामें, देणग्या किंवा करमाफी देऊन करावा. कैदी मुक्त करावे. कित्येक सणांच्या दिवशीं प्राणिहत्या बंद करावी. आणि भूतदयादर्शक इतर अनेक गोष्टी सुरू कराव्या. “अर्थशास्त्रांत”ल्या या गोष्टी उपयुक्ततेच्या दृष्टीला सोडून नाहींत. मात्र भूतदया, व न्यायबुध्दि या तत्त्वाकरितां या गोष्टी सांगितलेल्या नसून केवळ जिंकलेल्या देशांत शांतता प्रस्थापित करण्याचे उत्तम उपाय म्हणून त्या सांगितल्या आहेत.
चवदावें अधिकरण - याचें नांव “औपनिषदिकम” असें असून ते गुप्त उपाय म्हणजे अभिचार ( जादूटोणा ) यासंबंधाचें असून तें समजण्यास कठीण आहे. त्यांत आगी लावण्याचीं व ठार मारण्याचीं मनुष्याला वेड लावण्याचीं व दुसरे अनेक प्रकारचे रोग उत्पन्न करण्याचीं औषधें, मिश्रणें वगैरे सांगितलीं आहेत. तसेंच एकेक महिना अन्नावांचून राहतां येईल, शरीरवर्ण पालटतां येईल, अग्नीवरून चालत जातां येईल, स्वत:ला व इतरांना अदृश्य बनवितां येईल, मनुष्यास व इतर प्राण्यास झोंप लावतां येईल, इत्यादि प्रकारचे औषधिउपायहि सांगितले आहेत.
पंधरावें अधिकरण.- या “तंत्रयुक्ति: नांवाच्या शेवटच्या अधिकरणांत या एकंदर ग्रंथाच्या रचनेची योजना दिली असून त्यांत दिलेल्या अनुमान पध्दतीची यादी दिली आहे. मीमांसाकारांच्या तर्कपध्दतीत व तत्ववेत्त्याच्या भाष्यांत फक्त पांच किंवा सहाच अनुमानपध्दति आढळतात, तर या ग्रंथांत बत्तीस अनुमानपध्दति, त्यांच्या व्याख्या व या ग्रंथांतीलच उदाहरणें यांसह दिल्या आहेत. या बत्तीस पारिभाषिक शब्दप्रयोगांत कांहीं न्यायपध्दतींतील व तर्कपध्दतीतील शब्दप्रयोगासारखे आहेत. पण त्यावरून अनुमान असें काढावयाचें असेल कीं खिस्तपूर्व ४ थ्या शतकांत तर्कशास्त्राचे नियम अस्तित्त्वांत होते, तर मात्र सदरहू अर्थशास्त्र हा ग्रंथ ख्रि. पू. चवथ्या शतकांतील सुप्रसिध्द राजकारणीं पुरूषानें लिहिला असें मानण्याऐवजीं नंतरच्या कोणी पंडितानें जुन्या ग्रंथांच्या आधारे तो लिहिला असावा असें मानण्यास या शेवटच्या प्रकरणांत पुरावा आहे असें प्रो. विंटरनिझ यांचें मत आहे.
कौटिलीय अर्थशास्त्राच्या या विषयवार पहाणीवरून असें सहज दिसून येईल कीं हा ग्रंथ अप्रतिम असून भारतीय वाङ्मयांतील दुसर्या कोणत्याहि ग्रंथापेक्षां प्राचीन भारताचा सार्वजनिक व्याप व सांस्कृतिक स्थिति यांवर यानें अधिक प्रकाश पाडला आहे. मोठमोठे पंडित धरतात तें ह्मणजे विख्यात चंद्रगुप्त राजाच्या मंत्र्यानें हा रचला हें जर खरें असेल तर हें साहित्य नि:संशय अमोलिक आहे. व इ. स. पू. ४ थ्या शतकांतला हा धरावा लागेल. शिवाय इतक्या प्राचीन काळच्या भारतीय वाङ्मय व संस्कृति या संबंधींचा हा पहिला असा एकच ग्रंथ म्हणतां येईल कीं, ज्याचा रचनाकाल नक्की करतां येतो. प्रथमत: हा कौटिल्याचाच ग्रंथ असावा असेंच मत होतें. उदाहरणार्थ, प्रथम योकोबी [ भारतीय तत्त्वज्ञानाचा प्राचीन इतिहास”, एस बीए १९११, ७३२ इ, कौटिल्यावरून वाङ्मय व भाषा यांचा इतिहास आणि संस्कृतिविषयक विवेचन”. एस् बीए १९११ ९५४; इ., “कौटिलीय अर्थशास्त्राच्या खरेपणाविषयीं खात्री” एस् बीए १९१२, ८३२ इ. ; झेड् डीएम् जी. ७४, १९२०;२४८इ २५४ इ. या लेखांत ] या ग्रंथाच्या चाणक्यकर्तृत्वाविषयीं अनुकूल मत देता झाला, अनेक याकोबीमत ग्राह्य धरतात; [ उ.चार्पेंटियेर डब्ल्यू. झेड. के.एम.२८, १९१४, २११; स्मिथ.अलीं हिस्ट्री १५१ इ.; फ्लीट-इंट्रोडक्टरी नोट टु शामशास्त्रीज् इंग्लिश ट्रान्सलेशन ( १९१५ ) सौली-इंद्रोडुझिओने पा. १६ इ., गार्ब-सांख्यफिलॉसॉफी, पा. ३ इ. ] पुढील भारतीय पंडितांना कौटिल्याच्या या ग्रंथ संपादनाबद्दल मुळींच शंका नाहीं. [ शामशास्त्री ( ग्रंथाच्या संस्कृत व भाषांतराच्या प्रतींतील इंग्रजी प्रस्तावना ); एन्. एन्. लाहा-स्टडीज् इन्. एन्शंट हिंदु पॉलिटी (लंडन १९१४) आणि राधाकुमुद मुकर्जीची लाहाच्या ग्रंथावर प्रस्तावना; हर प्रसादशास्त्री, जेएएस् बी ६,१९१०, ३०५ इ. आणि के.पी. जयस्वाल, इं.-अँ. ४२, १९१३, ३०६. त्याच प्रकारचें मत व्यक्त करणारे इंग्रज लेखकहि आहेत. पार्गिटर जे आर् ए एस् १९१७१५७ इ., १५९ इ.; एल्. डी. बार्नेट, अँटिक्किटीज् आँफ इंडिया, लंडन १९१३, पॅरा ९८. ]
अशा स्वरूपाचा ग्रंथ उपलब्ध असल्याची भावना आल्हादकारक आहे यामुळेंच आपल्या निर्णयबुध्दीवर भावनांचा पगडा न बसूं देणें व या ग्रंथाचा रचनाकाल इ. स. पू. ४ थें शतक हा आहे कीं नाहीं हें फार बारकाईनें पाहणें अत्यवश्यक आहे. हिलेब्रॅन्ट, [ झेड्डीएमजी. ६९, १९१५, ३६० इ., आणि जी जीए १९१५, ६२९ यांशी तुलना करा. ] म्हणतो:-या सबंध ग्रंथाचा एकटा कौटिल्यच कर्ता असेल असें आपण समजतां कामा नये. त्याच्या शाखेबरोबर याची उत्पत्ति झाली. हर्टल ( तंत्राख्यायिकाचें भाषांतर १ पान, २२ ) हा हिलेब्रॅन्टप्रमाणेंच कौटिलीय अर्थशास्त्र एकदम रचलें गेलें नाहीं असें समजतो पण त्याचें असें मत दिसतें कीं, या ग्रंथाचा व भाष्याचा मूलांश चाणक्याच्या काळींच प्रादुर्भुत झाला यांत शंका नाहीं. ओल्डनबर्ग १९१३ सालात म्हणतो कीं कौटिलीय हें इ. स पू. ३०० च्या सुमारास चाणक्याकडून किंवा त्याच्या नंतरच्या पंडिताकडून रचले गेले, पण पुढें [ एन् जीजडिब्ल्यू. १९१८ यांत ] त्याची एतद्विषयक जास्त अश्रध्दा दिसून येते. जॉलीला प्रथम हा ग्रंथ चाणक्याचा वाटला ( “राजनीतीवर एक प्राचीन भारतीय ग्रंथ, जर्मन लेख १९१२ ) पण हळूहळू त्याच्या कालविषयीं व खरेपणाविषयीं त्याला संशय येत चालला ( झेड्डीएमजी ६८, १९१४, ३५९ ) व १९१९ मध्ये तो कौटिलीयाचा काल इ. स. ४ थें किंवा ५ वें शतक असा निश्चित करितो ( “ तौलनिक न्यायतत्तव शास्त्राचें नियतकालिक जर्मन. ३७ पा. ३२९ ). ए. बी. कीथ ( जे. आर्.ए.एस्. १९१६, १३० इ.; १९२०, ६२८ ) आणि डॉ. भांडारकर ( प्रोसीडिंग्ज् अँड ट्रन्झॅक्शन्स् ऑफ् दि फर्स्ट ओरिएंटल् कॉन्फरन्स् पुणें १९२० ) यांनीं या ग्रंथाच्या खरेपणाविषयीं संशय घेतला आहे व चाणक्याचें संपादन अमान्य केलें आहे.
आपणाला कौटिल्याविषयीं कितपत माहिती आहे ? पुराणें ( भविष्यकथनाचें स्वरूप देऊन ) असें सांगतात कीं, कौटिल्यानें नंदरावंशाचा उच्छेद करून चंद्रगुप्त मौर्याला राज्याभिषेक केला. [ एफ्. ई. पार्गिटेर-दि पुराणाज् ऑन दि डिनॅस्ट्रीज् ऑफ दि कलि एज”, ] कर्ता पुरूष या नात्यानें प्रसिध्दि असली तरी आचार्य किंवा ग्रंथकर्ता म्हणून पुराणें कौटिल्याचें मुळींच वर्णन करीत नाहींत. चंद्रगुप्त इ. स. पू. ३२२ च्या सुमारास राज्यारूढ झाला; इ. स. पू. ३०२ मध्यें त्याच्या दरबारीं मेगॅस्थिनीज हा ग्रीक मनुष्य सेल्युकस निकेटारचा वकील म्हणून आला. त्यानें आपल्या अनेक वर्षांच्या परदेशवासाचा इतिहास लिहून ठेवलेला उपलब्ध आहे. हा ग्रीक मेगॅस्थिनीज, किंवा पुढचे प्राचीन ग्रंथकार या प्रसिध्द चंद्रगुप्ताच्या मंत्र्यासंबंधीं कांहिंहि लिहीत नाहींत हें चमत्कारिक नव्हे का ? मेगॅस्थिनीजच्या इतिहासाशीं अर्थशास्त्र किती जरी बारकाईनें ता़डून पाहिलें तरी अर्थशास्त्रकर्ता मेगॅस्थिनीजचा समकालीन होता असें मानण्याला मुळींच आधार मिळत नाहीं. [आर. मुकर्जी यांची लाहा यांच्या “ स्टडीज् इन् एन्शंट हिंदु पॉलिटी” याला प्रस्तावना, पहा. ] मुकर्जी आणि स्मिथ ( अलीं हिस्ट्री ) हे आपणाला मेगॅस्थिनीज आणि कौटिल्य यांमध्यें असें साम्य सापडलें असें समजतात. एच्. जी. रॉलिन्सन ( इंटरकोर्स बिटीन इंडिया अँड वेस्टर्न वर्ल्ड. केब्रिज १९१६ ), हे, कौटिल्य आणि मेगॅस्थिनीज् कांहीं अंशीं एकमेकांशीं जुळतात असें सिध्द करण्याला लाहाचा आधार घेतात. कांही बाबतींत असें साम्य आहे खरें, पण ओटो स्टीनप्रमाणें ( “मेगॅस्थिनीज्, अँड कौटिल्य”, एस्. डब्ल्यू. ए. १९२१ ) ग्रीक रिपोर्टांची कौटिलीयांशीं पूर्ण तुलना केल्यास, महत्त्वाच्या बाबतींत साम्यापेक्षां विरोधस्थळेंच जास्त निघतील. शिवाय, अशोककालीन स्थिति व कौटिलियांत वर्णिलेली स्थिति यांमध्यें म्हणण्यासारखें साम्य आढळत नाहीं. डॉ.थामसनें जेआर्एएस् १९१५, यांत जे उतारे घेतले आहेत त्यांवरून कांही सिध्द होत नाहीं. महाभाष्यांत मौर्यांचा व चंद्रगुप्ताच्या सभेचा उल्लेख केलेला आहे, पण कौटिल्याविषयीं तें कांहींच बोलत नाही. कौटिल्याविषयीं जी इतर माहिती आढळते ती केवळ दंतकथा व कादंबरीवजा म्हणतां येईल; उदा. “मुद्राराक्षस” नाटकांतील कथा सोमदेवाचें “कथासरित्सागर” आणि हेंमचंद्राचे ‘परिशिष्टपर्वन्’ यांतील कथा या ठिकाणीं चाणक्य हा बहुतेक वेळां धूर्त व कपटी मुत्सद्दी असा दाखविला असून, या स्वभावाच्या कोणत्याहि कथा त्याच्यावर लादलेल्या दिसतात. आणि या कथांतून सुध्दां कौटिल्याची आचार्य किंवा ग्रंथकर्ता म्हणून कांहींच कामगिरी सांगितली नाहीं. मुद्राराक्षसाच्या पहिल्या अंकांत फक्त कौटिल्य आपल्या शिष्यासह प्रवेश करितो असें आचार्यस्वरूप दाखविलें आहे खरें, तथापि कौटिलीय अर्थशास्त्राच्या प्रधान भागांत नंद, मौर्य, राजा चंद्रगुप्त किंवा तत्कालीन स्थिति यासंबंधीं कोठेंच उल्लेख आढळत नाहीं. मुकर्जींना कांहीं ठिकाणीं ( लाहा. पा. ३३ पहा ) चंद्रगुप्तासंबंधीं उल्लेख दिसतात. पण ते कोणालाहि कळण्यासारखे नाहींत असें विंटरनिझला वाटतें.
खुद्द अर्थशास्त्रांत तो कौटिल्याचा ग्रंथ असल्याचें प्रतिपादिले आहे; १. १ आणि २.१० यांच्या शेवटच्या श्लोकांत व ग्रंथाच्या शेवटीं: म्हणजे ज्या ठिकाणीं “ ज्यानें झटकन् व उत्कण्ठापूर्वक नंदराजाकडे असलेली भूमि, तरवार व ज्ञान उदधृत केलें तो” असा नंदनाशाबद्दलचा उल्लेख आहे त्या स्थळीं याचा दाखला सांपडेल. “उद्धृत केलें” ( उद्धृतानि ) याचे येथें तीन निरनिराळे अर्थ आहेत. त्यांचा आशय हा: “ज्यानें तातडीनें निश्चित केलेलें, ज्ञान ( जुन्या ग्रंथांवरून हें अर्थशास्त्र ) बाहेर काढलें, ज्यानें म्यान्यांतून तरवार बाहेर काढिली आणि ज्याने नंद राज्याच्या हातून त्याच्याच मालकीची जमीन हिसकावून घेतली” असे आहेत. पण ज्यांत हे श्लोक आहेत ते अध्याय जरी ग्रंथाच्या मूळ भागांतले असले व सरतेशेवटीं जोडलेले नसले ( सरते शेवटीं जोडलेले असावे असेंच विंटरनिझला संभवनीय दिसतें ) तरीसुध्दां अर्थशास्त्र हें कौटिल्याचें आहे असें होणार नाहीं; तें कदाचित् त्याचें असूं शकेल असें म्हणतां येईल. मूळ ग्रंथांत देखील कर्ता चाणक्य किंवा विष्णुगुप्त असें न म्हणतां केवळ कौटिल्य या नांवानें नेहमीं त्याचा उल्लेख आढळतो व “कौटिल्य” हें नांवच मुळीं तें ग्रंथकर्त्याचें खरें नांव नसावें असें उघड सांगतें. “कौटिल्य” म्हणजे खोटेपणा, ढोंगीपणा. कौटिल्य नांवांतील हा अर्थ मुद्राराक्षसाच्या कर्त्याला माहीत होता ( १ श्लो. ७. १ आणि ४ श्लो २ पहा ] व म्हणून चंद्रगुप्ताच्या मंत्र्यानें आपणा स्वत:ला हें नांव लावून घेतलें असेल असा मुळींच संभव दिसत नाहीं असें विंटरनिझ समजतो. पण एखाद्या ग्रंथकारास अशा नांवाची आवड असणें शक्य नाहीं असेंहि म्हणत नाहीं. याकोबीच्या मतें या ग्रंथाचा कर्ता पंडित नसून एखादा मुत्सद्दी असावा. तो त्याला “भारतांतील बिस्मार्क” असें नाव देतो व फ्रेडरिक दि ग्रेटप्रमाणें त्यानें फुरसतीच्या वेळीं किंवा म्हातारपणीं आपल्या आयुष्यांतील कामगिरीवर एक औपपत्तिक ग्रंथ लिहिला असें याकोबी म्हणतो. पण ही याकोबीची उपपत्ति अर्थशीस्त्रांतील विषयांवरून खरी असेल असें विंटरनिझला वाटत नाहीं. कां कीं, पंडितांनीं रचलेल्या इतर शास्त्रीय ग्रंथांतल्याप्रमाणें या अर्थशास्त्रांत आपणाला तीच व्याख्यांची आवड, पांडित्यदर्शक वर्गीकरण, प्रकरणें आणि सूत्रें आढळून येतात. शिवाय नीतिसूत्राची त्यावेळीं उपलब्ध असलेली व प्रगत अशी परिभाषा या ग्रंथांत गृहीत धरलेली दिसतें. नीतिशास्त्राभ्यासाची एक फार पुरातन कालापासून चालत आलेली शाखा गृहीत धरल्यासच, आचार्य, किंवा ( मानव, बार्हस्पत्य, औशनस यांसारख्या ) कांहीं शाखा, किंवा ( भारद्वाज, विशालाक्ष, पराशर यासारखे ) व्यक्तिश: लेखक यांचीं मतें कौटिल्याच्या मतांशीं तुलना करण्याकरितां जीं मांडिलीं आहेत. तीं व त्यांवरील चर्चा यांचा अर्थ आपणांस लावतां येईल. अशा चर्चांच्या शेवटीं जेव्हां “कौटिल्य असें म्हणतो” या शब्दांत प्रमाणभूत मत सांगितलें असतें तेव्हां या ग्रंथाचें कर्तृत्व कौटिल्याकडे जाते हे खोटे नाहीं, तथापि ही कर्त्यांचें नांव सांगण्याची पध्दत बहुधा सूत्र ग्रंथांतच आढळतें. हे सूत्रग्रंथ वैय्यक्तिक लेखकाचे म्हणून मानले जात नाहींत. उदाहरणार्थ, पूर्वमीमांसासूत्रात जैमिनीचें, वेदांत सूत्रांत बादरायणाचें व बौधायनधर्मसूत्रांत बौधायनाचें नांव आलेलें आहे. येणेंप्रमाणें विंटरनिझ विवेचन करतो व कौटिलीय अर्थशास्त्र कौटिल्याचे जें समजण्यांत येतें तें केवळ एकाच कारणाकरितां होय असें म्हणतो व तें कारण म्हणजे हा दंतकथांतील चंद्रगुप्त राजाचा मंत्रि शासनशास्त्राचा उत्पादक नसला तरी एक नमुनेदार गुरू होता एवढेंच दाखवितो. चाणक्य किंवा कौटिल्य हा सुसंस्कृत धूर्त व कावेबाज मंत्र्याचा आदर्श; पण आपल्या राजाशीं फार इमानी व एकनिष्ठ असा पुरूष म्हणतां येईल व अशाच पुरूषाचा नमुना आपल्याला भासापासून पुढच्या नाट्यकथावाङ्ममयामध्यें नेहमीं आढळतो, व यामुळें पुढील काळीं सर्व नीतिवाक्यें मागें चाणक्यापर्येंत नेऊन भिडविलीं आहेत.
या मूळ ग्रंथांतील विषयांकडे दृष्टि फेंकल्यास आपणांस असें दिसून येईल कीं, शासनशास्त्र ( संकुचित अर्थानें ) या विषयाखेरीज व्यवहारातील अनेक विषय यांत भरले आहेत. या विषयांच्या विवेचनांत कलाकौशल्य, कृषिकर्म, खनिखोदन युध्दशास्त्र इ. यासारख्या क्षेत्रांतील सविस्तर ज्ञान तत्कालीं पूर्णपणें लोकांमध्यें असल्याचें गृहीत धरलेलें आहे, व हें ज्ञान त्या प्राचीन काळींसुध्दां एकट्या माणसाला आपलेसें करणें अगदीं अशक्य होतें. आपण अशी कल्पना करूं या कीं, या विभागांसाठीं कौटिल्यानें निरनिराळे अधिकारी आपल्या मदतीस घेतले होते. या तर्हेचे याकोबीचे मत होतें आणि तें कामंदकीय समजुतीशीं विसंगत नाहीं. हर्टल व झार्मोटियर याचेहि मत तसेच दिसतें. अर्थशास्त्रांतून ज्यानें नीतिशास्त्राचें अमृत काढलें त्या प्रसिध्द आणि शहाण्या विष्णुगुप्ताचा सत्कार असो” या काभंदकीय उतार्यावरून त्या ग्रंथकाराची कौटिल्य हा पूर्वकालीन ज्ञानाचा संग्राहक व कर्ता मुत्सद्दी होता अशी समजूत व्यक्त होते. कौटिल्यामध्ये येणारे अनेक नवीन शब्द अर्थशास्त्रांतर्गत विविध शास्त्रीय शाखांमध्ये विवेचिले आहेत. [हर्टल डब्ल्यू झेडकेएम २५,१९१०,४१६ इ. याकोबी एसबीए १९११, ९५४ इ. शार्पेंटियर डब्ल्यूझेडकेएम २८,१९१४,२११ इ. ] विंटरनिझ्झच्या मतें निरनिराळ्या शाखांवरचे स्वतंत्र ग्रंथ त्या काळीं असून अर्थशास्त्राच्या संपादकानें ते काहीं थोडा फरक करून आपल्या ग्रंथांत अंतर्भूत केले, असें म्हणणें जास्त सयुक्तिक दिसेल. या म्हणण्याचे प्रत्यंतर म्हणजे तेच तेच विषय पुष्कळ अध्यायांतून आलेले नेहमीं आढळतात. शिवाय वरील विधान गृहीत धरल्यास अर्थशास्त्राच्या उदयापूर्वीं केवळ शासनशास्त्रांतच नव्हे, तर विविध कला व्यापार व व्यवहार यांच्या शांखांतहि बरेच दिवसापासून वाङ्मयीन चळवळ चालू होती, असे निदर्शनास येईल. आपला हा ग्रंथ इ. स. पू. ४ थ्या शतकांतला आहे असें म्हणणें, थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे कांहीसें अशक्य कोटींतल्यासारखे विंटरनिझ्झला वाटतें.
कौटिलीयाचा काल निश्चित करण्यास त्यांत प्राचीन अर्थशास्त्र वाङ्मयाखेरीज दुसरा कोणता वाङ्मयीन वर्ग ठाऊक असल्याबद्दल उल्लेंख आहेत हें पाहिलें पाहिजे. वेद आणि वेदांगाखेरीज वर्णनपर व उपदेशपर महाकाव्य-वाङ्मय माहीत असावेंसें दिसतें. महाभारत व रामायण यांतील मुख्य कथानकें तर पूर्वींपासून माहीत होतीच; पण या दोन महाकाव्यांत न आढळणार्या ज्या काहीं कथा आहेत, त्या प्राचीन वैदिक व बौध्दवाङ्मयांतून उद्धृत केल्या असाव्यात. तथापि येथून तेथून ब्राह्मणी कथांचे उल्लेख केलेले दिसतात. कौटिलीयांत कोठेंहि त्या काळीं एकादें काव्य किंवा नाटक अस्वित्वात असल्याचा चांगला दाखला मिळत नाहीं.
तंत्राख्यायिक, दशकुमारचरित आणि वात्स्यायनाचें “न्यायभाष्य” यांत कौटिलीय अर्थशास्त्र हा सुप्रसिध्द व चंद्रगुप्ताच्या मंत्र्यानें केलेला असा ग्रंथ असल्याचें मानलें आहे. कौटिलीयाचें याज्ञवल्वय आणि नारद यांच्या धर्मशास्त्रांशीं मागें दाखविलेलें साम्य, त्याचप्रमाणें कौटिलीयांत किंवा त्यांत उल्लखिलेल्या एखाद्या कलविषयक ग्रंथांत किमयेचें आढळणारें ज्ञान आपण लक्षांत घेतल्यास विंटरनिझ्झच्या मतें असें म्हणावें लागेल कीं, हें अर्थशास्त्र प्राचीन आहे तरी इ. स. ३ र्या शतकाहून प्राचीनतर नाहीं. जर न्यायभाष्य आणि तंत्र्याख्यायिक इ.स. ४ थ्या शतकांत टाकिलीं ( व हेंच अधिक संभवनीय आहे ) तर कौटिलीय त्याच्या जरा अलीकडे येईल. जैन संप्रदायाच्या नंदीसूत्र आणि अनुयोगद्वार यांतील ब्राह्मणग्रंथांच्या यादींत “कोडिल्लयम” असा जो नामनिर्देश आहे, त्यायोगें विंटरनिझ्झच्या दृष्टीनें जास्त कांही सिध्द होत नाहीं. याकोबी [ झेडडीएमजी ७४,२५४] इ शार्पेंटर ( उत्तराध्यायन प्रत प्रस्ता. पा. २ इ. )यांपैकीं कोणीहि ही यादी खिस्तापूर्वींची असल्याचे सिध्द करीत नाहींत. जैन संप्रदायाचा कांहीं भाग नंदांच्या काळचा असला तरि स्वतंत्र लेखांचा काळ देवर्ध्दि ( इ. स. ४ थें शतक ) याच्या मागें जाईल इतका पुरावा आपणापाशीं नाहीं. कालिदासाला अर्थशास्त्र माहीत असणें शक्य आहे; पण एखाद्या लेखकानें ( एच ए-शहा-“कौटिलीय अँड कालिदास, जर्नल ऑफ दि मिथिक सोसायटी, बंगलोर पु. १०.११ ) कौटिल्य व कालिदास यांच्यांत साम्य आहे इतकेंच नव्हे तर दोघेहि एकच आहेत असें सिध्द करूं लागावें हें विलक्षण आहे !
जरी इ स. पू. ४ थ्या शतकांतील खात्रीनें असणारा ग्रंथ आपल्यापाशीं आहे ही आपली आशा आतां खोटी ठरली, तरी जितका जुना म्हणून तो सिध्द होतो तितक्या जुन्या काळचा ग्रंथ आपल्या संग्रहीं असणें कांहीं कमी समाधानाचें नाहीं असें विंटरनिझ्झ मत देतो.
कौटिलीय अर्थशास्त्राच्या अंतरंगावरून असें खात्रीपूर्वक वाटतें कीं त्याच्या कर्त्याची धार्मिक व प्रापंचिक दृष्टी नि:संशय ब्राह्मणी असून त्यानें आदर्शभूत मानलेल्या राज्यांत ब्राह्मणांचे कार्यक्षेत्र बरेंच व्यापक दिलें आहे. राजा आपलें कर्तव्य बजावीत असतांना त्याच्याभोंवतीं उपाध्ये व धार्मिक माणसें नेहमीं असत. व दरबारी अधिकारी म्हणून त्यांना प्राप्ति असेच; पण राजाचा अधिकार निश्चित करण्याची किंवां सरकारी खजीना पुन:समृध्द करण्याची आपत्ति येते, त्याप्रसंगीं लोकांच्या धार्मिक भावना कितीहि दुखविण्यास हें ब्राह्मणी वर्चस्व आड येत नसे ही गोष्ट लक्षांत ठेवण्याजोगी आहे. या प्रसंगीं मॅकिअॅव्हेलीला कौटिल्याप्रमाणें आपल्या हेतूच्या सिध्दयर्थ कोणतीहि गोष्ट फार वाईट अशी वाटत नसे तथापि त्याचा स्वभाव एरव्हीं कट्टा धार्मिक असाच असे. हें साम्य सोडून दिल्यास कौटिल्याला “भारताचा मॅकिअॅव्हेली” हें नेहमीं लावलें जाणारें विशेषण केवळ फार अल्पांशानें खरें म्हणतां येईल. जोसेफ कोलहर कौटिल्याला “हाब्जचा भारतीय प्राग्भावी” असें जें म्हणतो त्यांत तर अगदींच थोडें सत्य आहें “बुक ऑफ दि प्रिन्स” या पुस्तकाप्रमाणें अर्थशास्त्रांतहि राजसत्ताक राज्याखेरीज इतर कोणत्याहि प्रकारच्या राज्याची कल्पना आढळत नाहीं आणि राज्यरक्षणाच्या दृष्टीनें त्यांकडे पाहिल्यास हे दोन्हीहि ग्रंथ व्यावहारिक म्हणतां येतील. तथापि या दोहोंत एक मोठा फरक आहे. तो हा कीं, मॅकिअॅव्हेली हा प्रामुख्यानें इतिहासकार म्हणून वावरत असून तो आपले सिध्दांत इतिहासज्ञानावरून निष्कर्षिंत करितो; पण ही गोष्ट आपल्या “भारतीय मॅकिअॅव्हेली” च्या बाबतींत लागू नाहीं, कारण तो नुसता सिध्दांती असून, “राज्याच्या संरक्षणासाठीं कोणतीं साधनें उपयोगी आहेत व कोणतीं नाहींत ? असेंच फक्त तो विचारतो. कांहीं अध्याय ( उदा. अधिकार्यांचे पगार, नगररचना व व्यवस्था इ. ) वाचून आपली अशी कल्पना होते कीं वस्तुस्थितीवरून कर्त्यान आपले सिध्दांत बसविले असले पाहिजेत व म्हणून या अध्यायांचा, कदाचित् सबंध ग्रंथाचा, कर्ता कोणी लहान सहान अधिकारी नसून राजाच्या पदरचा कोणी श्रेष्ट मन्त्री असावा, असेंच शक्य वाटूं लागतें.
१९०९ मध्यें अर्थशास्त्राची पहिली आवृत्ति प्रसिध्द झाल्यानंतर कीथ यानें, अर्थशास्त्रकर्ता विष्णुगुप्त व कामसूत्रकर्ता वात्स्यायन हे एकच होत असें प्रतिपादन केलें. त्यानें या विधानास हेमचंद्राच्या अभिधानचिंतामणींतील व यादवप्रकाशप्रणीत वैजयंतींतील अनुक्रमें वात्स्यायनो मल्लनाग: कौटिल्यश्चणकात्मज: | व वात्स्यानस्तु कौटिल्यो विष्णुगुप्तो वराणकः | या श्लोकांचा आधार दिला आहे. तसेंच भोजराजप्रणीत नाममालिकेमध्यें वात्स्यायन शब्दाच्या ऐवजी कात्यायन शब्द आहे: कात्यायनस्तु कौटिल्यो विष्णुगुप्तो वराणक: | हा कात्यायन शब्द प्रत्यक्ष भोजानेंच घातला किंवा लेखकप्रमादानें पडला आहे व वात्स्यायन व कात्यायन व कौटिल्य हे सर्व एकच काय असे प्रश्न उत्पन्न होतात. जर भोजानेंच कात्यायन शब्द बरोबर घातला असेल तर वात्स्यायन व कौटिल्य भिन्न होत हें उघड होतें; परंतु जर वात्स्यायन पाठ बरोबर असेल. तर कौटिल्य हा नंदसमकालिक होता इत्यादि विष्णुपुराणादिकांत आढळणारीं वाक्यें निरर्थक ठरतील. ‘मौर्यचन्द्रगुप्तार्थं चाणक्योऽर्थशास्त्रं विरचयामास’ या दंडीच्या वाक्यावरून चामक्याचा काल ख्रि. पू. चवथें शतक दर्शविला जातो. ‘कर्तर्या कुन्तलश्शातकर्णिश्शातवाहनो महादेवीं मलयवतीं जघान’ या कामसूत्रांतील सूत्रावरून वात्स्यायनाचा काल ख्रि.श. १३७ ते २०९ या सुमारास येतो. वात्स्यायन न्यायसूत्रभाष्यांत अर्थशास्त्रांतील वाक्यांचें अनुवादन करूनहि अर्थशास्त्र आपण रचलें असें कोठें म्हणत नाहीं. कामसूत्रामध्येंहि अर्थशास्त्रांतील वाक्यासारखीं वाक्यें पुष्कळ आढळतात. यशोधरानें कामसूत्रभाष्यांत वात्स्यायनाचें मल्लनाग असें अपरनाम दिलें आहे; परंतु कौटिल्य वगैरे नामनिर्देश कोठेंच केला नाहीं; पण उलट ‘कौटिल्येन अर्थशास्त्रे उक्तम्’ इत्यादि अर्थशास्त्र हें कौटिल्याचें आहे असें दाखविणारे उल्लेख अनेक ठिकाणीं केले आहेत व कांहीं वाक्यें अर्थशास्त्रांतील उध्दृत केलीं आहेत. कोटिल्य पाणिनिव्याकरणानुगामी नाही; परंतु वात्स्यायन आहे यावरून तो उत्तरकालीन असावा. बृहज्जातकावरील व्याख्येंत ‘विष्णुगुप्तेनापि चाणक्यापरनाम्ना असा उल्लेख आहे; परंतु ‘विष्णुगुप्तचाणक्यावाहतु:-कस्याशेति’ यावरून विष्णुगुप्त व चाणक्य हे दोन भिन्न होते असें सूचित होतें; परंतु ज्योतिर्विद् विष्णुगुप्त हा अर्थशाखकार विष्णुगुप्ताहून भिन्न होता, हें बृहत्संहितेवरूनहि ( २.४ ) उघड होतें. नन्दिसूत्रकारालाहि कौटिलीय अर्थशास्त्र माहीत होतें. विष्णुगुप्ताच्या नीतिकथा कौटिल्याच्या पूर्वीपासून ख्रि. पू. पांचव्या किंवा सहाव्या शतकापासून प्रचारांत होत्या व तो विष्णुगुप्त कोटिल्याहून निराळा होता, हें कौटिल्यानें त्या गोष्टींचा निर्देंश करणारीं ‘दीर्घ तृण’ ‘शीतशाटी’ इत्यादि पदें वापरलीं आहेत, यावरून स्पष्ट होतें. तसेंच चाणक्यसूत्रें म्हणून ग्रंथाच्या शेवटीं सूत्रें चाणक्याचीं नसून त्यांचा अर्थशास्त्राशीं कांहींहि संबंध नाहीं. [शामशास्त्री दुसर्या आवृत्तीची प्रस्तावना ]
कामंदकि किंवा कामंदक याचा “नीतिसार” [ राजेंद्रलाल मित्रांनीं बिब्लि. इं. मध्यें ( १८४९-१८८४ ). गणपतिशास्त्री यांनीं शंकराचार्यभाष्यासह नं.टी.एस्.एस्.१४मध्यें ( १९१२ ) हें प्रसिध्द केलें. भाषांतर इंग्रजींत मन्मथनाथ दत्त यांनीं ( वेल्थ ऑफ इंडिया, कलकत्ता.१८९६) व इटालियनमध्यें फॉर्मिची ( जी.एस.ए.१ पु.१२-१७ ) यांनीं केलेलें आहे. ७ व्या सर्गाचें भाषांतर ( इ.अँ.४ १८७६, ११६, इ.) तालिब उलइल्म. यांनीं केलें आहे.] हा ग्रंथ कौटिलीय अर्थशास्त्रानंतरचा इतकेंच नव्हे तर जरा तो निराळ्या स्वरूपाचा आहे. हा सबंध पद्यमय असून, एखादें उपदेशपर काव्य व हस्तपुस्तक यांच्या मधलें कांहींतरी एक लिखाण, असें याला म्हणावें लागेल. कौटिलीयांतल्या प्रमाणें शास्त्राचा कोरडा स्वर यांत काढला नसून, याचा कांहीं भाग महाभारतादि महाकाव्यांत कोठेंकोठें आढळणार्या झणझणीत नीतिबोधाच्या स्वरूपाचा नि:संशय वाटतो. काव्यवाङ्मयाप्रमाणें याचे सर्ग ( त्यांबरोबरच प्रकरणें ) पाडले आहेत व भाष्यकाराच्या मतें याचें स्वरूप एखाद्या महाकाव्याप्रमाणें आहे. [याकोबी एस्.बी.ए, १९१२,८३६, पहा ]. याच्या प्रास्ताविक श्लोकांत कर्ता विष्णुगुप्त याची, ‘ज्यानें नंदांनां रसातळास पोंचविलें, आपल्या कारस्थानाचा जोरावर चंद्रगुप्ताकरितां जग जिंकलें आणि अर्थशास्त्रांच्या महोदधींतून नीतिशास्त्रामृत उध्दृत केलें’ अशा शब्दांत मोठी प्रशंसा करून, आपण या आचार्याच्या शिकवणीला अनुसरून राजशास्त्रांत पारंगत असणार्याचीं वचनें संक्षिप्तरूपानें आतां मांडणार आहोंत असें आश्वासन देतो. दुसर्या एके ठिकाणीं तो कौटिल्याला “गुरू” या शब्दानें संबोधितो. पण या ठिकाणीं गुरू याचा अर्थ नेहेमीं प्रमाणें “शिक्षक” असा नसून, ज्याचा ग्रंथ आपल्याला पुष्कळ अंशी उपयोगी पडला असा मोठा “पंडित” या अर्थानें गौरवपर वापरला आहें. कारण, चंद्रगुप्ताचा मंत्रि व कामंदकीचें “नीतिसार” यामध्येंच केवळ नव्हे तर कौटिल्याचें म्हणून समजलें जाणारें “अर्थशास्त्र” आणि कामंदकीचें “नीतिसार” यांच्या कर्त्यामध्येंहि बहुधा अनेक शतकांचा काल लोटला असला पाहिजें. तंत्राख्यायिकांत कौटिलीयाचा अधार घेतला आहे तर पंचतंत्रांतून नीतिसाराचा उल्लेख सांपडतो. [हर्टेल झेड् डी. एम. जी. ६९, २९३,इ. ] हें लक्षांत ठेवण्यासारखें आहें भवभूतीनें “मालतीमाधव” नाटकांत प्रेमाच्या व्यवहारांतली स्त्री-मुत्सदी व परिव्राजिका कामंदकी नांवानें जी योजली ती मुद्दाम कामंदकीच्या या ग्रंथाची लोकांनां आठवण देण्याकरितांच होय; कारण त्याच्या वेळीं हा ग्रंथ फार सुप्रसिध्द तरी असला पाहिजे किंवा त्याचा कर्ता भवभूतीचा सभकालीन असून त्याचा गारैव करण्याची नाटककाराची इच्छा असावी. वामन ( सुमारें इ.स. ८०० ) ज्या एका श्लोकाचा [ काव्यालंकारवृत्ती ४, १, २. शिवाय पांडुरंग वा. काणे इंअँ. पु. ४०, १९११, २३६ आणि जॉली झेड.डी.एम. जी. ३४८ इ. पाहा. ] उतारा घेतो त्यांत कामंदकि नीति” याचा उल्लेख आहे. ज्याअर्थी दंडीला अद्याप “नीतिसार” माहीत नव्हतें [ दशकुमारचरिताच्या आरंभीं कामंदकीचा जो उल्लेख आहे त्यावरून काहीं सिध्द होत नाही; कारण तो उतारा मागाहून जोडलेल्या पूर्वपीठिकेंतील आहे. दंडी कौटिल्याला मान्य असणार्या नीतिशास्त्रावर इतकें सविस्तर विवेचन करितो ( दशकु. ८ वाउछवास ) व शुक्ल, विशालाक्ष इ. अर्थशास्त्रकाराचीं नावें घेतो पण कामंदकाचें नांगहि घेत नाहीं ही वस्तुस्थिति काय दर्शविते ? दंडीला कामंदकि मुळींच माहीत नव्हता असें होत नाहीं का ? त्या अर्थी आपणाला मोठ्या कसोशीनें या ग्रंथाची उत्पत्ति इ. स. ७०० आणि ७५० यामध्यें टाकिता येईल. बलिद्वीपांतील कविवाङ्मयांत “ कामंदकि नीति” नावाचा एक ग्रंथ आहे ( एस् आर् फ्रेडरिक, इंडि. स्ट.२. १३३, १४५, जे-आर्-ए-एस १८७६, १८८. ज्ञानकोश १.२१२. ) तोहें विधान खो़डू शकत नाहीं कारण जरी फा-हिआनला जावामध्यें इ.स. ४१३ त ब्राह्मण आढळले, तथापि कविवाङ्मयाचा सुवर्णकाल इ. स. १० व्या शतकात पडतो.] ई. कुहनचें “दक्षिण व पूर्व आसमंतातील प्रदेशात आर्यभारताचें वर्चस्व “या नावाचें पुस्तक पहा ( म्युनिच १९०३, पान १९ ) ]. कालिदासाला कामंदकीचा हा ग्रंथ परिचित होता हें मुजुमदाराचें म्हणणें ( इं. अँ. ४६ १९१७ पा. २२० ), रघुवंश ४. ३५ आणि नीतिसार १०.३५ याची तुलना करूनहि खरें धरता येत नाहीं.
नीतिसारातील विषय कौटिलीयातील विषयाशीं कांहींसें जमतात. कौटिलीयात बरीच मोठमोठीं प्रकरणें आहेत; उदा. राज्यव्यवहारासंबंधीं २, ३ रें व ४ थें; औपनिषदिक ( १४ वें ); आणि साधनांवर शेवटचें. नीतिसारांत वरील प्रकरणाशीं जुळतें असें कांहीं नाहीं. शिवाय नीतिसारात विशेष फरकहि दृर्ष्टास पडतात; व त्यांवरून असें दिसतें कीं कौटिलीय अर्थशास्त्राव्यतिरिक्त इतर ग्रंथाचा कर्त्यानें उपयोग केला असला पाहिजें.
पहिल्या व दुसर्या सर्गांत इंद्रियनिग्रह व राजाला महत्त्वाचीं अशीं शास्त्रें कौटि. १.६ आणि १.१ यांनां जुळतीं दिलेलीं आहेत. पण “आन्वीक्षिकी” हें कामंदकीनें आत्मविज्ञानांत उल्लेखिलें आहें. [ नीतिसार २. ७,. दहलमन-महा-काव्य व कायदेग्रंथ या दृष्टीनें महाभारताचा विचार पा. २२६ इ. याशीं तुलना करा. ] तिसर्या सर्गांत चांगला राजा कसा असावा हें दर्शविणारें चुटकें, धर्मशास्त्र व धम्मपद यांत आहेत तसे आढळतात. ४ था सर्ग राज्याचीं सात अंगें ( कौटि.६ यांतील प्रकृतीप्रमाणें ) यांचें विवरण देतो. राजसेवेसंबंधींचा पांचवा सर्ग ( कौ. ५. ४,प्रमाणें ) एकीकडे दरबारीलोकांनां कसें वागावें या विषयीं उपदेश व दुसरीकडे राजानें त्यांच्यांशीं कसें वर्तन ठेवावें याविषयीं नियम सांगतो या ठिकाणीं ग्रंथकर्ता, सरकारी खजिन्याच्या स्थितीकडे राजाचें लक्ष व आपल्या प्रजेच्या बाबतींत त्याची वागणूक या मुद्यावरहि बोलतो. ( ५. ८१-८३ ) हे श्लोक मननीय आहेत: पांच प्रकारचें संकट प्रजेवर ओढवणें शक्य असतें: प्रथम, अधिकार्यांपासून, नंतर चोरांपासून व शत्रूंपासून, राजाच्या मर्जीतल्या माणसाकडून आणि शेवटीं राजाच्या लोभविकारामुळें. हें पांच प्रकारचें संकट राजानें दूर केल्यावर तो आपल्या आयुष्यांतील ध्येयांच्या सिध्दयर्थ कालांतरानें चांगलें फल भोगील. ज्याप्रमाणें गाय, तिची योग्यकाळीं निगा राखल्यास, आपलें दूध देते, आणि ज्याप्रमाणें वेल, पाणी घातल्यास, आपलीं फुलें पुढें करिते, त्याप्रमाणेंच प्रजेला नागवण्यापूर्वी तिला प्रथम सुरक्षित राहूं द्या.
राज्यद्रोह्यांना योग्य शिक्षा करणें व त्यांना निरूपद्रवी करून सोडणें यांबद्दलचा सहावा सर्ग कौटिलीयाच्या पांचव्या अधिकरणाशीं जुळतो: सातवा सmemर्ग ज्यांत राचसंरक्षणाचें नियम सांगितले आहेत. तो कौटि. १. १७ आणि २१. यावर हुकूम आहे. ८-११ सर्गोत ( कौटि.६ ७ अधिकरणाप्रमाणें ) बाह्यराजकारणाचा उहापोह केला आहे; व त्यांत निकटवर्ती शत्रु मित्रमंडळाचें. वर्गीकरण व भेद काथ्याकूट करण्याप्रमाणें अत्यंत सूक्ष्म दाखविले आहेत. १२ व्या सर्गोत ( कौटि.१ १५ प्रमाणें ) मंत्रिमंडळें, १३ व्या सर्गोत ( कौटि. १.१६ प्रमाणें ) राजांचे वकील व परिशिष्टांत ( कौटि. १. ११-१२ प्रमाणें ) हेर यांसंबंधीं विवेचन आहे. हेर हा “राजाचा इरस्तत: भटकणारा डोळा” आहे सूक्ष्म जाळीप्रमाणें तो हेरामार्फत शत्रूचीं कृत्यें अवलोकितो; “ कारण डोळ्यांप्रमाणें ज्याचे हेर आहेत तो राजा निजलेला असतांनाहि जागा असतो” ( १३.२८ इ. ) सर्ग १४ व १५ हे कौटि. ८ व्या अधिकरणाप्रमाणें राज्यांतील “वाईट गोष्टी” सांगतात. शेवटले सर्ग ( १६-२० ) लष्करी कारभाराविषयीं आहेत कामंदकि हा आपल्या गुरू ( कौटिल्या ) प्रमाणें जास्त बलिष्ठ शत्रूला जिंकण्याच्या युक्तिप्रयुक्तीवर विशेष मदार ठेवितो. उदा. तो म्हणतो ( १९, ७१ ) “दृढ संकल्यानें अधर्मयुध्दांत त्याला शत्रूचा नाश केला पाहिजे; कारण कपटानें शत्रूंला ठार करण्यानें त्याचा धार्मिक गुण कमी होत नाहीं. द्रोणपुत्रानें आपल्या चांगल्या परजलेल्या तरवारीनें निर्भयपणें निजलेल्या पांडवसैन्याचा रात्रीच्या वेळीं वध केला नाहीं कां ?”
दहाव्या शतकापावेतों देखील काश्मीरांत कौटिलीय अर्थशास्त्राचें अध्ययन चालू होतें; हें सोमदेवसूरीच्या ‘नीतिवाक्यामृत’ [ हें लिखाण थोड्या भाष्यासह ग्रंथरत्नमालेंत ( मुंबई १८८७-१८८८ ) प्रसिध्द झालें आहे. जॉलीचा रिपोर्ट झेड् डीएम जी ६९, ३६९ इ. याच भागांत वल्लौरिया नीतिवाक्यामृतांतील अनेक उतारे देतो.] ग्रंथावरून दिसून येईल. सोमदेवसूरि हा जैन लेखक ‘यशस्तिलकाचा’ कर्ता म्हणून प्रसिध्द आहे. [यशस्तिलक प्रस्तावनेंत स्वत:ला “यशोधरमहाराजचरित” म्हणवितें व नीतिवाक्यामृताच्या पूर्वभागांत ग्रथकार आपणाला यशोधरमहाराजचरित शास्त्राचा कर्ता म्हणवितो. तेव्हां हा त्याचा आधींचा ग्रंथ आहे.] हें “नीतिवाक्यामृत” बरेंचसें कौटिल्यावरून घेतलें असून पुष्कळ वेळां त्याच्याशीं शब्दश: जुळतें; कधीं कधीं सोमदेव कौटिलियाचा अनुवाद करितो, तेव्हां हें कौटिलीयावर सोमदेवाचें भाष्य म्हणतां येईल. तथापि हा ग्रंथ अगदीं भिन्न स्वरूपाचा आहे. कौटिलीय अर्थशास्त्रासारखा राजकारण व अर्थविनियम यासंबंधींचा लहानसा व्यवहारोपयोगी हा ग्रंथ नसून राजांनां उत्तम सूचना करणारा एक शैक्षणिक ग्रंथ म्हणतां येईल. सोमदेवाच्या नीतीच्या कल्पनेंत सद्वर्तन व मुत्सद्देगिरी हीं येतात व यामुळेंच हा ग्रंथ प्रारंभींच आचारशास्त्राच्या एखाद्या हस्तपुस्तकाप्रमाणें वाटतो व पुढें पुष्कळ प्रकरणांतून नीतीची छटा सररहा आढळतें. ज्या ठिकाणीं नीतिवाक्यामृतांत कौटिलीयांतल्या प्रमाणेंच प्रकरणांच्या सारख्याच नांवांसह एकच विषय आलेले आहेत तेथें सुध्दां राजांच्या वर्तनासंबंधीं सामान्य नियम देण्याकडे सोमदेवाचा कल दिसून येतो, तर इकडे कौटिल्य राजकारणांतल्या वहिवाटीचें बरोबर विस्तरानें वर्णन देतो. ज्या गोष्टी कौटिल्याला महत्वाच्या वाटतात त्याकडे सोमदेव फारसें लक्ष देत नाहीं; उदाहरणार्थ, नीतिवाक्यामृतांत तटबंदी, खजीना व सैन्य यासंबंधीं प्रकरणें आहेत तरी कौटिलीयांतल्याप्रमाणें सर्व माहीती त्यांत मिळणार नाही. कलाव्यवहारांत सुध्दां कांहीं बाबतींत सोमदेव व कौटिल्य यांच्यांत भेद दिसून येतो. जसें, न्यायाच्या बाबतींत धर्मशास्त्रांनां अनुसरून पण कौटिलीयाच्या मताविरूध्द तो दैवी निकालाची संपादणी करितो. वस्तुत: सोमदेव जैन आहे तरी ब्राह्मणी कायदे व विचार यांच्याशीं पूर्ण समरस आहे; विशेषत: जातिभेदाचा तो कट्टा अभिमानी आहे. कांहीं थोड्याच स्थळीं त्याचा जैनपंथ वर डोकें काढतांना दृष्टीस पडतो.
ग्रंथाची भाषा व रचना पाहतां नीतिवाक्यामृत हें कौटिलीय व नीतिसार यांहून निराळें दिसतें. हा ग्रंथ सर्वच गद्यांत व बहुतांशीं छोट्या पण अर्थपूर्ण वाक्यांत लिहिलेला आहे. तथापि या धाटणीचें सूत्रपध्दतीशीं साम्य मुळींच नाहीं. भाषा साधी व स्पष्ट आहे. ह्मणी किंवा ह्मणीच्या स्वरूपाचीं वाक्यें रचण्यांत सोमदेवाची आवड व्यक्त होते. ग्रंथाचें स्वरूप व अंतरंग उघडकीला आणण्यास कांहीं थोडे उतारे बस्स होतील. “जो आपल्या विश्वासू माणसांच्या बाबतींत इंद्राप्रमाणें, शत्रूंच्या बाबतींत यमाप्रमाणें वर्तन ठेवितो तोच राजा होय. कारण राजाचें कर्तव्य दुष्टांनां दंड व सज्जनांचें रक्षण करण्याचें आहे, डोक्याचें मुंडण किंवा केंसाची झुलपें ठेवण्याचें नव्हें.” ( पा. ९ ) “ज्यानें ज्ञानार्जन केलें नाहीं तो डोळे असून आंधळा होय. कारण अज्ञान्यापेक्षां जास्त खराब गुरू सांपडणार नाहीं. मठ्ठ राजा असण्यापेक्षां जग राजावांचून असलेलें पुरवलें.” “प्रपंच साधण्याकरितां लोकायत हेंच सर्वोत्कृष्ट साधन आहे. कारण जो राजा लोकायतांत पूर्ण अभ्यस्त आहे तो राज्यांतलें कांटे उपटून काढण्याचा प्रयत्न करीत असतो. जे केवळ संन्यांसी असतात त्यांचें वर्तन दोषापासून मुळींच अलिप्त नसतें. ज्याला केवळ दयाच येते त्याला स्वत:च्या ताब्यांतील गोष्टीहि संभाळवणार नाहींत. कारण आत्म्याच्या शांतीकरतांच ज्याची सर्व धडपड आहे अशा मनुष्याचा कोण तिरस्कार करणार नाहीं ? दुष्टांच्या बाबतींत आत्म्याची शांति राखणें हें संन्याशाला भूषणावह आहे, राजाला नाहीं. ज्याला क्रोध व त्याचप्रमाणें स्नेह दाखवितां येत नाहीं त्याचा धि:कार असो ! जो शत्रूशीं मोठ्या शौर्यानें लढत नाहीं जो जिवंत असूनहि मेलेला आहे.”
धर्मशास्त्रग्रंथ व कौटिलीय यांप्रमाणेंच सोमदेव हा प्रत्येक जात व प्रत्येक जीवितावस्था यांनां स्वधर्म आवश्यक आहे असें प्रतिपादतो. तरी कौटिल्यापेक्षां जरा जास्त शूद्रांच्या धर्मांवर जोर देतो, व सत्शूद्राची भावना बाळगतो हें विशेष आहे. पा. १६:- “दोषरहित आचरण, पावित्र्य, परिश्रम, आणि शारीरिक स्वच्छता हीं क्षुद्रांनांहि देव, ब्राह्मण व संन्यासी यांच्या सेवेला योग्य बनवितात. धर्मबुध्दि, सत्यप्रीति, परद्रव्याचा अभिलाष न धरणें इंद्रिय निग्रह, वर्णाश्रमधर्माविरूध्द लग्न न करणें, अगम्य मानलेल्या स्त्रियांशीं व्यभिचार न करणें; हें सर्व जातींचें सारखेंच कर्तव्य आहे. सूर्यदर्शनाप्रमाणें हें सर्वांना साधारण असेंच कर्तव्य आहे.”
ज्या राष्ट्रांत राजा नेहेमींच पैसे उभे करीत असतो त्या ठिकाणीं दु:ख अखंड राहातें. जर महासागरच मुळीं तहानेलेला आहे तर जगांत पाणी कसें राहील ?
ज्याला आपल्या धन्यासाठीं राबावयाचें असतें अशा मंत्र्यासंबंधीं आपणास पुढीलप्रमाणें वाक्यें आढळतात “धन्याची आज्ञा झाली कीं, कोंकरूंसुध्दां सिंह बनतें.” कामगिरी करण्याची वेळ येऊन ठेपली असतां मंत्र्यांचा सल्ला पहावयास जाऊं नये. कारण घराला आग लागून गेल्यावर विहीर खणण्याचा काय उपयोग ?” सेवक निवडण्याच्या कामीं राजानें दक्षता बाळगली पाहिजे. “बुध्दि, चातुर्य किंवा पैसा खर्चण्याच्या किंवा लढाईच्या वेळीं जे मित्र असतात तीच खरी उपयोगीं माणसें होत. कारण मेजवानीच्या प्रसंगीं कोणकोणाचा मित्र होणार नाहीं ? पुढील शहाणपणाचे शब्द सध्यांच्या काळाकरितांच जणुं काय लिहिलेले आहे:-“तरवार हाच ज्याचा धंदा आहे त्यांनां सल्लागार मंडळाचा धंदा माहीत असतां कामा नये, म्हणजे सेनानी हे मंत्री नसावेत.”
राजाच्या नित्या धर्मासंबंधीच्या प्रकरणांत सभ्यता, नैतिक आचरण, धार्मिक मत, आहार व आरोग्य यांवर बरेचसे नियम आहेत. खाण्यांत नियमितपणा ठेवावा म्हणून विशेष जोरानें प्रतिपादलें आहे, कारण “जो नियमिताहारी तोच अधिक खातो.” यांतील थोड्या जैन विधींपैकीं पुढील एक आहे. “सजीव प्राण्यांच्या हत्त्येशीं ज्याचा संबंध पोंचतो असा कोणताहि खेळ त्यानें चालवूं नये.”
जरी कौटिल्याच्या अर्थशास्त्राचा या ग्रंथांत इतका उपयोग केला आहे तरी त्या ग्रंथाचा कोठेंहि उल्लेख नाहीं. तथापि चाणक्याचा ज्यानें ‘नंदाला मारण्यासाठीं एका हुशार दूता’ ची दुष्टकर्म्याची योजना केली त्या मंत्र्याचा उल्लेख आढळतो ( पा. ५२ ) “मित्रा” संबंधींच्या प्रकरणांत. ( पा.८६ इ. ), मनुष्य प्राण्यांपेक्षां जनावरें मैत्रीला फार चांगलीं, असें सांगितलें आहे. या विधानाला पुरावा म्हणून, भारतीय व जागतिक वाङ्मयांत सुप्रसिध्द असणारें. कृतज्ञ जनावरें व कृतघ्न माणूस या संबंधीं उपाख्यान दिलें आहे:
“एके वेळीं एक माकड, एक साप, एक सिंह व एक अक्षशालिक एका अरण्यांतील झांकलेल्या विहिरींत पडलें. कांकायन नांवाच्या प्रवाशानें त्यांनां बाहेर काढलें. पण कांकायनाला या अक्षशानिकाच्या मार्फतच मोठ्या शहरांत मृ्त्यु आला”
दुसरा एक विशेष लक्षांत घेण्यासारखा उल्लेख वर आहे. “जेव्हां न्यायमूर्ति व सल्लागार हे चुकीचा निकाल देतात तेव्हां खटला कसा जिंकावा? अनेक लोकांनीं बोकडाचा कुत्रा केला नाहीं ? हा संदर्भ पंचतंत्रातील (तंत्राख्यायिक ३.५. ) सर्व प्रसिध्द असणार्या गोष्टीचा आहे; एक ब्राह्मण यज्ञाकरितां बोकड नेत असतां कांहीं मंडळींनीं त्याला तो बोकड नसून कुत्रा आहे असें भासविण्याचा उद्योग केला; शेवटीं ब्राह्मणास तें खरें वाटून त्यानें तो बोकड टाकून दिला तेव्हां या लबाडांनीं तो मटकवला ! शेवटीं जातां जातां भवभूतीच्या मालतीमाधवाचा यांत केलेला गमतीदार उल्लेख पाहूं. या युध्दांत बहुधां शस्त्रास्त्रांपेक्षां बुध्दिचातुर्य विशेष महत्त्वाचें असतें हें दाखविण्याकरितां सोमदेव म्हणतो ( पा.१२१ ). आपण असें ऐकतों कीं, माधवाच्या बापानें लांबून सुध्दां कामंदीकीची मदत घेऊन माधवाकरितां मालती मिळविली”
“लघु अर्हन्नीतिशास्त्र [अमदाबादेस १९०६ त हा ग्रंथ टीकेसहित प्रसिध्द झाला. हर्टेल, तंत्राख्यायिक, भाषांतर. १ १५७, १५९. पहा ] जैनांकरितां राजकरणाचें छोटेसें पुस्तक, आपणाला उपलब्ध आहे, तें विख्यात् असलेल्या हेमचंद्रानें लिहिलेलें आहे. हेमचंद्र जैनसाधु असून वाङ्मय व शास्त्र यांच्या क्षेत्रांतून त्याची गांठ पडते.
“बृहद्-अर्हन्नीतिशास्त्र” या मोठ्या प्राकृत ग्रंथांतील हा एक भाग आहे. बृहद्-अर्हन्नीतिशास्त्र हेमचंद्रानें राजा कुमारपाल याच्या इच्छेनुसार रचिला होता. पण तो सध्यां आपणाला उपलब्ध नाहीं. लघूअर्हन्नीतिशास्त्र श्लोकबध्द असून त्यांत मधून मधून गद्य टीकाहि आढळते. ग्रंथाचा बहुlslllsतेक भाग धर्मशास्त्रें विशेषत: मनुस्मृति यांच्या आधारें बनविलेल्या दिवाणी व फौजदारी कायद्यासंबंधीचा आहे.
राजाचे गुणधर्म, त्याच्या आचरणाविषयीं नियम, सप्त प्रकृति, राजकारणाचे सहा प्रकार, मंत्री सेनापती व इतर अधिकारी यांकरितां नियम यांसारखे अर्थशास्त्रांतील नेहेमीचे विषय एका लहानशा प्रकरणांत आटपले आहेत. दुसर्या प्रकरणाच्या आरंभीं नीतीचे तीन वर्ग पाडले आहेत. युध्द, दंड व न्यायकारभार. युध्दावरील अध्यायांत मात्र कोठें कोठें कर्त्याचा जैनभाव व्यक्त होतो. त्या ठिकाणीं असें सांगितलें आहे कीं, शत्रूला दूर सारण्याचे इतर सर्व उपाय थकल्याखेरीज युध्दाला पुढें होऊं नये. कारण, “लढाईंत जय हा अनिश्चित असतो पण मानवी जीविताचा नाश विश्चितच असतो. तेव्हां जर दुसरा कांहीं उपाय असेल तर राजानें लढाईचा प्रसंग आणूं नये.” [ २, १, १९. तसेंच पंचतंत्र १, ३१४ आणि ४, १३ पाहा] तथापि युध्द करावें असें ठरल्यानंतर, युध्दांत जितकी कमी हानि होईल व तें जितक्या दयार्द्र बुध्दीनें तडीस नेतां येईलं तितकें करण्याकडे लक्ष द्यावें” गुप्त किंवा विषारी अशा अति निर्घृण शस्त्रांनीं, किंवा अग्नींत टाकून तप्त केलेल्या शस्त्रांनीं किंवा दगड ढेकळांनीं त्यानें लढूं नये. एखादा यति, किंवा ब्राह्मण, किंवा शस्त्रें खालीं ठेवलेला भ्याड किंवा मृत्यूच्या दारांत बसलेला किंवा दुर्दैवानें पछाडलेला मनुष्य, किंवा एखादा षंढ, नग्न, शरणागत, अयोध्दा, सुप्त, रोगी, संरक्षणाची याचना करणारा, दांतीं तृण धरणारा, बाल, दीक्षार्थी, किंवा अतिथी यांनां त्यानें मारूं नयें.” [ २ १, २७; ५९, ६१ इ. धर्मशास्त्रांतून अशाच तर्हेचे नियम सांपडतील ( आपस्तंब २. १०, ११; बौधायन १. १८, ११. गौतम १०. १८; मनु ७९०. पुढें; याज्ञवल्क्य १. ३२३, ३३५ ), तसेंच महाभारतांत ( १२.९८ ४९ ) ].
दंडनीतीवरील अध्याय ( २२ ) जैनस्थानांतील ( यांत दंडाचे सात प्रकार सांगितले आहेत, ) एका वचनापांसून सुरू झालेला आहे. सर्वांत मोठें प्रकरण ( ३ रें ) न्यायव्यवहारासंबंधीं आहे. यांत मनुस्मृतींतल्याप्रमाणें न्यायाचीं १८ साधनें निरनिराळीं दाखविलीं आहेत. चौथ्या प्रकरणांत प्रायश्चित्तें असून, धर्मशास्त्रांतल्याप्रमाणेंच प्रायश्चित्ताचे ब्राह्मणी प्रकार उपदेशिले आहेत. फरक इतकाच कीं, प्रायश्चित्त म्हणून जिनोपासना सांगितली आहे. प्राचीन हिदुस्थानांत राज्याची उभारणी नेहमीं ब्राह्मणी पायावर केलेली असे हें या भागावरून स्पष्टपणें निश्चित होतें. राज्यावर आपली छाप बसविण्याच्या वेळीं जैनांनीं ही गोष्ट ध्यानांत घेतली होती. या करणामुळेंच हेमचंद्र जातिभेद पूर्णपणें मान्य करितो व कोणी किरात किंवा दुसरे हीन जातीचे लोक यांच्या घरीं जेवला तर त्याला प्रायश्चित्त सांगतो ( ४. ८. )
शुक्र किंवा उशनस् याची म्हणून समजली जाणारी, “शुक्रनीति” व महाभारत कथन करणारा वैशंपायन यांच्या नांवावर पडलेली” नीतिप्रकाशिका” हे दोन ग्रंथ खरें बोलावयाचें म्हणजे अगदीं अर्वाचीन आहेत. यांचा प्रथम प्रकाशक गस्टाव्ह ऑप्पर्ट यानें, प्राचीन भारतीयांनां तोफा, बंदुका व दारू यांची आधीपासूनच माहिती होती असें या लिखणांवरून मागें सिध्द करण्याचा प्रयत्न केला होता. [मद्रास जर्नल ऑफ लिटरेचर् अँड सायन्स पु. २. १८७९ व पु. ४ १८८१. शिवाय बर्जेस्, इं. अँ. पु. १२, १८८३ पा. ५० पाहा.] शुकनीतीच्या ऑप्पर्टच्या प्रतीखेरीज (मद्रास १८८२), एक जीवानंद विद्यासागरची [ कलकत्ता १८८२ ( १ ली आवृत्ति ) १७९० ( २ री आवृत्ति ) ] व बंगाली, मराठी, हिंही भाषांतरासहित दुसर्या अनेक हिंदुस्थानांत प्रसिध्द झालेल्या प्रती आहेत. बी. के. सरकारचीहि एक प्रत आहे ( न्यूयार्क, १९१५ ). बी. के. सरकारकृत्त “ दि पॉझिटिव्ह बॅकग्राउंड ऑफ हिंदु सोशिऑलॉजी” ( १,२ अलहाबाद १९१४ व १९२१ ) यांची रचना शुक्रनीतीवरच केलेली आहे. शुक्रनीतींत प्राचीन अर्थशास्त्राचे अवशेष पाहाणें हें एक संशोधनकार्य आहे. नीतिप्रकाशिका ( ऑप्पर्ट प्रत, मद्रास १८८२ ) यांत युध्दकला प्रामुख्यानें आली आहे. भोजराजाचा “युक्तिकल्पतरू” आतां प्रसिध्द झाला असून [ कलकत्ता ओरियंटल सीरिज नं. १.-पंडित ईश्वरचंद्र शास्त्री १९१७. ] त्यांत नीतियुक्ति, वास्तुयुक्ति, आसनयुक्ति, छत्र-ध्वज चामरयुक्ति, अंलकारयुक्ति, शस्त्रास्त्रयुक्ति, यात्रा-युक्ति, अश्व गज-वृष-मृगयुक्ति, व यानयुक्ति यासारखे उपयुक्त विषय आहेत. धर्मनिबंधाचा कर्ता चंडेश्वर यानेंहि एक “नीतिरत्नाकर” या नावांचें नीतिशास्त्र रचिलें आहे; त्यांत सबंध व्यवहाराचें क्षेत्र, लष्करी कारभार, मुलकी व्यवस्था वगैरेचें विवेचन केलें आहे. [हरप्रसाद रिपोर्ट १ पा. १२; आफ्रेक्ट, १७७.] अर्थशास्त्रांत विशिष्ट विषयावरील सर्व प्रकारचीं पुस्तकें येतात; उदा., अश्वपरीक्षा, गजपरीक्षा युध्दशास्त्र, वास्तुसौंदर्यशास्त्र, रत्नपरिक्षा, इ. विषयावरील ग्रंथ. प्रस्थानभेदांत मधुसूदनानें अर्थशास्त्राखालीं नीतिशास्त्र, अश्वशास्त्र शिल्पशास्त्र, सूपकारशास्त्र व चतु:षष्ठि कलाशास्त्र हीं घातलीं आहेत. सूपशास्त्रांत आहारासंबंधीं विवेचन असल्यानें तें वैद्यकांतही पडतें. ऋषि विश्वामित्राच्या चार ग्रंथांत मधुसुदनाच्या मतें विवेचिलेला धनुर्वेद शस्त्रास्त्रें, युध्दाचें स्वरूप व योध्दयाचे गुणधर्म, एवढेंच नव्हे तर गुप्त अस्त्रें, मंत्रतंत्र, राज्याभिषेक आणि शकुन हे विषय देतो. धनुर्वेद या नांवाखालीं असणारीं हस्तलिखितें सदाशिव, विक्रमादित्य व शारंगदत्त यांचीं म्हणून समजलीं जातात. [बुहलर, रिपोर्ट, पा. ३६: हरप्रसाद, रिपोर्ट १ पा. ९ ] शालिहोत्रऋषि अश्वशास्त्राचा उत्पादक असल्यानें या शास्त्राला अश्वशास्त्राखेरीज शालिहोत्रशास्त्र असेंही नांव आहे. यांत घोड्यांच्या रोगासंबंधीं माहीती असल्यानें याला अश्वचिकित्सा, अश्ववैद्यक किंवा अश्वायुर्वेद असेंही म्हणतात. पण जयदत्ताचें “अश्ववैद्यक” व नकुलाचें “अश्वचिकित्सा” यासारख्या पुस्तकांतून घोड्यांनां बरे करण्याची विद्या असून शिवाय त्यांचें संगोपन व शिक्षण यासंबंधीं विचार आढळतात. हे दोन्ही ग्रंथ उमेशचंद्र गुप्त यांनीं प्रसिध्द केले आहेत, ( बिब्लि. इं. १८८७. ) भोजराजाचा म्हणून एक “शालिहोत्र” ग्रंथ आहे त्यांतील १३८ श्लोकांतून घोड्यांची शुश्रुषा, त्यांचे रोग यासारखी माहिती आहे. [ जॉली-म्यूनिच ( १९१२)पा ६८.पाहा.] शारंङधर पध्दतींत या ग्रंथांतील श्लोक उदधृत केले आहेत. ( आफ्रेक्ट झेड्डीएमजी २७ पा. ३०, ४३, ९२ पाहा. ) “पशुवैद्यक” या अर्थानें शालिहोत्रशास्त्राचा उपयोगहि कधीं कधीं केला जातो व त्याचे अश्वशास्त्र व गजशास्त्र असे दोन भाग पाडण्यांत येतात. याचप्रमाणें गजशास्त्र; यांत पालकाप्य ऋषीला प्रमाणभूत मानतात. हें शास्त्र देखील पशुरोगनिवारणासंबंधीं आहे असें बहुधा समजण्यांत येतें. पण यावरील श्रेष्ठ ग्रंथांतून हत्तींविषयीं सर्वसाधारण माहिती सविस्तर सांपडतें हस्त्यायुर्वेद [ ए.एन. एस. एस. नं.२६ मध्यें प्रसिध्द झालेलें. शिवाय जॉली मेडिसिन ( ग्रुंड्रिस ) पा. १४ पाहा. ] नांवाचा एक मोठा भारदस्त ग्रंथ पुराणांच्या धाटणीप्रमाणें चंपा नगरीचा राजा रोमपाद व मुनि पालकाप्य यांमधील संवाद. रूपानें लिहिला आहें. नीलकंठाच्या “मातंगलीला” [ टी. एस. एस. नं. १० १९१० मध्यें प्रसिध्द झालें. ] या श्लोकबध्द ग्रंथांत गजशास्त्र थोडक्यांत वर्णिलें आहे. या ग्रंथाचा काल अनिश्चित आहे. याच्या बारा लहान अध्यायांतून हत्ती व त्यांच्या शास्त्राचा उत्पादक पालकाप्य यांची काल्पनीक उत्पत्ति, ह्त्तीचें आयुष्य, म्हातारपण व त्यांचे चांगले गुण, हत्तींनां धरणें व शिकविणें इ. विषय आलेले आहेत.
शिल्पशास्त्र. - म्हणजे साधारणपणें चित्रकलेची विद्या असा अर्थ जरी आहे तरी विशेषत: “वास्तुविद्या” या अर्थानें हा शब्द योजतात. “शिल्पशास्त्र” व “वास्तुविद्या” या नांवांचीं निरनिराळी पुस्तकें आहेत पण त्यांचे कर्ते मात्र माहीत नाहींत. [ गोल्डस्टकर-लिटररी रिमेन्स”, १,१९१ इ. पाहा. हा रामराजाच्या “ऑन दि आर्किटेक्चर ऑफ दि हिंदूज” लंडन १८३४ या ग्रंथांतून उतारे घेतो. “वास्तुविद्या” हा शिल्पकलेवरील छंदोबध्द ग्रंथ टी.एस.एस.नं.३० १९१३ मध्यें प्रसिध्द झाला आहे. इं. अँ.पु. ५ १८७६ २३० यामध्यें जे. एफ. कर्न शिल्पशास्त्रावरील संस्कृत भाषांतरित तामिळ ग्रंथाविषयीं उल्लेख करितो. ] “मानसार” नांवांचा शिल्पशास्त्रावर एक प्रमुख ग्रंथ आहे; त्याचे ५८ अध्याय असून त्यांत मोजणी मापें, घरांदेवळांची योजना, ग्राम व नगररचना, देवमूर्तिकर्म इ. विषय आहेत.
या ठिकाणीं संगीतशास्त्राचा उल्लेख करणें अवश्य आहे. मागें या शस्त्राचा नाट्यशास्त्राशीं संबंध जोडीत हें खरें आहे. भारतीय-नाट्यशास्त्राच्या २८-३४ या अध्यायांतून संगीताचा उहापोह केलेला आहे. [ आर. सायमन झेड्. डी. एम जी. ५, १९०२, १२९. गोल्डस्टकर, “लिटररी रिमेन्स” १ १८८ इ: बर्नेल, तंजावर, पा ५९ इ. : एग्लिंग इंडिया ऑफिस कॅट २, पा. ३१५ इ. ] तरी पुढील काळांत निवळ संगीतशास्त्रावरील ग्रंथ आपणाला आढळतात. त्यांत स्वर व त्यांचे प्रमाण, राग, गायनकला, वाद्ये, नृत्य व नकला, नगारखाना, जलसे, संगीतशिक्षक, नर्तिका, गायक, इ. यांना लागणारे गुण इत्यादि विषयांवर प्रकरणें आहेतं.” संगीतरत्नाकर [ चतुर कल्लिनाथाच्या टीकेसह एएन.एस एस. न. ३५ मध्यें प्रसिध्द झालेलें. ] हा काश्मीरकडील सोठलाचा पुत्र निशंक सारंगदेव यांचा ग्रंथ भारतीय नाट्यशास्त्राच्या बर्याच मागाहूनचा असला तरी प्राचीनच आहे. ग्रंथाचा काल निश्चित करतां येत नाहीं; पण याचा भाष्यकार कल्लिनाथ इ.स.१४५० च्या सुमारास होऊन गेला हें आपणांस माहीत आहे. यानंतरचा म्हणजे ज्यांत कल्लिनाथाचा निर्देश केला आहे, असा ग्रंथ “संगीतदर्पण” [ सायमन झेडडीएमजी ५६, १९०२,१२९ इ. पहा. ] होय; याचा कर्ता लक्ष्मीधराचा पुत्र दामोदर असून त्यानें संगीतरत्नाकराचा नुसता उपयोग केला, इतकेंच नव्हे तर कांहीं कांहीं भाग त्यांतून शब्दश: घेतला. ज्या ठिकाणीं त्याचा रत्नाकरांशीं विरोध आला त्या ठिकाणीं त्यानें बहुश: याहून जुने ग्रंथ उपयोजिले म्हणूनच त्याच्या ग्रंथाला महत्त्व आहे. कांहीं दुसरे स्वतंत्र रागांवर ग्रंथ आहेत. उदा. सोमनाथाचा रागांविबोध (१६०९ ) याच्या पांचव्या प्रकरणांत सतारी वाजविण्याचे राग दिलेले आहेत. एकंदर ५० निरनिराळ्या रागांचीं पद्यें यांत आहेत. [ सायमनचा एसबीए १९०३ पा. ४४७ इ. पाहा. ] विल्यम जोन्सनें आपल्या “ऑन म्यूझिकल मोड्स ऑफ दि हिंदूज” पु. ३. या पुस्तकांत याचा उपयोग केलेला असून त्याच्या मतें हा ग्रंथ फार प्राचीन असावा. पुरूषोत्तममिश्राचा “संगीतनारायण” व जगज्जोतिर्मल्लानें संगीतभास्कर नांवाची टीका ज्यावर रचिली तो “संगीतचंद्र” नांवाचा संगीत कलाकोश हे मागाहूनच्या ग्रंथांतच समाविष्ट होतात.
रत्नशास्त्र किंवा रत्नपरिक्षा हें भारतांतील एक जुनें शास्त्र आहे. दिव्यावदानांत व्यापार्यांचीं मुलें अगोदरच हें शास्त्र शिकतात. कामसूत्रांतील ६४ कलेंत रत्नपरीक्षा ही एक कला धरिली आहे. बृहत्संहितेंत वराहमिहिराची या शास्त्रांत चांगली गति दिसून येते. बुध्दभट्टाचा “रत्नपरिक्षा,” नारायण पंडिताचा” नवरत्नपरिक्षा व इतर उपलब्ध असलेले ग्रंथ कोणत्या काळचे आहेत, हें सांगतां येत नाहीं. एल. फिनो यानें या सर्वांचे मूळ ग्रंथ भाषांतर व चर्चा हीं सारीं प्रसिध्द केलीं आहेत ( पॅरिस १८९६ ). हे ग्रंथ रत्नांचीं वर्णनें देऊनच रहात नाहींत, तर त्यांच्या उत्पत्तिकथा, रंग, तीं जेथें सांपडतात तीं स्थळें व त्यांच्या खरेखोटेपणाच्या खुणा सांगून शिवाय प्रत्येक रत्नाचें वजन, किंमत वगैरे देतात.
कलावाङ्मयांत चौर्यकला येते. मृच्छकटिक व महाभारत यांतून अशीं विधानें आहेत, इतकेंच नव्हे तर त्यावर एक ( हस्तलिखित ) ग्रंथ आपणाला आढळतो; त्याचें नाव “षण्मुखकल्प”. षण्मुख= कार्तिकेय हा चोरांचा देव समजला जातो. कौटिलीय अर्थशास्त्राच्या शेवटल्या प्रकरणांत जसें राजकारणांत मंत्रतंत्र, जादू केलेलीं पेयें यांचा समावेश होतो असें म्हटलें आहे. त्याचप्रमाणें षण्मुखकल्पाच्या मतेंही हीं साधनें चौर्यकलेंतमहत्त्वाचीं आहेत. [ हरप्रसाद, रिपोर्ट १, पा. ८ पाहा. ]
मराठेशाहींतील अर्थशास्त्र विषयक वाङ्मय.- मराठेशाहींत या विषयावर फारसें वाङ्मय उत्पन्न झालेलें दिसत नाहीं. नाहीं म्हणावयास इ. स. १७१६ सालीं करवीरच्या संभाजी महाराजांनीं ‘चिरंजीव राजश्री राजकुमार राजकार्यी सुशिक्षित व्हावे व वरकड देशोदेशीं देशाधिकारी व पारपत्यगार यांनीं नीतीनें वर्तोंन राज्यसंरक्षण करावें’ यास्तव जें आज्ञापत्र काढून ‘यथाशास्त्र राज्यनीति’ उपदेशिली तें विविधज्ञानविस्तार मासिकांत इ.स. १८९०-९१ सालीं प्रसिध्द झालें आहे; व सवाई माधवरावासाठीं तयार करविलेलें तसेंच दुसरें एक चोपडें ताई साठे यांच्या दप्तरांतलें राजवाडे यांनीं प्रसिध्द केलेलें उपलब्ध आहे. तथापि महालानिहाय जमाखर्च कसा ठेवावा, खातीं कोणत्या प्रकारचीं असावी इत्यादि माहिती देणारे ओवीबध्द, तसेंच यादीच्या रूपांत असलेलें भेस्तकस्वरूपी वाङ्मय उपलब्ध असून तें जरी आज फारसी पेहेरावांतही आढळतें तरी तें मूळ हेमाद्रीपासून चालत आलें आहे, असें सतराव्या शतकांतील एका ओवीबध्द मेस्तकाच्या आवृत्तीवरून व्यक्त होतें. शिवाय मराठेशाहीच्या आर्थिक स्थितीच्या अभ्यासकास उपयोगी पडेल, असें बरेंचसें वाङ्मय सातरकर महाराज व पेशवे यांच्या रोजनिशींतील निवडक उतार्यांचे जे ग्रंथ प्रसिध्द झाले आहेत, त्यांत व इतरत्र पहावयास मिळतें; परंतु एक तर हें वाङ्मय मराठेशाहीच्या आर्थिक स्थितीचें सर्वांगपूर्ण चित्र रंगविण्यास अद्याप अपुरेंच आहे व दुसरें आहे त्याचाहि सांगोपांग अभ्यास करण्याचा पाव शतकापूर्वी कै. महादेव गोविंद रानड्यांनीं एक प्रयत्न केला त्यानंतर म्हणण्यासारखा कोणी प्रयत्न केलेला नाहीं.
अर्थशास्त्र संबंधीं कल्प ना- मराठेशाहींतील अर्थशास्त्रविषयक वाङ्मयाची उणीव संभाजीचें आज्ञापत्र या लहानशा चोपड्यानें थोडी तरी भरून काढतां येण्यासारखी आहे. याच्याच साहाय्यानें अर्थशास्त्रीय व शासनशास्त्रीय कित्येक प्रश्नांसंबंधीं मराठेशाहींतील मुत्सद्यांचें काय मत होतें याचा खुलासा होऊं शकतो. मराठेशाहींतील मुत्सद्यांची अर्थशास्त्राविषयीं काय कल्पना होती, हें सांगणें कठिण आहे. शासनसंस्थेची दौलत वाढविणें हें तत्कालीन इतर राज्याधिपतींप्रमाणें मराठ्यांचेंहि ध्येय उघड उघड दिसत होतें संभाजीच्या आज्ञापत्रांत स्पष्टच म्हटलें आहे कीं, आयव्यय विचार पाहून जेणेंकरून दिवसेंदिवस राज्यांत खजीना होय तें करावें. मात्र त्याचें कारण असें दिलें आहे कीं, पडले प्रसंगीं खजीना असल्यानें सर्व संकटांचा परिहार केला जातो. तेव्हां प्रश्न एवढाच उरतो कीं, लोकांची उन्नति करून त्यांच्या नफ्यांतून कर घेण्याची मराठी मुत्सद्यांची प्रवृत्ति होती किंवा लोकांकडून शक्य तितका पैसा पिळून काढून स्वत:ची भर करण्याकडे त्यांचा कल होता ? आपल्या प्रजेची उन्नति व्हावी अशीहि मराठी मुत्सद्यांची मनांतून तरी इच्छा असलीच पाहिजे. कारण एखाद्या भागांत स्थायिक झाल्यावर त्या भागाचें उत्पन्न कोणत्याहि शासनसंस्थेला प्रजेच्या उन्नतीशिवाय कायमचें वाढवितां येणें शक्य नाहीं ही मूलभूत गोष्ट मराठी मुत्सद्यांच्या सहज लक्षांत येण्यासारखी होती; तथापि एवढें मात्र खरें कीं, कोणत्याहि कारणानें कां होईना, मराठ्यांच्या हातून आपल्या प्रजेची उन्नति करण्याचे प्रयत्न व्हावे तसे झाले नाहींत.
शासन संस्थांची वैश्य वृत्ति. - मराठी मुत्सद्यांच्या शासनविषयक दुसर्याहि कित्येक कल्पना या संभाजीच्या आज्ञापत्रांत प्रतिबिंबित झालेल्या आहेत. राजकर्त्यांनीं स्वत: धंदे करण्याच्या भानगडींत पडूं नये. हें तत्त्व मराठेशाहींत मुत्सद्यांसहि अवगत होतें असें दिसतें. संभाजीच्या आज्ञापत्रांत सांगितलें आहे कीं, राज्यकर्त्यानें ‘सकळ शिल्पाचे हुन्नर सकळहि अवश्यमेव अवगत करून ठेवावे; परंतु हे श्रमावर धंदे स्वांगें करीत न जावे’ पण कारण काय तर यामुळें एखादा शरीरोपद्रव जाहल्यानें राजकार्यास अंतर पडतें ! वस्तुत: कर ऐन जिन्नस घेण्याच्या चालीमुळें मराठेशाहींत धान्य, कापडचोपड वगैरेंची सरकारी दुकानें राजरोसपणें चालविलेलीं दृष्टीस पडतात, हिर्यांच्या खाणी तर स्वत: सरकारच चालवीत होतें व घोडनदी, तुंगभद्रा यांसारख्या मोठ्या नद्यांवर भाड्याच्या नांवाहि सरकारकडून चालविल्या जात असलेल्या दृष्टी, पडतात.
सरंजामीपध्दत.- सैन्याच्या बाबतींत मराठ्यांनां सर्वस्वीं घातुक अशा सरंजामी पध्दतीचा स्वीकार करावा लागला; परंतु तिचे दोष मराठेशाहींतील मुत्सद्यांस अवगत नव्हते असें नाहीं. या दोषांचें अंशत: परिमार्जन करण्याकरितांच हुजुरातीची आवश्यकता भासूं लागली. संभाजीचें आज्ञापत्र म्हणतें: “ज्यांचे पदरीं हुजरात बळकट नाही, ते सत्ता पराधीन. त्यांच्यानें कोणा एका कार्याचा स्वत: अंगीज करवत नाहीं. त्यामुळें केवळ सेवकाधीन होऊन रहावें. ते म्हणतील तें उगेंच ऐकावें न ऐकावें तर कार्यभागी लोक व सरदार यामुळें कार्यांत मन:पूर्वक प्रवर्तत नाहींत, तेणेंकरून कार्यनाश होतो.”
प्रधानपद.- मराठेशाहींत प्रधान हा राजाशिवाय इतर कोणास जबाबदार असल्याची कल्पना अस्तित्वांत असणें शक्यच नाहीं. प्रधानाचें राजाशीं काय नातें असतें, याचें वर्णन उपर्युक्त आज्ञापत्रांत थोडक्या पण मार्मिक शब्दांत दिलें आहे तें म्हणतें: ‘प्रधान म्हणजे राजमदजनित अन्यायसागराची मर्यादा. प्रधान म्हणचे हस्तीचें अंकुश.’
व्यापार वाढीस उत्तेजन. - राज्यांतील व्यापार वाढला म्हणजे राज्य श्रीमंत होतें, ही साधी गोष्ट मराठेशाहींतील मुत्सद्दी पूर्णपणें जाणून होते. शिवाय पडले संकटप्रसंगी राज्यांतील या साहुकारांपासून पाहिजे तें कर्जवाम मिळे हा त्यांनां दुसरा मोठा फायदा होता. यासाठीं संभाजीचें आज्ञापत्र म्हणतें कीं, पेठापेठांत दुकान वखारा घालून हत्ती, घोडे, जरमिना, जरबाब, पशमी आदिकरून वस्त्रजात रत्ने शस्त्रें आदिकरून अवशेष वस्तुजात यांचा उदीम चालवावा व परमुलुखीं जे साहुकार असतील त्यांचीं समाधानें करून आणावें. इतकेंच नव्हे तर दर्यावर्दी साहुकार यांसहि बंदरोबंदरीं कौल पाठवून आमदरफनी करावी असें सांगीतलें आहे. व्यापारवृध्दीसंबंधानें मराठी मुत्सद्यांचें धोरण अशा प्रकारचें असतांनां इंग्रजांनां मराठी राज्यांत आपला व्यापार वाढवितां आला नाहीं, याचें कारण पुष्कळ अंशीं इंग्रज वगैरे लोकांविषयीं मराठी मुत्सद्यांचीं साशंकबुध्दि हें होय. संभाजीच्या आज्ञापत्रांत असें स्पष्ट सांगितलें आहे कीं ‘साहुकारामध्यें फिरंगी व इंग्रज वलंदेज व फरासिस व डिंगमारादि टोपीकर हेही लोक सावकारी करितात, परंतु ते वरकड सावकारांसारखे नव्हेत. टोपीकरांस या प्रांतीं प्रवेश करावा, राज्य वाढवावें, स्वमतें प्रतिष्ठावीं हा पूर्णाभिमान. तदनुरूप स्थळोस्थळी कृतकार्यहि झाले आहेत. त्यास ही हट्टीजात हातास आलें स्थळ मेल्यानेंहि सोडावयाचे नव्हेत. यांची आमदर फती आले गेले इतकीच असों द्यावी.” इंग्रज वगैरे यूरोपीय व्यापार्यांशीं कसें वागावयाचें याविषयीं मराठी मुत्सदृयांचें धोरण या आज्ञापत्रांत चांगलें प्रतिबिंबित झालें आहे. ‘कदाचित वखारीस जागा देणें झाली तर खाडीचे मोबारीं समुद्रतीरीं न द्यावीं... ... जागा देणेंच तर लांब खाडी गांव दोन गांवें राजापुरासारखी असेल तेथे फरासीसास जागा दिला होता त्या न्यायें दोन चार नामांकित थोर शहरें असतील त्यामध्यें जागा द्यावा. तो असा कीं नीच जागा शहराचे आवारीं शहराचा उपद्रव चुकवून नेमून देऊन वखारा घालाव्या त्यासहि इमारतीचें घर बांधों देऊं नये.” इ. स. १७८८ सालीं गव्हर्नर जनरलास लिहिलेल्या पत्रांत सर चार्लस मालेट हा मराठ्यांचें धोरण व्यपारवाढीस प्रतिकूल आहे अशी जी तक्रार करतांना दिसतो त्याचें कारण मराठी मुत्सद्दयांची उपर्युक्त साशंकवृत्तीच होय. या सांशकवृत्तीची जाणीव स्वत: मालेट यासहि नव्हती असें नाहीं. उपर्युक्त पत्र लिहिण्याच्या वेळीं पुणें येथें बर्याच नवीन इमारती बांधल्या जात असल्यामुळें इंग्रजांनां पुण्यांत आपला माल खपविण्यास ही चांगली संधी होती तथापि तो खपविण्यासाठीं कांहीं विशेष उपाय अंमलांत आणण्याचा प्रयत्न केल्यास मराठ्यांची मत्सरबुध्दी जागृत होण्याचा संभव आहे म्हणून तसें कांहीं तूर्त करूं नये अशी स्वत:मालेटनेंच प्रस्तुत पत्रांत आपल्या वरिष्ठांस शिफारस केलेली आहे.
वतनदारांशीं वागण्याचें धोरण.- सरंजामदारांप्रमाणेंच देशमुख देशकुलकर्णी, पाटील आदिकरून वतनदारांचा प्रश्नहि मराठशाहींतील मुत्सद्दयास मोठा बिकट वाटत होता असें दिसतें. राजाशीं राजनिष्टेनें वतानें ही त्यांची बुध्दि नव्हती हें ते जाणून होते. जव जव नूतन संपादावें व बळकट झालें म्हणजे एकाचे घ्यावें, दावे दरवडे करावे हा त्यांचा सहज हव्यास; परचक्र आलें म्हणजे वतनाच्या आशेनें हे अगोदर सलूख करितात ही गोष्ट त्यांनां उघड उघड दिसत होती. तथापि त्यांचीं वतनें बुडविलीं असतीं तर तोहि परम अन्याय झाला असता म्हणून आहे तें वतन चालवून प्रजेवर त्यांची सत्ता असूं द्यावी हेंच धोरण मराठी मुत्सद्दयांस स्वीकारणें प्राप्त होतें.
इनामें देण्या संबंधीं धोरण .- कोणी कांहीं नांव घेण्यासारखें राजकार्य केलें असतां त्यास वृत्ति करून देण्याची चाल पेशवाईत बरीच रूढ झाली होती. हा उदारपणा ह्मणा किंवा अदूरदशींपणा ह्मणा वाढ खुंटलेल्या करवीरच्या राज्यांतील मुत्सद्दयांस अर्थातच खपण्यासारखा नव्हता. अगोदरच करून दिल्या गेलेल्या वृत्तींचा अपहार करण्याची क्षुद्रबुध्दि धरूं नये ही गोष्ट त्यांस मान्य होती; पण सेवकलोकीं सेवा उदंड केली तरी त्यांस द्रव्य, अश्व, गज, वस्त्रभूषणादि द्यावीं, योग्य पाहोन थोर सेवा सांगावीं, परंतु नूतन वृत्ति करून देऊं नये असें त्यांचें मत होतें. कां दिवाणमहसुलांत वृत्ति करून दिली तर तितका महसूल वंशपरंपरेनें न्यून होतो; शिवाय त्यांचे वंशजांनीं त्या मागें हराम खोरीची नजर धरली तरी त्यांस त्याच वृत्तीचें बल होणार.
किल्ल्यांच्या महत्त्वाची कल्प ना. -लढण्याच्या कामीं तोफखान्याचा उपयोग होऊं लागल्यापासून गडकोटांचें महत्त्व कांहींच राहीलें नाहीं. तथापि गडकोट म्हणजे राज्याचें मूळ वाटत होतें. कारण मराठ्यांनां ही गोष्ट स्वानुभवानें कळून चुकली होती कीं, औरंगजेबाची दक्षिणेंत स्वारीं झाली तेव्हां राज्यांत किल्ले होते म्हणूनच राज्य अवशिष्ट राहिलें इतकेंच नव्हें तर नवीन मुलूख पादाकांत करण्याच्या कामीं देखील या किल्ल्यांचे महत्त्व वाटत होतें. संभाजीचें आज्ञापत्र म्हणतें कीं ज्या देशांत गडकोट नसतील त्या देशांत आपल्या राज्याच्या सरहद्दीपासून पुढें जबरदस्तीनें नूतन स्थळें बांधीत बांधीत तो देश आक्रमावा, त्या स्थळांच्या आश्रयीं सेना ठेवून पुढील देश स्वशासनें वश करावा. असें करीत करीत राज्य वाढवावें. गडकोंटाचा आश्रय नसतां फौजच्यानें परमुलुखीं टिकाव धरून राहवत नाहीं.
समुद्रावरील व्यापार.- मागें उल्लेखिलेल्या पत्रांत मालेट यानें मराठ्यांच्या व्यापारविषयक आकुंचित धोरणाची जी तक्रार केली आहे ती विशेषत: मलबार किनार्यावरील बंदरांनां अनुलक्षून आहे. तो म्हणतो माझी खात्री आहे कीं, जर मराठ्यांच्या अंगीं सामर्थ्य असतें तर त्यांनीं जमिनीवरच्याप्रमाणें समुद्रावरहि लुटालूट करण्यास कमी केलें नसतें. त्यांनां एवढेंसुध्दां कळत नाहीं कीं, बंदरामध्ये जहाजांची चांगली वर्दळ असली तर कीनार्यावरील प्रदेशांतील लोकसंख्या वाढून फायदे होतात तें जरी बाजूस ठेविलें तरी नुसत्या जकातीपासूनच लूटालुटीपेक्षां किती तरी अधिक उत्पन्न मिळवितां येईल. मालेटनें ज्या भागांतील बंदरांसंबंधानें ही तक्रार केली आहे त्याच भागांत करवीरकरांचें राज्य होतें, व तेथील राज्यकर्त्यांचें एतद्विषयक धोरण आज्ञापत्रांतील आरमारसंबंधीं प्रकरणांत जें व्यक्त झालें आहे त्यावरून या गोष्टी मराठी मुत्सद्दयांस कळत होत्या किंवा नव्हत्या हें स्पष्ट दिसून येईल. आरमारास तनखा मुलखांतून नेमून द्यावा, पैदास्तीवरील नेमणुकीमुळें सावकारास उपद्रव होऊन सावकारी बुडेल, बंदरें राहिलीं पाहिजेत, प्रायोजनिस वस्तु परस्थळींतून आणावी तेव्हां येते, या वाक्यावरून जलमार्गानें होणार्या व्यापाराचें संरक्षण करणें मराठी मुत्सद्दयांस आवश्यक वाटत होतें हें दिसून येतें. ‘सावकारीमुळें जकातीचेंच हांशील होईल’ हें ते पूर्णपणें जाणून होते. ही साहुकारी वाढविण्याकरितां काय उपाय योजिलें पाहिजेत त्याचेंहि दिग्दर्शन या आज्ञापत्रांत केलेलें आहे. “गलिमाचे मुलखाखेरीज विदेशींचे गैरकौली असे सावकारांचीं तरांडी येतां जातां असलीं तरी तीं परभारें जाऊं न द्यावीं; नयें भयें हाताखाली घालून त्यांचे दसोडीस हात न लावितां दिकसा करून बंदरांत घेऊन यावें लांकडे पाणी घेतील तें घेऊं द्यावे; नारळांची शाळी आदि करून जो त्यास जिन्नस पाहिजे असेल तो त्यांस विकत अनुकूल करून द्यावा. या विरहित आणखी खरेदी व पोक्त आत्मसंतोष करितील तो अल्पस्वल्प जकात घेऊन सुखरूप करून द्यावा’ येणेंप्रमाणें चुचकारून, गोंजारून, परकी जहाजें आपल्या बंदरांत आणूं इच्छिणार्या मराठी मुत्सद्दयांनीं सामर्थ्य असतें तर व्यापारी जहाचें लूटून खजीना भरला असता हें संभवनीय दिसत नाहीं. उलटपक्षीं असें म्हणतां येईल कीं, मराठ्यांस टोपीकरांस पूर्णपणें दाबांत ठेवण्याचें आपल्या अंगीं सामर्थ्य नाहीं ही जाणीव होती म्हणूनच ते आपलीं बंदरें राजरोसपणें एकूण एक व्यापारी जहाजास खुलीं ठेवण्यास बिचकत होते. नाहीं तर त्यांनीं आपल्या बंदरांत खुला व्यापार ठेवून जकातीचें उत्पन्न खात्रीनें वाढवून घेतलें असतें.
पेशवाईतील कर्ज. - राष्ट्राच्या प्रगतीस चालना देणारा शासनसंस्थांशीं संबध्द असा अर्थशास्त्रविषयक महत्त्वाचा प्रश्न म्हटला म्हणजे राष्ट्रीय कर्जाचा होय. ज्याला राष्ट्रीय कर्ज नाहीं असें आज एकहि सुधारलेलें राष्ट्र आढळून येणार नाहीं. परंतु मराठेशाहींत राष्ट्रीय कर्जाची कल्पना आपणांस केवळ अभावरूपानेंच दृग्गोचर होते. शिवाजीपासून शाहूच्या कारकीर्दीच्या पूर्वार्धापर्यंत मराठ्यांचें राष्ट्र सामान्यत: निर्मितीच्या अवस्थेंतच मोडलें जात असल्यामुळें त्या वेळीं राष्ट्रीय कर्जाचा प्रश्न शक्यच नव्हता. मराठेशाहीस स्थिरता स्थूलमानानें बाळाजी विश्वनाथाच्या कारकीर्दीच्या अखेरी अखेरीस आली असें म्हणतां येईल, व म्हणून त्या नंतरच्या काळांतच मराठेशाहीच्या शासनसंस्थेच्या सूत्रधारास आपल्या प्रजेपासून कर्ज मागण्याइतका आत्मविश्वास उत्पन्न झालेला आपल्या दृष्टीस पडतो. तथापि मराठेशाहींतील मुत्सद्दयांनां आपल्या उत्तर हिंदुस्थानांतील मोहिमांसाठीं कर्ज उभें करणें किती जड जात होतें हें महशूरच आहे. पहिल्या बाजीरावासारखा कर्तृत्वशाली पुढारीहि या गोष्टीस अपवाद नव्हता. सरकारला कर्ज उभारण्यास अशी अडचण पडण्यांचें कारण राष्ट्रीय कर्जाच्या मुळाशीं असलेली राष्ट्रीय पतीजी कल्पना मराठेशाहींत मुळीं अस्तित्वांतच नव्हती. मराठेशाहींतील मुत्सद्दयांनी सावकारांपासून कर्ज काढण्याचे अनेक वेळां प्रसंग पडले, व त्या त्या वेळीं त्यांनीं रडतखडत कसें तरी कामापुरतें कर्ज मिळविलेंहि. परंतु हें कर्ज त्यांनां राष्टीय पतीवर मिळत नसून वैयक्तिक पतीवर मिळत होतें, व ही वैयक्तिक पतहि किती होती याबद्दल या कर्जावरील जबर व्याज पहिलें म्हणजे व खुद्द पेशव्यांच्या दारींहि सावकार धरणें धरून बसल्याचीं उदाहरणें आपल्या नजरेस पडतात ही गोष्ट लक्षांत घेतली म्हणजे शंका येऊं लागते. शाहूच्या रोजनिशींत असा उल्लेख आहे कीं, शिद्दयावरील स्वारीस बाजीराव गेला तेव्हां स्वारीखर्चास काढलेल्या रकमेवर दरमहा दर शेंकडा तीन रूपये प्रमाणें व्याज ठरवून शिवाय मुदतींत पैसे परत न आल्यास वसूलीकरितां कमाविसी कबूल केली होती ! पहिल्या बाजीरावास या सावकारांच्या त्रासामुळें आपला जीवदेखील कसा नकोसा झाला होता हें त्यानें ब्रह्मेंद्रस्वामीस लिहिलेल्या पत्रांवरून चांगलें दृग्गोचर होतें. इ. स. १७४० व १७६० याच्या दरम्यान बाळाजी बाजीरावानें उभारलेल्या कर्जाची एकूण बेरीज दीड कोटीच्या जवळजवळ होती. या कर्जावर त्याला दरसाल दरशेंकडा सरासरीं १२ पासून १८ टक्केपर्यंत व्याज सरकारच्या खजिन्यांतून भरावें लागत होतें. तथापि त्याच्याहि कारकीर्दीत कांहीं कांहीं रकमांवर दरमहा दरशेंकडा २||
टक्केपर्यंत व्याज दिल्याचीं उदाहरणें आढळतातच. ही पानिपतच्या महायुध्दापूर्वीची गोष्ट झाली. पानिपतास मराठशाहीस जबरदस्त धक्का बसला, व त्यानंतर शिवाय राज्यांत भाऊबंदकीचाहि उद्भव झाला. अशा स्थितींत मराठशाहींतील मुत्सद्दयांनां लोकांत आपली पत राखणें साहजिकच जड गेलें असलें पाहिजे. तथापि मराठेशाहीची शासनसंस्था पूर्वीपेक्षां आतां बरीच स्थिरावली असल्यामुळें थोरल्या माधवरावाच्या कारकीर्दींत व्याजाचा दर सर्रास एकोत्र्या इतका उतरलेला आढळून येतो. थोरल्या माधवरावास मृत्युसमयीं जें थोरलें कर्ज होतें म्हणून म्हणतात तें अवघें चोवीस लाख रूपयेच होतें. त्या वेळचें मराठशाहीचें उत्पन्न व विस्तार याशीं तुलना करतां हें कर्ज म्हणजे फारसें भारी होतें असें नाहीं. तथापि तत्कालीन मुत्सद्दयांच्या व सावकारांच्या दृष्टीनें तो बोजा एकंदरींत व्यक्तिविषयकच असल्यामुळें थोरल्या माधवरावास या कर्जाता फार बाऊ वाटला व तो मृत्युशय्येवर पडला तेव्हा त्याच्या कारभार्यांस तें कर्ज फेडण्याची जबाबदारी स्वत:वर घेऊन आपल्या धन्यास त्यांतून मोकळें करावें लागलें. नानाफडणविसानें आपल्या कारकीर्दींत कांहीं थोडक्या लक्षांहून जास्त कर्ज काढण्याची पाळीच येऊं दिली नाहीं, व दुसर्या बाजीरावास तर कर्जबिर्ज कांहीं नसून उलट त्याची खाजगी संपत्तीच पुष्कळशी वाढलेली होती !
राष्ट्रीय कर्जाच्या कल्पनेच्या अभावीं मराठेशाहीचें झालेलें नुकसान. - पेशव्यांच्या कर्जाची वरील हकीकत वाचली म्हणजे राष्ट्रीय कर्जाची कल्पना अस्तित्वांत नसल्यामुळें मराठेशाहीच्या प्रगतीस किती अडथळा आला याची सहज कल्पना करतां येईल. पहिल्या बाजीरावापासून तों तहत दुसर्या बाजीरावाच्या कारकीर्दींच्या आरंभापर्यंत सरकार कर्ज उभारीत होतें तें केवळ अधिकारारूढ मुत्सद्दयांच्या पतीवर असून ही पत ‘बहुतांशीं’ कर्जाच्या मोबदल्यांत आपणांस मामलत करावयास मिळेल या आशेवरच आधारलेली होती. एका शासनाधिपतीस दिलेल्या कर्जाची फेड त्याच्या पुढील शासनाधिपतीकडून बिनधोक केली जाईल व म्हणून सरकार हेंच आपले पैसे गुंतविण्याचें फायदेशीर ठिकाण आहे असा जर सरकारविषचीं पेशव्यांनां लोकांत विश्वास उत्पन्न करतां आला असता, तर त्यांनां आपल्या मोहिमांकरितांच नव्हे तर इतरहि स्थानिक सुधारणांसाठीं लोकांपासून सुलभपणें व बर्याच कमी व्याजानें पैसे ओढतां आले असते. अशा प्रकारचा विश्वास म्हणजेच राष्ट्रीय पत अस्तित्वांत नसल्यामुळें मराठेशाहीचें किती नुकसान झालें तें पहा. ( १ ) कर्ज उभारण्यास अडचण पडून पैशाच्या अभावीं कित्येक मसलती बिघडल्या, व कित्येक हातींहि घेतां आल्या नाहींत. ( २ ) उभारलेल्या कर्जावर फाजील व्याज द्यावें लागून सरकारी तिजोरीचे बरेंच नुकसान झालें. ( ३ ) सरकारास द्रव्याची आवश्यकता असून तें भारी व्याज देण्यास तयार असतांहि राष्ट्राचा पैसा निरूपयोगी पडून राहिला. ( ४ ) कर्जामुळें भिंधे झालेल्या मुत्सद्दयांस सावकारास मामलती देणें भाग पडत असल्यामुळें सावकारांनीं आपल्या मामलतीवर असतांनां कांहीं गैरवर्तणूक केली तरी तिकडे त्यांनां कानाडोळा करणें प्राप्त होतें. राष्ट्रीय कर्जाच्या कल्पनेचा जन्मच मुळीं त्यानंतरचा आहे असेंहि म्हणतां येत नाहीं. इ. स. १६८८ च्या राज्यक्रांतीच्या पूर्वी, म्हणजे थोरल्या माधवरावच्या काळाच्या सुमारें एक शतक अगोदर, इंग्लंडचें राष्ट्रीय कर्ज थोरल्या माधवरावाच्या कर्जाच्या जवळजवळ अडीच पट असून त्या राज्यक्रांतिनंतर तर तें सोळा कोटी रूपयाच्या आसपास जाऊन पोहोंचलें. इंग्लंड जें कर्ज काढीत होतें तें अंतर्गत सुधारसाठीं काढीत होतें अशांतलाहि भाग नाहीं. मराठ्यांप्रमाणें इंग्लंडलाहि कर्ज काढावें लागलें ते बहुतेक सर्वस्वी परराष्ट्रीय युध्दासाठींच काढावें लागलें; व निदान १६८८ पूर्वी तरी इंग्लंडला राज्यकांतीची भीति पेशवाईत जितकी होती त्याहून कमी नव्हती. तें कांहींहि असलें तरी एवढें मात्र उघड आहे कीं, इंग्लंडला जी झपाट्यानें आपली प्रगति घडवून आणतां आली तिचें कारण बहुतांशीं त्या राष्ट्रानें आरंभींपासूनच आपली पत वाढवून हातीं घेतलेल्या कार्यासाठीं थोडक्या व्याजावर बाहेरून पैसा खेचणें सुलभ करून ठेविलें हें होय. उलट पक्षीं मराठेशाहींतील मुत्सद्दयांचें ध्येय संभाजीच्या आज्ञापत्रांत व्यक्त झाल्याप्रमाणें संकटकालाची तरतूद करून ठेवण्यासाठीं खजिन्याची भरती करणें हें होतें. त्या काळीं फ्रान्स, जर्मनी यांसारख्या यूरोपीय राष्ट्रांचेंहि कांहीं अंशीं असेंच धोरण होते. परंतु त्यांनाहि हें धोरण पुढें बदलावें लागलें; व आतां तर सर्वच देशांत राष्ट्रास जरूर नसलेला पैसा कराच्या रूपानें प्रजेपासून गोळा करून सरकारी तिजोरींत डांबून ठेवण्यापेक्षां, आपत्प्रसंगीं राष्ट्रीय कर्जाच्या भिषानें प्रजेची शिल्लक गुंतवून प्रजेला तिच्यापासून कराच्या रूपानें घेतलेला पैसा व्याजाच्या रूपानें अंशत: परत देणेंच अधिक श्रेयस्कर आहे हें तत्त्व सर्वमान्य झालें आहे. अठराव्या शतकांत हिंदुस्थानच्या संपत्तीचा ओघ ज्या वेळीं चारहि दिशांनीं पुण्यांत येऊन पडत होता त्या वेळीं जर मराठेशाहींतील मुत्सद्दयांस राष्ट्रीय कर्जाच्या तत्त्वाचा आपली शासनसंस्था हांकण्याच्या कामीं उपयोग करून घेतां आला असता तर महाराष्ट्राच्या इतिहासानें आहे त्याहून वेगळेंच स्वरूप धारण केलें असतें हें सांगावयास मोठ्या अर्थशास्त्राची जरूर नाहीं.
आतां आपण अर्थशास्त्राच्या यूरोपीय विकासाकडे लक्ष देऊं
ग्रीक व रोमन अर्थशास्त्र.- यूरोपीयांच्या आर्थिक कल्पनांचा इतिहास द्यावयाचा म्हणजे प्रथम ग्रीकांकडे व नंतर रोमन लोकांकडे वळलें पाहिजे. ग्रीकांच्या अर्थशास्त्रीय विचारांचें विवेचन फारसें विस्तृत होणार नाही. आरिस्टाटळच्या पॉलिटिक्स या ग्रंथात त्याचे अर्थशास्त्रीय विचार आढळतात. त्यांत देखील द्रव्य हें साध्य धरलें नसून समाजाचा चांगली स्थिति हें साध्य धरलें आहे; आणि द्रव्योत्पादन हें एक समाजाचें किंवा राज्याचें खातें म्हणून त्याचा विचार केला आहे. समाजघटनेस कारण गरजांच्या विविधत्वामुळें होणारा अन्योन्याश्रय असें दिलें नाहीं तर मनुष्यमात्रामध्यें इतरांच्या सहवासाची इच्छा हें कारण दिलें आहे. आरिस्टाटलच्या अर्थविषयक कल्पना व्यापक होण्यास बर्याच अडचणी होत्या. जेथें गुलामगिरी सामान्य होती आणि अरिस्टाटलसारख्या तत्ववेत्त्यासहि ती स्वाभाविक संस्था वाटत होती; त्या समाजांत स्वतंत्र मनुष्यांच्या गरजांमुळें समाजांत जो अन्योन्याश्रय उत्पन्न होतो तो होत नाहीं, आणि आर्थिक हेतूचें जें सर्वव्यापकत्व अर्वाचीन समाजांत दिसून येतें तें दिसून येत नाहीं आणि त्यामुळें अर्थशास्त्रीय कल्पनाही फारशा विकसित होणें शक्य नव्हतें. तथापि खासगी मालमत्तेचें आणि वैयक्तिक कुटुंबसंस्थेचें महत्त्व आरिस्टाटल पूर्णपणें जाणत होता आणि याच्याविरूध्द ज्या कल्पना त्याचा गुरू प्लेटो यानें व्यक्त केल्या होत्या त्या कल्पनांस अरिस्टाटलनें जोराचा विरोध केला आहे. त्यानें संस्थानाची लोकसंख्या नियमित रहावी इत्यादि विचार प्रगट केले आहेत. त्याचे उत्पादनविषयक विचार मात्र बरेच असमंजस आहेत. शेतकीसारख्या क्रियांस तो उत्पादक समजतो पण ज्या क्रियांनीं वस्तूंचें केवळ स्वरूप पालटतें त्या क्रियांस तो उत्पादक समजत नाहीं.
रोमन ग्रंथकारांनीं अर्थशास्त्रीय विचार फारसे प्रगट केले नाहींत, तथापि त्यांच्या अर्थविषयक योग्यायोग्यतेच्या कल्पना त्यांच्या कायदेसंग्रहांतून आढळतात. उदाहरणार्थ त्यांत व्याज आकारण्यासंबंधानें कठोरता दृष्टीस पडते. रोमन लोकांचें वाङ्मय मोठें आहे, पण त्यांत अर्थशास्त्रीय विवेचन फारसें नसल्यामुळें या शास्त्राच्या विकासांत त्या राष्ट्राला स्थान नाहीं.
मध्ययुगीन अर्थशास्त्र. - अर्थशास्त्राच्या इतिहासाच्या दृष्टीनें मध्ययुग म्हणजे ४००-१३०० इसवी हा काल होय. या युगांतहि आर्थिक विचाराची प्रगति फारशी झाली नाहीं. फ्यूडल उर्फ संयुक्तसामंतपध्दति ही आर्थिक विकासास फारशी अनुकूल नव्हती आणि रोमन कॅथॉलिक संप्रदायाच्या योगानें बरीचशी मालमत्ता चर्चनें म्हणजे संप्रदायाच्या शासनसंस्थेनें उपटली. या कारणांनीं आर्थिक आयुष्यक्रम एका नियमित कक्षेंत फिरत होता. पण पुढें मध्ययुगाच्या उत्तर भागांत आर्थिक इतिहासाचें स्वरूप पालटूं लागलें. कूसेड नामक युध्दांमुळें अनेक राष्ट्रांचा एकमेकांशीं संपर्क आला, अनेक सरदार धुळीस मिळाले आणि त्यांची मालमत्ता सावकारी करणार्या वर्गाच्या तावडींत जाऊं लागली आणि निरनिराळ्या राष्ट्रांमध्यें व्यापार सुरू झाला. अनेक राष्ट्रांतून पोपला दक्षणा जावयाची असे त्यामुळें पैसे पाठविण्याचा धंदा करणारा वर्ग वाढला. या वेळेस इंग्लंडमध्यें लँबड लोक आले आणि त्यांनीं आपल्या धंद्याच्या जागेंत ज्या पैशाच्या क्रिया सुरू केल्या त्यांची परंपरा इंग्लंडांत अव्याहत चालू आहे व, लंडनमधील रोकड बाजाराच्या रस्त्याला लॉंबर्ड स्ट्रीट असें नांव मिळालें आहे.
मध्ययुगाच्या शेवटाला गुलामगिरी बंद होऊन सर्फ नांवाच्या अर्ध्यामुर्ध्या गुलाम, अर्ध्यामुर्ध्या स्वतंत्र मजूरांच्या स्वरूपाच्या अशा वर्गाचें अस्तित्व उत्पन्न झालें. त्याचा पुढें अनेक धंदे करणार्या लोकांमध्यें विकास झाला. अनेक ठिकाणीं शहरें स्थापन झालीं. त्या शहरांमध्यें अधिक स्वातंत्र्य उपभोगणारे आणि अन्योन्याश्रयी असे वर्ग दिसूं लागले. या काळांत बौध्दिक चळवळी फारशा झाल्या नाहींत बराचशी विद्वत्ता ख्रिस्ती मताचें लोकांस पटेल असें विवरण करण्यांत खर्च झाली. टामस अक्वायनसनें आरिस्टाटलचीं मतें लोकांस या काळांत समजावून देण्यासाठीं एक ग्रंथ लिहिला.
चौदाव्या व पंधराव्या शतकांच यूरोपच्या आर्थिक आयुष्यक्रमांत बरेच फेरफार होत होते. संयुक्तसामंत राज्यपध्दति उर्फ संरजामी पध्दति मोडली जाऊन राजास जितकें स्वातंत्र्य प्राप्त झालें तितकें सामंतांच्या भाराकालीं दडपत असलेल्या प्रजेसहि मिळूं लागलें, आणि नगरांची वृध्दि होत चालली, आणि जे धंदे शहरांतच वाढावयाचे त्यांच्या वाढीला सुरवात झाली. एवढेंच नव्हे तर जेव्हा राजसत्ता सामंतसत्तेबरोबर भांडत होती तेव्हां या स्वतंत्र शहरांची आणि तींतील उद्यमी व श्रमजीवी वर्गांच्या साहाय्याजी अपेक्षा राजे व सामंत हे आळीपाळीनें करीत त्यामुळें नगरांत होत असलेल्या आर्थिक क्रियांचें व त्या क्रिया करणारांचें राजकीय महत्त्वहि वाढूं लागलें. शासनसंस्था जसजशा अधिकाधिक बळकट होऊं लागल्या आणि पगारी सेन्यें ठेवण्यांत येऊं लागलीं तसतसें उद्योगधंद्याचें स्थैर्य वाढलें. आणि त्याबरोबर सैन्याच्या सुधारणेकडेहि अधिकाधिक लक्ष पुरविण्यास सुरवात झाली. आणि कार्ययोजक आणि काम करणारे यांतील आर्थिक अंतरहि वाढूं लागलें. मुद्रणकला या काळांत चांगलीच प्रचलित झाली असल्यामुळें, उद्योगधंद्याची वाढ व मानसिक उन्नति यांचा अन्योन्याश्रय स्थापन होण्यास सुरूवात झाली. होकायंत्र प्रचारांत येऊं लागलें, आणि दर्यावर्दीपणाचें काम अधिकाधिक सुलभ होत गेलें. व्यापारी क्रियांची जशी वाढ होत गेली तशी हुंड्या वगैरे पतीवर अवलंबून असणार्या रोख्यांचा पैशाऐवजी उपयोग होण्यास सुरवात झाली एवढेंच नव्हे तर सार्वजनिक संस्थाचीहि पत निश्चित होत गेली. या क्रिया फ्लारेन्स, व्हेनिस, जिनोआ या ठिकाणीं हालंड व इंग्लड यांचें महत्त्व स्थापन होण्यापूर्वीच झाल्या होत्या. या काळांत नवीन प्रकारची परिस्थिति जरि उत्पन्न होत होती तरी तीपासून बौध्दिक चळवळ एकदम सुरू झाली नाहीं. सेंट टामस अक्वायनसच्या ग्रंथांतील समाजशासनविषयक कल्पनाच लोकांत प्रचलित होत्या. व या काळांत जर कांहीं व्यावहारिक विषयावर विचार झाला असेल तर तो पैशाच्या स्वरूपावर र्होय आणि या विषयावर मात्र एक अगदीं अर्वाचीन काळास शोभेल असा ग्रंथ निर्माण झाला. या ग्रंथांचे कर्तृत्व निकोले आरेस्मे याच्याकडे आहे. हा ग्रंथकार १३८२ मध्यें मरण पावला. हा फ्रान्सचा राजा पांचवा चार्लस् याचा शिक्षक असून तो पुढें लिस्यूक्सचा विशप झाला. या ग्रंथकाराची जर्मन अर्थशास्त्रज्ञ रोशेर यानें फार तारीफ केली आहे. चौदाव्या व पंधराव्या शतकांत अर्थशास्त्राविषयक महत्त्वाचा ग्रंथ या खेरीज दुसरा नाहीं. याग्रंथाची पुनरावृत्ति वूलौस्की यानें १८६४ मध्यें प्रसिध्द केली.
सोळावें शतक. - पंधराव्या शतकाच्या अंती अमेरिकेचा, व हिंदुस्थानास जाण्याच्या जलमार्गाचा शोध लागल्यामुळें राजकीय इतिहासामध्यें जसा निराळा काळ उत्पन्न झाला तसाच तो आर्थिक इतिहासामध्येहि झाला; आणि व्यापारविषयक आणि उद्यमविषयक उत्कर्षाचें आश्रयस्थान मध्य व दक्षिणयूरोप न राहतां पश्चिमयूरोप बनलें. आणि या नवीन शोधामुळें जे आर्थिक व सामाजिक फरक झाले त्यामुळें आर्थिक विचारासहि निराळेंच चालन मिळाळें. पश्चिमयूरोपांत व्यापार आणि उद्योग यांची वाढ करण्याकडे मुत्सद्यांचें लक्ष लागलें, आणि राजनिति तद्विषयक बनली आणि लढायांचा या धोरणांशीं निकट संबंध लक्षांत येऊं लागला.
सोळाव्या शतकाच्या प्रारंभापासून ज्या राज्यसंपत्तिवृध्दि विषयक कल्पना मुत्सद्यांच्या डोक्यांत होत्या आणि ज्या कल्पनांमुळें राज्यांची व्यवहारनीति ठरत असे त्यास अर्थशास्त्रकार ‘मर्कंटाइल सिस्टिम” म्हणतात. मर्कंटाइल सिस्टिम ऊर्फ “वाणगटी अर्थशास्त्र” म्हणजे काय आणि त्यांमध्यें कोणत्या कल्पना येतात, आणि त्या कल्पनाप्रमाणें जीं कार्यं राष्ट्रांनीं केलीं, तीं तात्पुरते संपत्तिवृध्दिविषयक किंवा राजकारणाचे उपाय म्हणून केलीं, कीं, त्याच्या मूळाशीं कांहीं अर्थशास्त्रविषयक चुकीच्या कल्पना होत्या याविषयीं मतभेद आहे आणि त्याविषयीं वाद अजून संपला नाहीं. गस्टाव्ह श्मोलर सारखे लोक मर्कंटाईल विचारांचे समर्थन करतात आणि त्यांस अमेरिकन अनुयायीहि सांपडतात. दहाबारा वर्षांपूर्वी प्रो. स्माल ( शिकागो युनिव्हर्सिटी ) यांनीं कॅमेरालिस्टवर जे पांडित्यपूर्ण पुस्तक प्रसिध्द केलें त्यांत हा वाद उकरून काढला आहे आणि आडाम स्मिथ यासारख्या मर्कंटाईल कल्पनांविरूध्द लिहिणारास चावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. वाणगटी अर्थशास्त्रामध्यें जीं मतें व्यक्त होतात त्यांची साधारणपणें मांडणी येणेंप्रमाणें करण्यांत येते. ( १ ). पैसा आणि संपत्ति हीं ते एकच समजत. ( २ ) व्यापाराचा उद्देश असा असावा कीं, जेणेंकरून आपल्या देशांत सोन्यारूप्यासारख्या मौल्यवान धातू ओढल्या जातील. यासाठीं निर्गत जास्त करावी आणि आयात कमी असावी. “व्यापारी देवघेवीची शिल्लक” म्हणजे ‘ब्यालेन्स ऑफ ट्रेड” इतर राष्ट्रांविरूध्द निघावी व आपल्यातर्फेनें निघावी. आपली निर्यात जास्त व्हावी म्हणून सरकारनें सर्व प्रकारच्या युक्त्या योजाव्यात, त्यांत परक्या मालावर बहिष्कार किंवा जबरदस्त जकातहि असावी, निर्गतीस मदत करावी. वगैरे कल्पना पुढें आल्या. अर्वाचीन अर्थशास्त्राची द्वियीय अवस्था जर वाणगटी अर्थशास्त्र ( पहा ) होय तर उद्योगाची व देवघेवीची स्वतंत्रता ही त्याची तृतीयावस्था होय. ‘निसर्गसिध्द स्वातंत्र्य’ हें तत्त्व जोरानें पुढें आलेल्या अवस्थेंत ( १ ) बँकांची अत्युच्च परिणति ( २ ) व यांत्रिक उत्पादन हीं दोन सारभूत अंगें होतीं. या अवस्थेंत भांडवलवाले व मजूर यांमधील विरोध तीव्र झाला. तथापि यंत्राच्या साहाय्यानें अतिशय कष्टाचीं कामें सुलभ झाल्यामुळें मनुष्याची उच्च दर्जाच्या कामांकडे योजना होऊं लागली व त्यामुळें मनुष्याची आध्यात्मिक योग्यता वाढली.
मध्ययुगांत युध्द हें प्रधान अंग, व उद्योगधंदा हें त्याला पोषक अर्थात् गौण अंग समजलें जात असे. उद्योगधंद्यांस उत्तेजन देण्यांत राजांचा मुख्य उद्देश द्रव्यबल वाढवून युध्दास पात्रता उत्पन्न करण्याचा असे. परंतु यांत्रिक युगांत हें पारडें फिरलें व व्यापारास प्राधान्य येऊन सैन्य व मुत्सद्दीपणा हीं दोनहीं व्यापारास मदत करूं लागलीं. अठराव्या शतकांतील लढाया या वसाहती स्थापणें व त्यांच्याशीं व्यापार वाढविणें या दोन उद्देशांनीं प्रेरित झालेल्या होत्या व त्यामुळें राष्ट्रांतील कलह वृध्दिंगत झाले; तथापि आधुनिक समाजाचें ध्येय उद्यम व आर्थिक उत्पादन हें आहे हें यामुळें निश्चित झालें. याचा राजकीय परिणाम इंग्लंड व फ्रान्समध्यें असा झाला कीं. व्यापारामुळें होणारी समाजक्रांति ही राजसत्तेस अनिष्ट वाटल्यामुळें ती बंद करण्याकरितां बौध्दिक दुर्बलता स्वीकारून नवीन कल्पनांचा नाश करण्याकडे तेथील सरकारांचें लक्ष वेधलें. तथापि ही क्रांति यामुळें बंद होऊं शकली नाहीं. पूर्वींची समाजसरणी बदलून नवीन उत्पन्न करण्याचा फ्रान्समधील सर्व वर्गांनीं निश्चय केला. परंतु नवीन रचना कशी असावी हें कोणासहि निश्चित सांगतां येत नसल्यामुळें फ्रान्समधील क्रांति बरिच घातक स्वरूपाची झाली. व्हॉलटेर व रूसो यासहि नवीन काय पाहिजे याची स्पष्ट कल्पना नव्हती. त्यांच्याचप्रमाणें ‘फिजिओकॅट्स’ या आर्थिक संप्रदायांची स्थिति होती. या संप्रदायाचा थोडासा इतिहास आतां देऊं.
इंग्लंडांतील नवीन प्रागतिक विचारांचा प्रतिध्वनि अठराव्या शतकाच्या प्रारंभीं फ्रान्समध्यें होऊं लागला. शेतकर्यांचे दारिद्र्य, सरकारी जमाखर्चाचें अस्थिरत्व व करांचां बोजा हीं सर्व दु:खे ‘मर्कंटाईल पॉलिसी’ मुळें उत्पन्न झालीं आहेत असा बुध्दिमान लोकांचा समज झाला. या लोकांत ब्वागिलबेर् व्होबान्, मॉनतेसक्यु, हे प्रधान होते. यांचा भावार्थ असा होता कीं, सोनें व रूपें ही खरी संपत्ति नसून शेतकीनें व व्यापारानें उत्पन्न झालेल्या वस्तू ही खरी संपत्ति आहे. सरकारी नियंत्रणानें उत्पादनास फायदा होण्याऐवजीं नुकसान होतें.
शेतकी हा उत्पादनाचा मुख्य मार्ग आहे. आयात व निर्यात मालावर जकात असणें अनिष्ट आहे. सर्व राष्ट्रांत खुला व्यापार असणें श्रेयस्कर आहे. समाजाच्या सुस्थितीस राजकीय कायद्यांपेक्षां नैसर्गिक कायद्यांची जास्त जोड पाहिजे अशा रीतीचे त्यांचे विचार होते. फिजिओकॅटिक संप्रदायाचे मुख्य केझने ( १६९४-१७७४ ) व गूरने ( १७१२-१७५९ ) हे होते. यांनीं तत्पूर्वकालीन विचारांना संबध्द करून त्या विचारांची एक पध्दति बनविली. समाजांतील प्रचलित व्यवस्था या सर्व कृत्रिम असून त्यांच्यांतील सर्व दोष या कृत्रिमत्वामुळें उत्पन्न झाले आहेत अशी यांची मुख्य कल्पना आहे. जगांत ‘नैसर्गिक कायदा’ आहे
तदनुसार सर्व समाजरचना असावी. तशी नसल्यास अनेक आपत्ति उत्पन्न होतील या उपपत्तीचा विशेष कटाक्ष प्रचलित आर्थिक संस्थांवर होता. संप्रदायाचीं आर्थिक प्रमेयें पुढें लिहिल्याप्रमाणें होतीं. ज्या श्रमापासून धान्य व इतर कच्चा माल तयारं होतो तेच ‘उत्पादक’ होत. या श्रमांनीं त्यास लागणार्या खर्चापेक्षां जास्त माल तयार होतो. कारखाने हे उत्पादक नव्हत; कारण त्यांत श्रमाच्या खर्चापेक्षां जास्त माल उत्पन्न होत नाहीं. व्यापारामुळें देशाच्या संपत्तींत भर पडत नाहीं; फक्त संपत्ति एका हातांतून दुसर्या हातांत जाते. शेतकीच्या संपत्तींतून इतर सर्व धंद्यांतील लोकांची व्यवस्था लागतें. वकील, शिपाई, वैद्य, वाणी हे सर्व अनुत्पादक आहेत सर्व करांपेक्षां शेतकीवरील कर हाच जास्त न्याय्य व सोईचा आहे. या सर्व सिध्दांतांचा तत्कालिक परिणाम विध्वंसक होता. ‘मर्कंटाईल पॉलिसी’च्या नियंत्रणांविरूध्द या सर्वांचा आक्षेप असे. सरकरानें अमुक वस्तु उत्पन्न कराव्या, अमक्या दरानें विकाव्या इत्यादि तर्हेचे नियम करणें समाजाच्या हितास विघातक आहे. वस्तुत: सरकारी नियंत्रणापासून पुष्कळ फायदे होते परंतु या संप्रदायाचें त्यांच्याकडे लक्ष गेलें नाहीं. सुधारकांच्या पध्दतीप्रमाणें त्यांनीं पूर्वकालीन संस्थांच्या दोषांची अतिशयोक्ति केली. या संप्रदायाचें मुख्य ध्येय व्यक्तिस्वातंत्र्य होतें असें म्हटल्यास हरकत नाहीं. त्याचप्रमाणें देशांतील राजकीय कायदे नैसर्गिक कायद्यांच्या बरहुकूम असले पाहिजेत असेंहि त्यांचें मत होतें.
या संप्रदायाचा फ्रान्समधील सामान्य लोकांवर विशेष परिणाम झाला नाहीं; परंतु राज्यक्रांतीनंतर ‘कॉनस्टियुअंट असेंब्ली’ वर त्याचा बराच पगडा होता. परंतु कांहीं काळानंतर तो संप्रदाय नामशेष झाला. इटलीमध्यें अठराव्या शतकांत पुढील अर्थशास्त्रज्ञ प्रमुख होते:-बँडीनी, जिनोव्हेसी, बिकॅरिया, व्हेरी, कार्ली, व्हास्को, ऑरटीस. स्पेनमध्यें उस्टारिझ हा ‘मर्केटाईल पॉलिसी’ चा भक्त होता व रॉडरिग्यू हा फिजिओकॅटिक संप्रदायाचा अनुयायी होता. जर्मनी मध्यें ‘मर्कटाईल’ पध्दतीचें बरेंच प्राबल्य होतें. परंतु कां कालानंन्तर:फ्रेडरीक यानें व नंतर श्लेटबीन् ( १७३१-१८०२ ) व श्मॉलझ ( १७६४-१८३१ ) यांनीं फिजिओकॅटिक मतांचा प्रादुर्भाव केला. हॉलंडमध्यें अठराव्या शतकांत आर्थिक वाङ्मयांत विशेष प्रगति झाली नाहीं. इंग्लंडांत आर्थिक शोधांच्या बाबतींत अठराव्या शतकाच्या प्रारंभीं औदासीन्य होतें. १७३५ मध्यें प्रथम बर्कले या तत्त्ववेत्यानें नवीन विचारांनां चालन दिलें. त्यानंतर ह्यूम यानें आपल्या निबंधावलींत अर्थशास्त्रावरील कांहीं विषयांवर अगदीं आधुनिक तर्हेचीं मतें प्रतिपादन केलीं. पैशाला दिलेलें फाजील महत्त्व कमी करून वस्तू याच खरी संपत्ति होत हें त्यानें दाखविलें. भिन्न देशांत व्यापार असणें हें सर्वांच्या हिताचें आहे असें त्याचें मत होतें, व त्यामुळें व्यापारास प्रतिबंधक अशा जकाती बसविणें हें त्याच्या मतानें अनिष्ट आहे. ह्यूमनें ऐतिहासिक दृष्टि आर्थिक वादांमध्यें आणिली, व प्रत्येक विधानाच्या पुष्टीकरितां इतिहासांतील घडलेल्या गोष्टींचें प्रमाण देण्याचा उपक्रम केला. ह्यूमचा अँडॅम स्मिथच्या मनावर पुष्कळ परिणाम झाला व त्याच्या पध्दतीचीं उत्तम अंगें त्यानें उचललीं. अँडॅम स्मिथच्या पूर्वीच्या अर्थशास्त्रज्ञांत जोशिआ टकर ह्यांचीं गणना केली पाहिजे. यानें खुल्या व्यापाराच्या तत्त्वाचा जोरानें पुरस्कार केला. सर जेम्स स्टुअर्ट हाहि अत्युत्तम ग्रंथकार असून त्यानें आपल्या पुस्तकांत ‘मर्कंटाईल’ पध्दतीचें जुन्या दृष्टीप्रमाणें समर्थन केलें आहे. विशेषत: मूल्याची उपपत्ति व प्रजावृध्दि या विषयांवरील त्याचें विवेचन फारच अप्रतिम आहे. तथापि लवकरच अँडॅम स्मिथचा प्रसिध्द ग्रंथ बाहेर पडल्यामुळें हा ग्रंथकार मागें पडला. अँडॅम स्मिथ हा अर्थशास्त्राचा जनक आहे असें कांहीं लोकांचें म्हणणें आहे परंतु हें वस्तुस्थितीच्या विरूध्द आहे. सामाजिक संपत्ति हा विषयच असा आहे कीं, अनादिकालापासून अनेक ग्रंथकारांनीं त्यावर आपले विचार प्रगट केले आहेत. स्मिथच्या वेळीं हें शास्त्र बर्याच वरच्या पायरीला गेलें होतें. टर्गोसारख्या ग्रंथकारांनीं आपल्या ग्रंथांत बरेंच पध्दतशीर विवेचन केलें होतें. परंतु पूर्वीच्या ग्रंथाच्या आधारावरच त्यानें नवीन इमारत अशा तर्हेची रचली कीं तिच्यांत डौलदारपणा येऊन ती अनेक वर्षे टिकली. दुसरे कांहीं लोक फिजिओकॅट व स्मिथियन असे भिन्न संप्रदाय मानतात परंतु हें चुकीचें आहे. कारण, या दोहोंमध्यें वैषम्यापेक्षां साम्यच अधिक आहे. पूर्वीच्या यूरोपातील राजसत्तेनें जीं नियंत्रणें व्यापारावर घातलीं तीं दोघांच्याहि मतानें त्याज्य आहेत, व असें असण्याची दोघांनीं दिलेलीं कारणेहि एकाच आधारावर रचलेलीं आहेत. स्मिथची टीका जास्त बारकाईची व जास्त पूर्ण आहे; व उत्पादक व अनुत्पादक श्रमावरचीं फिजिओकॅट पंथाचीं चुकीचीं विधानें त्यानें दुरूस्त केलीं, परंतु त्या पंथांतील सर्व उत्तम सिध्दांत त्यानें आपल्या ग्रंथांत ग्रथित करून ठेविले; व मध्ययुगांतील संस्थांवर टीका करून त्यांचा नाश करण्याचें कार्य त्या पंथापेक्षां जास्त परिणामकारक रीतीनें केलें. स्मिथच्या वेळेस अर्थशास्त्र व इतर शास्त्रें यांचें पृथक्करण झालेलें नव्हतें त्यामुळें हा विषय नीतिशास्त्राबरोबर स्कॉच विश्वद्यालयांत शिकवीत असत. हल्लींच्या समाजशास्त्राचें दिग्दर्शन स्मिथनें आपल्या नीतिशास्त्रांवरील पुस्तकांत केलें होतें. परंतु समाजशास्त्र लिहिण्याचा त्याचा विचार शेवटास गेला नाहीं. स्मिथनें आपल्या ‘वेल्थ ऑफ नेशन’ या ग्रंथांत अनुगमन व निगमन या दोहोंपैकीं कोणती पध्दति स्वीकारली याविषयीं बराच वाद आहे. कांहींच्या मतें त्याची पध्दति अनुगमनात्मक होती व कांहींच्या मतें ती निगमनात्मक होती. बकलच्या मतानें ती निगमनात्मक होती. हें मत बहुतांशीं बरोबर आहे. स्मिथच्या ग्रंथांत अनुभवानें सिध्द झालेल्या घडलेल्या गोष्टींच्या आधारानें निगमनाप्रमाणें अनुमानें क्रमानें काढलेलीं आहेत. याशिवाय घडलेल्या गोष्टीच्या ऐवजीं कांहीं ठराविक गृहीतप्रमेयांपासून निगमनपध्दतीनें अनुमानें काढलेलीं आहेत. यांपैकीं एक गृहितप्रमेय असें आहे: सृष्टीमध्यें प्रत्येक व्यक्तिच्या ठायीं स्वत:चें हितसंरक्षण करण्याची बुध्दि दिलेली आहे. व सृष्टीची रचनाच अशी आहे कीं या व्यक्तिच्या बुध्दीमुळें समाजाचेंहि कल्याण होतें. हीं व्यक्तीच्या व समाजाच्या अविरोधाची कल्पना स्मिथच्या बहुतेक सिध्दांतांच्या मुळाशीं दिसून येते. परंतु ऐतिहासिक शोधाची दृष्टी स्मिथची तीव्र असल्यामुळें त्याच्या अनुयायांनीं निगमनात्मक पध्दतीचा जसा अतिरेक केला तसा त्यानें केला नाहीं. नैसर्गिक कायद्याच्या उपपत्तीवर त्याचा विश्वास होता. तथापि मॉन्तेसक्यूच्या पुस्तकांतील अनुगमनात्मक ( इंडक्टिव्ह ) पध्दतीचा त्याच्यावर परिणाम झालेला होता. अशा रीतीनें दोनही पध्दतीचें मिश्रण स्मिथच्या ग्रंथांत दिसून येतें. वस्तुत: स्मिथनें समाजशास्त्राचे नियम मुळींच शोधून काढले नाहींत. परंतु समाजांतील दृश्यांस नियम आहेत हें त्यानें दर्शविलें. समाजांतील प्रत्येक अवस्था त्या वेळच्या परिस्थितीस धरून असते व ऐतिहासिक कारणांनीं ती बध्द व मर्यादित असते. कांहींचें मत असें आहे कीं, स्मिथचा ग्रंथ हा अगदीं विस्कळित आहे व त्यांत मोठ्या ग्रंथांत अवश्यक असणारी संगति नाहीं. परंतु हें मात्र अग्राह्य आहे. जरी या ग्रंथांत आधुनिक ग्रंथांप्रमाणें निरनिराळ्या भागांचें व प्रकरणांचें व्यवस्थित अविष्करण नाहीं तरी विचारांचें व तत्त्वांचें ऐक्य या ग्रंथांत खात्रीनें दिसून येतें व त्यांत विशेष विसंगतताहि दिसून येत नाहीं. स्मिथचीं मतें आतां क्रमानें देऊं. एकंदर राष्ट्राचे श्रम हा सर्व अवश्यक संपत्तीचा मुख्य उगम आहे हा त्याचा पहिला सिध्दान्त आहे. या सिध्दान्तावरून त्याचें फिजिओकॅट्सपासून भिन्नत्व व्यक्त होतें. श्रमविभागापासून श्रमाची उत्पादनशक्ति अतिशय वाढते. श्रमविभागाच्या तत्त्वाचें स्मिथनें इतकें अप्रतिम वर्णन दिलेलें आहे कीं, आधुनिक सर्व ग्रंथकार त्याचा अनुवाद करितात. श्रमविभागांचें मूळ एक वस्तूच्या ऐवजीं दुसरीचा विनिमय करण्याची मनुष्याची इच्छा हें आहे. श्रमविभाग हा भांडवलाच्या वृध्दीवर अवलंबून आहे. श्रमविभागानंतर क्रमानेंच विनिमय सामान्याची जरूर भासते व पैसा अस्तित्वांत येतो. पैशापासून मूल्याची कल्पना उद्भूत होते. मूल्याचें मुख्य कारण श्रम हें आहे. श्रमाच्या दोन संख्या नेहमीं एकाच किंमतीच्या असतात. परंतु व्यवहारांत पैशामध्यें मूल्याची गणना दर्शवितात. अनेक शतकेंपर्येंत एकच किंमत असल्यामुळें सोनें व रूपें ह्या धातू या कामाकरितां सर्वांत उत्कृष्ट ठरल्या आहेत. परंतु भिन्न कामांमधील तुलनेकरितां श्रम हेंच जास्त चांगलें मापन आहे. श्रमाचें बक्षीस मजुरी हें आहे. भांडवल एकाजवळ पुष्कळ जमून तें त्यानें दुसर्यांनां मजून म्हणून उत्पादनाच्या कामीं लावण्याकरितां खर्च केलें म्हणजे ‘नफा’ उत्पन्न होतो. जमीन ही मालकीची झाल्याबरोबर ‘खंड’ सुरू होतो. प्रत्येक सुधारलेल्या समाजांत सर्व वस्तूंच्या मूल्यांत हीं तीन अंगें म्हणजे जमिनीचा खंड, नफा, व मजुरी असतात. खंड, नफा व मजुरी ह्या प्रत्येकाचे दर त्या त्या काळीं ठरलेले असतात व त्या सर्वांची बेरीज केली म्हणजे वस्तूच्या मूल्याची नैसर्गिक इयत्ता ठरते. बाजारांतील किंमत या इयत्तेच्या किंचित् वर किंवा खालीं असते. परंतु ती विशेष दूर जाऊं शकणार नाहीं. कांहीं वस्तूंच्या उत्पादनांत एकाच व्यक्तिच्या हातांत सर्व उत्पादन असल्यास नैसर्गिक मूल्यापेक्षां अतिशय किंमत होऊं शकते, मजूर व भांडवलवाले यांच्या दरम्यान कलह होऊन मजुरीचा दर ठरला जातो, अनेक धंद्यांमध्यें नफा एका पातळीवर येण्याची प्रवृत्ती असते व ही प्रवृत्ति स्पर्धेमुळें जास्त व्यवस्थित होते. भांडवल कमी असल्यास नफ्याचा दर जास्त असतो व पुष्कळ असल्यास कमी असतो.
जमिनींत झालेल्या मालाची किंमत सामान्य नियमांप्रमाणें ठरल्यानंतर, नफा व मजुरी देऊन जी बाकी राहील ती खंड या रूपानें जमीनदारास मिळते. खंड, मजुरी व नफा हे तीन आदा मिळविण्याचे मार्ग आहेत. समाजांतील मुख्य वर्ग या तीन प्राप्तींच्या कोणत्यातरी एक अथवा अधिक मार्गांनीं श्रीमंत होतात. जमीनदारांचें हित व समाजाचें हित याचें तादात्म्य असतें. मजुराचेंहि कल्याण समाजाच्या प्रगतींत असतें. परंतु भांडवलवाल्यांचें हित समाजाच्या हिताच्या विरूध्द असतें. भांडवल हें निश्चल व चल अशा दोन प्रकारचें असतें. राष्ट्रांतील एकंदर उत्पादनांतून निश्चल भांडवल व पैसा वजा केला म्हणजे निखालस राष्ट्राची प्राप्ति राहतें. सुधारलेल्या देशांत एकंदर राष्ट्राच्या प्राप्तीपैकीं अधिक भाग भांडवलाकरितां ठेवला जातो. पैसे वांचवणें हें राष्ट्रहिताच्या दृष्टीनें फार महत्त्वाचें आहे. उधळे लोक समाजांत असल्यास राष्ट्राच्या उत्पादनास मंदगति येते. उत्पादक मजूर वाढविणें किंवा त्यांची उत्पादन शक्ति वाढविणें हे दोन राष्ट्रसंपन्न करण्याचे मार्ग आहेत. दोनहि मार्गांत जास्त भांडवल लागतें. भांडवल देशांत जसें जास्त होईल तसा व्याजाचा दर कमी होत जातो. यूरोपांत व्याजाचा दर कमी झाला तो सोनें व रूपें विपुल झाल्यामुळें नसून भांडवल वाढल्यामुळें झाला. जमीन व खाणी यांमध्यें अधिक उत्पादक मजूर लावता येतात. तितकेंच भांडवल. कारखान्यांत घातल्यास कमी उत्पादकमजूर लागतात. त्याहि पेक्षां घाऊक व्यापारांत कमी व सर्वांत किरकोळ व्यापारांत कमी उत्पादक मजूर लागतात. वर लीहिलेल्या नैसर्गिक क्रमानेंच राष्ट्रानें जावें हें चांगले नाहींतर हानि होईल. एकंदरींत शेतकीला विशेष प्राधान्य दिलें पाहिजे. स्मिथच्या ग्रंथाच्या तिसर्या पुस्तकांत ऐतिहासिक शोधांचें उत्तम उदाहरण सांपडतें. यूरोपांत. आर्थिक बाबतींत क्रमानें कशी प्रगती झाली व कोणत्या अवस्थांतून उद्योगधंद्याचें क्रमण झालें याचा त्यानें मनोरंजक इतिहास दिला आहे. परंतु येथेंहि ‘नैसर्गिक कायद्याच्या’ गृहीत प्रमेयाचा त्याच्यावर किती पगडा बसला होता हें व्यक्त होतें. कारण, त्यानें दिलेली आनुपूर्वी हीच नैसर्गिक आहे व त्याहून इतर सर्व कृत्रिम अर्थात् विघातक आहेत असें तो मानतो. चौथ्या पुस्तकांत स्मिथनें ‘मर्कंटाईल’ पध्दतीचें सविस्तर खंडन केलें आहे. स्मिथला इंग्लंडांत खुला व्यापार प्रस्थापित होईल अशी मुळींच आशा नव्हती. परंतु त्याच्याच ग्रंथाच्या चालनानें. ही गोष्ट लवकरच घडून आली. कांहीं बाबतींत मात्र खुल्या व्यापाराच्या तत्त्वास अपवाद त्यानें कबूल केले. या बाबीं म्हणजे स्वत:चीं जहाजें बांधणें, लढाईची सामुग्री व राष्ट्रास अत्यावश्यक असे धंदे. पांचव्या पुस्तकांत स्मिथनें राष्ट्राची जमा व खर्च व करग्रहणाचीं तत्त्वें यांचा विचार केला आहे. सार्वजनिक हिताच्या संस्था सरकारनें चालविणें श्रेयस्कर आहे. शिक्षण, सैन्य, न्याय पध्दति या गोष्टींत स्वातंत्र्याचें तत्त्व लागू करणें बरोबर नाहीं; येथें नियंत्रण असणेंच जास्त सयुक्तिक आहे. स्मिथच्या मतें फिजिओकॅटिक पध्दति ही बहुतांशीं परिपूर्ण आहे. सरकारी नियंत्रण हें होईल तितकें कमी असावें व बहुतेक संस्था लोकांनीं आपल्या कर्तबगारीनें चालवाव्या. परंतु शेतकी हेच कायतें राष्ट्रांच्या उद्योगाचें सर्वस्व आहे हें त्या पध्दतीचें तत्त्वं स्मिथनें खोडून टाकलें. करग्रहणाचीं स्मिथचीं तत्त्वें अद्यापिहि सर्वमान्य आहेत. परंतु कर हे सरकारनें केलेल्या कामाची फी किंवा मजुरी आहे हें स्मिथचें तत्त्व मात्र आधुनिक अर्थशास्त्राच्या दृष्टीनें बरोबर असलें तरी व्यक्तीनें सरकारकडून तीस झालेल्या सेवेच्या प्रमाणानें कर द्यावा. हें तत्त्व मात्र अगदीं चुकीचें आहे. कां कीं, सरकारचें अस्तित्वच अशाकरितां आहे कीं, जीं कार्यें केवळ देवघेवीच्या तत्त्वानें होणार नाहींत तीं कार्यें व्हावीं यासाठीं सरकारसारख्या संस्थेची जरूरी आहे. एकंदरीनें पाहतां स्मिथचें कार्य टीकात्मक व विध्वंसक होतें असें म्हटलें पाहिजे. आधुनिक औद्योगिक प्रगतीला मदत करण्यास तत्कालीन सरकारेंहि अपात्र आहेत हें त्याचें ठाम मत होतें. स्मिथचा मोठेपणा यांत आहे कीं, विध्वंसक कार्यांच्या युगांतहि त्यानें विधायक व पध्दतशीर अशी नवीन सिध्दान्तरचना करून पध्दतशीर अर्थशास्त्राची घटना केली. पूर्वीच्या संस्थेचे दोष विशद करून शिवाय आर्थिक कल्पनाचें पृथक्करण त्यानें केलें. नवीन सूचना, नवीन विचार व व्यावहारिक चातुर्य ह्या सर्वांनीं त्याच्या ग्रंथास विचारक्रांति घडवून आणण्याचें श्रेय दिलें आहे. स्मिथच्या ग्रंथांत निगमन पध्दतीचे जे दोष गर्भरूपानें होते ते रिकार्डो, केर्न्स, मिल इत्यादिकाच्या ग्रंथांत परिस्फुट झाले. फिल्डब्रँडच्या मतानें या स्मिथ संप्रदायाचे पुढील दोष होते. ( १ ) व्यक्तिस्वातंत्र्याची व व्यक्तिच्या महत्त्वाची अतिशयोक्ति. मनुष्यस्वभावांत स्वार्थाशिवाय दुसरी मनोवृत्ति नाहीं असें मानणें. ( २ ). प्रत्येक व्यक्तीस आपलें हित समजतें व एकंदर जगांत सर्व गोष्टींचें पर्यवसान चांगलें होतें हा विश्वास. ( ३ ) संपत्तीची विनिमयात्मक व कोती कल्पना. ( ४ ) समाजसत्ता ही सर्वस्वी दुष्ट आहे ही कल्पना. ( ५ ) आर्थिक आयुष्यांत ध्येय व नैतिक कल्पना यांचा पूर्ण अभाव मानणें. ( ६ ) एकागीपणा व संस्कृतीच्या भिन्न अवस्थाकडे दुर्लक्ष्य. हे दोष स्मिथच्या अनुयायांत जास्त प्रमाणांत दिसून येतात. परंतु या सर्वांचें बीज स्मिथच्या ग्रंथांत होतें हें कबूल केलें पाहिजे. स्मिथच्या पश्चात बेंथॅमनें व्यक्तिस्वातंत्र्याचें तत्त्व अर्थशास्त्राशिवाय इतर सर्व ठिकाणींहि लाविलें. स्मिथच्या कांहीं मुद्यांवर बेंथॅम व लॉरडेल यांनीं टीका केली. परंतु ती विशेष महत्त्वाची नाहीं. यांत्रिक युगाचे दोष आमच्याप्रमाणे स्मिथच्या निदर्शनास न आल्यामुळें स्वातंत्र्य व नियंत्रणाभाव यांनीं किती नुकसान होतें याची त्यास कल्पना झाली नाहीं. यात्रिक युगांतील दोषांमुळें समाजसत्तावाद अस्तित्वांत आला व प्रजावृंध्दीच्या प्रश्नाकडे लोकांचें लक्ष्य ओढलें गेलें. हा प्रश्न प्रथम मालथस या अर्थशास्त्रज्ञानें पुढें आणिला. गॉडविन् व कॉनडॉरसे यांनीं समाजांतील सर्व दु:खें विभजनाच्या विषमतेमुळें उत्पन्न होतात असें प्रतिपादिलें होतें. संपत्ति विपुल आहे परंतु तिची वांटणी बरोबर होत नाहीं असा यांचा समज होता. मालथसनें याविरूध्द प्रमाणें आणून असें दाखविलें कीं, समाजसंस्था कितीहि उत्तम असल्या व संपत्ति कितीहि असली तरी प्रजावृध्दीमुळें लवकरच दारिद्र्य येऊन जीवनकलह तीव्र होईल. १७६१ त वॉलेसनें या कल्पनेचा उपक्रम एका ग्रंथांत केला होता. भविष्यकाळीं मनुष्यजाति अतिशय पूर्णतेला जाईल व जिकडे तिकडे आनंदीआनंद होऊन जाईल अशा रीतीची कॉनडॉरसेची कल्पना होती, मालथसनें आपल्या ज्ञानांत कोणती भर टाकली व प्रत्यक्ष आचरणांत आणण्यासारख्या कोणत्या क्लृप्त्या त्यानें दाखविल्या हें निश्चित सांगणें कठिण आहे मालथसला असें वाटलें कीं, प्रजेची वृध्दि व निर्वाहाच्या साधनांची वृध्दि यांमधील संबंध आपण प्रथम दाखविला. पण हें खरें नाहीं. त्यापूर्वीं पुष्कळ ग्रंथकारांनीं हा संबंध दाखविला होता. मालथसचा मुख्य सिध्दांत असा होता कीं, प्रजा हीं भूमितिश्रेढीनें वाढते व अन्न हें गणितश्रेढीनें वाढतें. परंतु हा सिध्दान्त चुकीचा आहे. प्रजावृध्दि होण्यापूर्वी लढाया रोग व दारिद्र्य यांनीं ती निरूध्द होईल किंवा दारिद्र्याच्या भीतीमुळें लोक कुटुंबाच्या वृध्दीस आपल्या आचरणानें आळा घालतील या कारणानें ‘वाढते’ या शब्दाच्या ऐवजीं ‘वाढण्याची प्रवृत्ति असते’ असे शब्द घालणें जरूर आहे. परंतु असें केल्यानें मूल सिध्दांत संदिग्घ व विस्कळित होतो यांत संशय नाहीं.
त्याचप्रमाणें मालथसच्या ग्रंथांतील ऐतिहासिक शोध विशेष महत्त्वाचा नाहीं. कारण या अवडंबराशिवाय मालथसचा मूलसिध्दांत पुष्कळांनीं पूर्वींच जाहीर केलेला होता. प्रजावृध्दीच्या प्रश्नांस दुसर्या एका सिध्दांतामुळें जास्तमहत्त्व येतें. तो सिध्दांत म्हणजे जमिनीच्या उत्पन्नाचें उत्तरोत्तर होणारें कमी प्रमाण हा होय. प्रजा जास्त वाढल्यास जास्त अन्न लागतें व हें उत्पन्न करणें उत्तरोत्तर कष्टसाध्य होतें. याच कारणास्तव मिलनेंहि या प्रश्नास विशेष महत्त्व दिलें; परंतु प्रजावृध्दीपासून होणार्यां आपत्तीची अतिशयोक्ति करणें योग्य नाहीं. एखाद्या शक्तिपासून एखादें कार्य होतें म्हणून तें कार्य निश्चयानें होईल, असें यंत्रशास्त्रांत सांगतां येत नाहीं त्याचप्रमाणें प्रजावृध्दि प्रतिबंधकांच्या अभावीं एखादें कार्य करील म्हणून हे प्रतिबंधक अस्तित्वांत नाहींत, असें मानणें शास्त्रविरूध्द आहे. प्रत्येक समाजांत व्यक्तिश: मनुष्य आपल्यास जास्त अपत्यें झाल्यास आपली स्थिति हीन होईल. या कल्पनेनें प्रजेचें नियंत्रण करीत असतो. मालथसच्या मतानें हें नियंत्रण फक्त विवाहाची मर्यादा लांबविणें एवढेंच आहे. विवाहित असून ब्रह्मचर्य पालन करण्याची कल्पना ही नंतर मिलनें सुचविली. अतिशय उशीरां विवाह करण्याचा उपदेश गरीब लोकांस करणें योग्य नाहीं. कारण पुष्कळ प्राप्ति मिळाल्याशिवाय विवाह करावयाचा नाहीं असें ठरविल्यास बर्याच लोकांचें वृध्दपणा येईपर्यंत विवाहच होणार नाहींत, हें मालथस व त्याचे अनुयायी विसरतात. शिवाय विवाहित स्थितीपासून होणारें सौख्य शांति व इतर नैतिक फायदे लक्षांत घेतल्यास मालथसचा उपदेश अव्यवहार्य आहे असें म्हणणें प्राप्त आहे. मूल सिध्दांतापासून मालसथनें अशीं अनुमानें काढलीं कीं. कोणत्याहि सरकारनें प्रजावृध्दीस उत्तेजन देऊं नये व गरीब लोकांकरितां सरकारी खर्चानें अनाथगृहें काढूं नयेत; परंतु हीं दोनहि विधानें चुकीचीं आहेत. कांहीं अवस्थांमध्यें प्रजा जास्त होणें हें समाजास हितकारक असतें. त्याचप्रमाणें गरीबांची कांहीं तरी व्यवस्था लावणें हें अत्यावश्यक आहे. मालथसचें तत्त्व पूर्णपणें अमलांत आणिल्यास गरीबांचीं मुलें आपल्यादेखत अन्नावांचून मृत्युमुखीं पडूं दिलीं पाहिजेत; परंतु कोणताहि धर्म असें करण्यास अनुज्ञा देणार नाहीं. असें असल्यामुळें तत्त्वत:व न्यायदृष्टीनें मालथसचे उपसिध्दांत बरोबर असले तरी धर्माच्या ध्येयाविरूध्द आहेत. मालथसचा उपदेश श्रीमंत लोकांस पटण्यासारखा आहे. कारण त्यामुळें गरीब लोकास मदत करण्याची त्यांच्यावरची जबाबदारी नाहींशी होते. डार्विनचें तत्त्व प्रसिध्द झाल्यापासून मालथसची कीर्ति जास्त वाढली कारण त्या तत्त्वांतीलं ‘जीवनकलह’ हें अंग मालथसनें डार्विनच्या अगोदर प्रतिपादिले होतें. प्रजावृध्दीसंबंधांत डार्विनचें मत मालथसच्या विरूध्द होतें. कारण तीपासून होणारा कलह हा जगाच्या प्रगतीस आवश्यक आहे, असें डार्विनचें मत होतें. आधुनिक काळीं मालथसच्या शिकवणीचा काहीं लोकांनीं विपर्यास करून ज्यानां ज्यानां जीवनकलहांत जीवंत राहण्याची शक्ति नाहीं, त्यानीं खुशाल नष्ट व्हवें असें प्रतिपादिलें आहे. परंतु दया व विचारशक्ति या दोन तत्त्वानीं जीवनकलहाचा निष्ठुरपणा कमी होतो व मनुष्यसमाजात नुसतें युध्द हें तत्त्व लावून चालणार नाहीं, हें त्यांनीं लक्षात ठेविलें पाहिजे. डेव्हिड रिकार्डो हा स्मिथचा अनुयायी होता; परंतु स्मिथनें प्रत्येक उपपत्तीच्या समर्थनार्थं इतिहासातील पुरावा देण्याचा उपक्रम केला होता तो यानें सोडून दिला. ठराविक गृहीत प्रमेयापासून भूमितीच्या पद्दतीनें एकामागून एक रूक्ष अनुमानें काढण्यास त्यानें सुरूवात केली. क्वचित् उदाहरणें दिल्यास तीहि काल्पनिक असत. त्यामुळें प्रथमदर्शनीं त्याचे सिध्दांत निश्चित व अर्थपूर्ण असें वाटतात; परंतु स्मिथच्या ग्रंथांत प्रत्यक्ष जगाशीं आपला संबंध आहे, असें वाचकांस वाटतें, तसें रिकार्डोचा ग्रंथ वाचतांना वाटत नाहीं. दुसरा एक दोष त्याच्या ग्रंथांत सापडतो व तो शब्दांचे अर्थ वारंवार बदलणें हा होय. शास्त्रपध्दतीच्या दृष्टीनें हा दोष फारच घातक आहे. विशेषत: रिकार्डो ह्यानें ‘विभजना’ च्या प्रश्नांचा जास्त विचार केला आहे. त्याचे कांहीं सिध्दांत येणेंप्रमाणें आहेत. प्रत्येक वस्तूची किंमत, तिचा पुरवठा वाटेल तितका होणें शक्य असल्यास तिच्या उत्पादनास लागणार्या श्रमावर अवलंबून असते; परंतु यांत भांडवलाचा उल्लेख नसल्यामुळें अतिशय उच्च दर्जा प्राप्त झालेल्या औद्योगिक समाजात हा सिध्दांत अपुरा पडतो. भांडवल हा एक श्रमाचाच प्रकार आहे; अशी त्याची कल्पना आहे परंतु ती भ्रामक आहे. या घोंटाळ्यामुळें काहीं काळानंतर ‘सोशिऑलिझम् मधील अनेक भ्रामक सिध्दांत उद्भवले. वस्तुत: उत्पादनाच्या श्रमाचा पुरवठ्यावर परिणाम होऊन नंतर किंमतीवर होतो; प्रत्यक्ष रीतीनें होत नाहीं. रिकार्डोचें जमिनिच्या खंडाचें अर्थशास्त्रीय स्पष्टीकरण उर्फ रीकार्डोचा ‘खंडावरचा सिध्दांत’ हा त्याचा स्वत:चा नसून त्याच्या पूर्वी अँडरसन व मालथस यांनीं त्याचा स्पष्ट उल्लेख केला होता. जमिनींत जें एकंदर उत्पन्न होतें त्याची किंमत, व तें पैदा करण्याचा जो सर्व खर्च होतो, तो या दोन रकमांतील फरक हा खंड होय. एकंदर देशांत जें धान्य किंवा इतर शेतीचा माल तयार होतो, त्याची दरमणीं किंमत, सगळ्यांत जास्त खर्चानें उत्पन्न होणारा जो त्या धान्याचा भाग असेल, त्याच्या उत्पदनाच्या खर्चाइतकी असते व त्यामुळें कमी खर्चानें उत्पन्न होणार्या धान्यावर त्या प्रमाणानें खर्च जाऊन शिल्लक राहते या शिलकीच्या इतकाच प्रत्येक जमिनीचा खंड असला पाहिजे. या रिकार्डोच्या सिध्दांताप्रमाणें खंड मुळींच न देणारी एक जमीन कल्पावी लागते. खंड जरी जमीनदारानें माफ केला तरीहि धान्याच्या किंमतीवर कांहीं परिणाम होणार नाहीं. कारण खंडामुळें धान्याची किंमत निश्चित होत नसून धान्याच्या किंमतीवरून खंड निश्चित होतो. ही खंडाची उपपत्ति अंशत: स्मिथच्या ग्रंथांत दृग्गोचर होते असें दिसतें. तथापि स्मिथच्या व ह्यूमच्या दरम्यान झालेल्या पत्रव्यवहारावरून असें म्हणावें लागतें कीं, स्मिथला अँडरसनची उपपत्ति संमत नव्हती. रिकार्डोनें भिन्न जमिनींची नैसर्गिक शक्ति भिन्न असल्यामुळें खंडांत फरक होतो असें मानलें; परंतु रेल्वेपासून जवळ किंवा दूर असणें इत्यादि जमिनीच्या स्थानभिन्नत्वामुळें होणार्या फायद्यांपासूनहि खंडांत फरक होईल हें त्याच्या लक्षांत आलें नाहीं. रिकार्डोच्या ‘खंड’ शब्दानें खरोखरी जो खंड उरलेला असतो, तो ध्वनित होत नाहीं; परंतु काल्पनिक खंड ध्वनित होतो. प्रत्यक्ष दिलेल्या खंडांत खंड व नफा असे दोन अवयव असतात. हे अवयव भिन्न दाखविणें हें पुष्कळ वेळां कठिण असतें; परंतु रिकार्डोचें मत असें होतें कीं, भांडवल खर्चून जमिनीचा मगदूर नेहमींचा वाढला म्हणजे नफा व खरा खंड हीं एकजीव होऊन दोनहि मिळून त्यास खंडाचेंच स्वरूप प्राप्त होतें. शेतकीमध्यें निसर्गाची मनुष्यास मदत होते व कारखान्यांत होत नाहीं, ही स्मिथची कल्पना रिकार्डोस संमत नव्हती. जमिनीचा खंड येतो तो निसर्गाच्या मदतीमुळें नव्हे, तर धान्याच्या किंमतीमुळें येतो व ही किंमत अशी असते कीं, मागणी व पुरवठा यांची या किंमतीच्या बिंदूच्या ठिकाणीं समता असते. जमिनीच्या मशागतींत सुधारणा केल्यानें उत्पन्नाच्या मानानें खंड कमी होऊं शकेल; परंतु लोकसंख्या वाढल्यास खंडानें मागणारे वाढून खंड नेहमींच वाढत जाईल. रिकार्डोनें मजुरी व नफा याविषयींची आपली उपपत्तीहि जमिनीच्या खंडाच्या उपपत्तीवर आश्रयभूत अशी रचली होती. धान्याची किंमत वाढल्यामुळें मजुरी वाढेल व मजुरी व नफा हीं व्यस्त प्रमाणांत असल्यामुळें नफा कमी होईल. भांडवलवाले व मजूर यांमध्यें अशा तर्हेचा विरोध नेहमींच राहील व दोघांचें नफानुकसान कांहीं झालें तरी जमीनदारांचा नेहमींचा खंड वाढून फायदा होईल. कारखान्यांत सुधारणा झाल्यास काटकसर होऊन नफा अधिक होईल; परंतु एकंदरीनें नफ्याचा दर कमी होत जाईल. मजुरी ही मजुरास अगदीं आवश्यक वस्तू विकत घेण्युपुरतीच नेहमीं राहील. कारण मजुरी वाढल्यास पुन:लोकसंख्या वाढून पूर्ववत् स्थिति येईल. एवंच रिकार्डोच्या उपपत्तींत मजुरांची स्थिति सुधारण्याची कांहीं एक आशा नाहीं. मजुराची रहाणी उच्च दर्जाची केल्यास त्या रहाणीप्रमाणें थोडीशी मजुरी वाढेल एवढें तो कबूल करतो; परंतु हें कसें करावें हें त्यानें सुचविलेलें नाहीं, मजुरीच्या या सिध्दांताचा फायदा घेऊन समाजसत्तावादी लोकांनीं आपली भव्य इमारत या पोकळ पायावर पुढें रचिली व क्रांति केल्याशिवाय मजुरांची स्थिति सुधारणार नाहीं असें ठरविलें. एकंदरीनें पहांतां रिकार्डोची जमिनीच्या खंडाची उपपत्ती व त्यावरील इतर अनुमानें हीं कांहीं गृहीतप्रमेयें मान्य केलीं तरच खरीं आहेत, अन्यथा नाहीं असें म्हणणें भाग पडतें. काल्पनिक अशा “आर्थिक मनुष्याच्या” आधारावर त्याच्या सर्व इमारतीचा विस्तार केलेला आहे. त्यामुळें पुरातन आचार, संघशक्ति इत्यादि गोष्टींकडे त्याचें लक्ष मुळींच गेलें नाहीं. त्याचप्रमाणें थोडक्या फायद्याकरितां मजूर व कारखानदार हे आपला धंदा बदलतील इतकी ‘स्पर्धा’ पूर्णतेस गेली आहे, असें त्याच्या सिध्दांतांत मानावें लागतें. या त्याच्या दोषांमुळें इंग्लंडांतील पुढील सर्व अर्थशास्त्रावरील वाङ्मयांत एक प्रकारचा काल्पनिकपणा शिरला व तो आजमितीसहि कमी झालेला नाहीं. रिकार्डोच्या जमिनीच्या खंडावरील विवेचनात परदेशगमन हें मुळींच हिशोबांत धरलेलें नाहीं, त्यामुळें देशांतील जमिनीवरच सर्वांचा निर्वाह आहे, अशा कल्पनेवर त्याचे सिध्दांत बसविलेले होते. त्याचप्रमाणें परदेशातून हजारों खंडी धान्य आणतां येतें, याचीहि त्यास कल्पना नव्हती. प्रो. निकलसन या अर्थशास्त्रज्ञानें याच कारणांकरितां रिकार्डोची जमिनीच्या खंडाची उपपत्ति ‘निरूपयोगी व तात्त्विक’ आहे असें स्पष्ट मत दिलें आहे. इतर देशांशीं व्यापार करण्यापासूनचे फायदे रिकार्डोनें चांगल्या रीतीनें दाखविले आहेत. आपल्या देशांत ठराविक श्रम व भांडवल यांच्या मदतीनें जितक्या वस्तु पैदा होतात, त्यापेक्षां जास्त वस्तु परदेशांशीं व्यापार करून मिळतात. रिकार्डोनें असें सिध्द केलें कीं, दोनहि वस्तु आपल्या देशांत स्वस्त होत असल्या तरीहि ज्या वस्तूमध्यें आपल्या देशास तुलनेनें अधिक फायदा होतो ती वस्तु आपण उत्पन्न करून कमी फायदा होतो ती वस्तु दुसर्या देशांतून आणणें हें एकंदर देशास हितकराक होतें. हाच सिध्दांत पुढें मिल व बॅस्टेबल यांनीं जास्त विस्तारानें विशद केला. एकंदर देशाच्या संपत्तीविषयीं रिकार्डोचें असें मत आहे कीं, देशाच्या एकंदर उत्पन्नांतून मजुरीचा खर्च वजा जातां जी निखालस बाकीं राहते ती जास्त महत्वाची आहे. ही बाकी म्हणजे अर्थात् जमिनीचा एकंदर खंड व एकंदर नफा यांची बेरीज. ह्या संपत्तीचा उपभोग घेण्यास देशांत कमी किंवा अधिक मनुष्यें असलीं तरी सारखेंच. समाजशास्त्राच्या अभ्यासास रिकार्डोची बुध्दि अनुकूल नव्हती असें म्हणावें लागतें. अनुमान करण्यांत त्याचें कौशिल्य स्तुति करण्यासारखें, परंतु मनुष्यस्वभावाविषयीं त्याचें ज्ञान फार कोतें होते व सामाजिक सहानुभूतीचा याच्या ठिकाणीं अभाव होता. समाजांतील कार्यकारणसंबंध फार क्लिष्ट असतात, हें त्याच्या मनावर बिंबलेलें नव्हतें, त्यामुळें थोड्याशा आधारावर व्यापक सिध्दांत करण्यांचें साहस त्याच्या हातून झालें. त्याचप्रमाणें वस्तुस्थितीविषयीं यथार्थ ज्ञान करून घेण्याचा त्यानें प्रयत्न केला नाहीं. बँकिंग, चलन इत्यादि प्रश्नात त्याचीं मतें ग्राह्य असल्यामुळें त्याच्या इतर सिध्दांताविषयीं काहीं लोकात आदर उत्पन्न झाला, त्यामुळें त्याच्या योग्यतेपेक्षां अधिक मान त्यास काहीं कालपर्येंत मिळाला; परंतु स्मिथशीं तुलना करतांना तो अगदीं कमी दर्जाचा समाजशास्त्रज्ञ होता असें नि:संशय म्हणतां येईल. मालथसचेंहि त्याच्याविषयीं फार प्रतिकूल मत होतें. रिकार्डोच्या अनुषंगानें पुढील अर्थशास्त्राची पध्दति भ्रष्ट झाली. वस्तुस्थितीकडे लक्ष्य न देता निगमन पध्दतीनें एकामागून एक अनुमानें काढण्याचा त्याच्या अनुयायांनीं अव्याहत क्रम चालविला. स्मिथ व रिकार्डोनंतर अनेक लहान ग्रंथकारांनीं त्याचे सिध्दांत व्यवस्थित करून, त्यांच्या लागू पडणार्या मर्यादा ठरवून व्यवहारांतील अनेक प्रश्न सोडविण्याकरितां त्यांचा उपयोग केला. अशा ग्रंथकारांत जेम्स मिल, मॅककुलॉक, सीनियर, कर्नल टॉरन्स बॅबेज, थॉर्नटन, चॅमर्स, व्हेटले. रिचर्ड जोन्स हे प्रमुख होते. यापैकीं जोन्स यानें रिकार्डोच्या पध्दतीवर सागोपाग व पध्दतशीर टीका केली आहे विशेषत: जमिनीच्या खंडाची उपपत्ति प्रत्यक्ष व्यवहारातील खंडास लागू पडत नाहीं हें त्यानें दाखविलें. जोन्सची अनुमानपध्दति अनुगमनात्मक म्हणजे प्रत्यक्षसंकलनात्मक होती नुसत्या तत्त्वांपेक्षां प्रत्यक्ष व्यवहारांतील दृश्यांकडे जास्त लक्ष दिलें पाहिजे नाहीं तर सिध्दांत निवळ तात्विक व पोकळ राहतात असे त्यानें जोरानें प्रतिपादन केलें. इंग्लंडांतील संस्था व परिस्थिति यांचें उदाहरण घेऊन त्याचप्रमाणें सर्व जगांत व सर्व काळीं समाजाच्या कोणत्याहि अवस्थेंत ते सिध्दांत लागूं पडतील असें मानणें हें शास्त्राच्या प्रगतीस विघातक आहे असें त्याचें मत होतें. जर्मनींतींल ऐतिहासिक पध्दतीच्या पुरस्कर्त्याचीं पुष्कळशीं मतें जोन्सच्या ग्रंथांत सांपडतात. त्यामुळें त्याचीं योग्यता फार मोठी आहे. त्याच्या मताचें क्लिफ लेस्ले याच्या मताशीं पुष्कळ साम्य आहे त्यामुळें या दोघांस इंग्लंडांतील ‘ऐतिहासिक पध्दती’ चे पुरस्कर्ते असें मानण्यास कांहीं हरकत नाहीं.
जोन्स व लेस्ले यांच्या आक्षेपांवर कांहीं लोकांचें असें उत्तर आहे कीं, हल्लीं इंग्लंड व फ्रान्स या देशांत जी औद्योगिक परिस्थिति आहे ती हल्लीं अपवादक असली तरी कालांकरांनें सार्वत्रिक होईल. परंतु हें खरें मानलें तरीहि प्रचलित निरनिराळ्या संस्था व परिस्थिति या सर्वांनां रिकार्डोचे सिध्दांत लावणें हें अप्रयोजक व निष्फळ आहे. रिकार्डोनंतरच्या या वादविवादामुळें पुष्कळ लोकांस असें वाटलें कीं, अर्थशास्त्राचे सिध्दांत हें निश्चित नसून घोंटाळ्यांचे आहेत. कांहीं लोकांचें तर असें मत झालें की हें शास्त्रच नव्हे. परंतु मिलनें सर्व सिध्दांतांस सुव्यवस्थित स्वरूप दिल्यामुळें व पुष्कळ वादांचें एकीकरण केल्यामुळें ही कल्पना हलके हलके नष्ट झाली. इंग्लंडंतील इतर अर्थशास्त्रज्ञापेक्षा मिलनेंच आधुनिक काळीं अर्थशास्त्राची प्रसिध्दि करण्यास जास्त मदत केली हें निर्विवाद आहे. त्याचा मुख्य ग्रंथ विस्तृत, पध्दतशीर व भाषेच्या दृष्टीनेंहि फार मोहक असा आहे. १८४० पासून जवळ जवळ त्या शतकाच्या शेवटपर्यंत त्याच्या ग्रंथाचेंच परिशिलन जास्त लोकांनीं केलेलें आहे. प्रथम १८४४ मध्यें त्यानें काहीं निबंध प्रसिध्द केले, त्यांतील मुख्य सिध्दांत येणेंप्रमाणें होते. देशादेशांतील व्यापारात निर्यात वस्तु आयात वस्तु याचें परिणाम एकच होईल अशा रीतीनें त्याची किंमत निश्चित होते. परदेशातील मालावरील जकात माफ करताना त्या देशानें इंग्लंडशीं खुला व्यापार प्रस्थापित करावा अशी अट घालावी. काहीं कालपर्यंत आवश्यक वस्तूंपेक्षा फाजील वस्तुंचें उत्पादन होऊं शकतें, परंतु सर्व कालपर्यंत असें होणें शक्य नाहीं. नफा व मजुरी ही एकमेकांशी व्यस्त प्रमाणात असतात. याशिवाय या निबंधांत त्यानें अर्थशास्त्रांत कोणती तार्किक पध्दति अनुकूल आहे याचें, आणि उत्पादक व अनुत्पादक श्रम या महत्वाच्या प्रश्नाचें विवेचन केलें आहे. १८४८ त मिलनें आपला मुख्य ग्रंथ प्रसिध्द केला. स्मिथचा ग्रंथ नवीन शोधांमुळें प्राचीन झाल्यामुळें नवीन अधिकारयुक्त ग्रंथाची उणीव दूर करण्याची त्याची महत्त्वकांक्षा होती. परंतु ही पूर्ण झाली नाहीं. वस्तुत: स्मिथ, रिकार्डो व मालथस यांच्या सिध्दांतांच्या पुढें तो विशेष गेला नाहीं. बहुतेक ठिकाणीं रिकोर्डोचें ह्यानें समर्थनच केलें, परंतु रिकार्डोमध्यें समाजविषयक सहानुभुतीचा जो अभाव होता तो मिलच्या ठिकाणीं नव्हता. बहुतेक सामाजिक प्रश्नांसंबंधानें त्याच्या भावना उदात्त असत. त्यामुळें बेंथॅमच्या कोत्या कल्पनांस त्यानें थारा दिला नाहीं. ही त्याची वृत्ति कॉन्ट यांच्या ग्रंथांशीं त्याचा परिचय झाल्यामुळें अधिक दृढ झाली. परंतु त्याचा बेंथॅम व जेम्स मिल यांच्याशीं पूर्ववयांत निकट संबंध असल्यामुळें त्यांच्या कल्पनांचें नकळत त्याच्या विचारांवर प्रतिबिंब पडत असे. हा दोष शेवटपर्यंत नाहींसा झाला नाहीं, व त्यामुळें त्याच्या ग्रंथांत ऐतिहासिक पध्दति व निगमनपध्दति यांचें मिश्रण कायमचें राहिलें. मिलच्या मतानें त्याच्या ग्रंथांचें विशिष्टत्व उत्पादनाचे नियम व विभजनाचे म्हणजे वाटणांचे नियम यांतील भेद दाखविणे हे होय. यांपैकीं उत्पादनाचे नियम हे अधिभौतिक नियमाप्रमाणें अचल असतात, व विभजनांचे नियम हे मनुष्यप्रयत्नावर अवलंबून असल्यामुलें चल असतात. यामुळें विभजनाच्या विषमतेमुळें उत्पन्न झालेल्या दारिद्र्यादिक दोषांचें संस्थांमध्यें बदल करून, व समाजघटनेची सुधारणा करून, निराकरण करतां येतें. या विचाराचा परिपाक होतां होतां अखेरीस मिलचीं मतें समाजत्तावादाच्या मतांप्रमाणें व्यक्तिस्वातंत्र्यास प्रतिकूल अशीं झालीं. ही विचारक्रांति त्यानें आपल्या आत्मचरित्रांत सुंदर रीतीनें कथन केली आहे. आधुनिक समाजरचना ही तात्पुरती असून तिचें पर्यवसान न्यायाच्या तत्त्वावर संपत्तीची सारखी वांटणी करण्यांत होईल, असें त्यास शेवटीं वाटूं लागलें. जमीन व उत्पादनांची साधनें हीं सर्व समाजाच्या मालकीचीं असावीं, असें स्पष्ट मत त्यानें अर्थशास्त्रीय ग्रंथाच्या तिसर्या आवृत्तींत नमूद केलें आहे, तथापि ही गोष्ट लवकर साध्य होईल असें त्यास वाटत नव्हतें, कांहीं काळपर्यंत खासगी मालमत्तेची संस्था व व्यक्तिस्वातंत्र्य हींच अवश्यक आहेत. कुळांच्याच मालकीची जमीन झाल्यास जमिनीवर फायदा होईल हें त्यांच्या प्रसिध्द मतांपैकीं एक मत होतें त्याचप्रमाणें सहकारी संस्थाचा तो पुरस्कार करीत असे. परंतु या संस्थामध्यें स्पर्धेचें तत्व अजीवात नाहींसें झालेले नाहीं. मजुरांची स्थिति प्रजानियंत्रण झाल्याशिवाय चांगली होणार नाहीं. असें मिलचें मत होतें. मजुरांस आपल्या दारिद्र्याच्या सबबीवर श्रीमंत लोकांच्याविरूध्द चळवळ करून समाजांत कलह माजविण्यास मिलनें उद्युक्त केलें. श्रीमंत लोकांजवळ संपत्ति आहे, पण तोबरोबर त्यांचीं जबाबदारी आहे व आपली शक्ति खालच्या वर्गाच्या हितांकरितां उपयोगांत आणणें हें त्याचें कर्तव्य आहे हें मिलच्या ध्यानांत आलें नाहीं. एकंदरींत, व्यावहारिक दृष्टीचा त्याच्या ठिकाणीं अभाव होता, व तात्विक विवेचनाच्या भरांत प्रचलित समाजांतील दोषांची तो अतिशयोक्ति करीत असे. समाजशास्त्रांत व अर्थशास्त्रांत निगमनपध्दतीचा अथवा प्रत्यक्षसंकलनमूलक अनुगमनपध्दतीचा अवलंब करावा हें शेवटपर्यंत त्यानें निश्चिच केले. नाहीं. त्याचप्रमाणें अर्थशास्त्र हें स्वतंत्र आहे किंवा समाजशास्त्राचाच एक भाग आहे हेंहि शेवटपर्यंत त्यानें निश्चित ठरविलें नाहीं. केर्न्सनें अर्थशास्त्राच्या तार्किक पध्दतीवर एक स्वतंत्र पुस्तक लिहिलें आहे. त्यांत त्यानें निगमनपध्दतीचाच अवलंब केला आहे. अनुगमनपध्दति ही अर्थशास्त्रांत अयोग्य आहे असें त्यानें स्पष्ट म्हटलें आहे. केर्न्सच्या मतें अर्थशास्त्रांतील सिध्दांत हे काल्पनिक असून प्रत्यक्ष जगाशीं त्यांचा कांहीं एक संबंध नांहीं, मिल व केर्न्स या दोघांच्या मतांचा असा परिणाम झाला कीं रिकार्डोचे सिध्दांत हे प्रत्यक्ष खरोखरीच्या मनुष्यांविषयीं नसून काल्पनिक अशा “आर्थिक मनुष्यां” विषयीं आहेत हें सर्वांस स्पष्टपणें कळून चुकले. शिवाय मिलचे असें स्पष्ट मत होतें कीं अर्थशास्त्राचें काम फक्त सिध्दांत सांगण्यांचें असून विधिनिषेधात्मक उपदेश करण्यांचें त्यांचें काम नाही, अर्थशास्त्र हें निवळ शास्त्र आहे. कला नाहीं. अर्थांत नीतिशास्त्राचा व अर्थशास्त्राचा बिलकूल संबंध नाहीं. त्यामुळें अमुक झालें असतां अमुक होईल असे सांगण्या पलिकडे त्याचा मुळींच अधिकार नाहीं. “अर्थशास्त्राचीं मुख्य तत्वें” ह्या ग्रंथांत केर्न्सने पूर्वीच्या सिध्दांतांस मर्यादित करून निराळें स्वरूप दिलें. एकाच देशांमध्यें स्पर्धा ही पूर्ण नसून मजुरांमध्येहि असे भिन्न वर्ग आहेत कीं ज्यांमध्यें स्पर्धा मुळींच असूं शकत नाहीं. हें एक महत्वाचें तत्त्व त्यानें निदर्शनास आणिलें. सार्वराष्ट्रीय व्यापारांत उत्पादनाच्या खर्चावर वस्तूंची किंमत अवलंबून असत नाहीं असें दाखवून त्यानें रिकार्डोची उपपत्ति मर्यादित केली व मागणी आणि पुरवठा हींच किंमतीची निर्णायक असतात असें दाखविलें. मागणी व पुरवठा यासंबंधानें त्यानें असें स्पष्टीकरण केलें कीं, मागणीचा अर्थ प्रचलित मागणी व पुरवठा याचा प्रचलित पुरवठा असाच घेतला पाहिजे. भावी पुरवठा वाढल्यास किंमत बदलूं शकेल प्रत्येक देशांत एक मजुरीचा असा आंकडा असतो कीं, त्याचें आणि एकंदर भांडवलाच्या आंकड्यांचें एका ठराविक प्रमाणें असतें अशा तर्हेची मिलची एक कल्पना होती.-हिला ‘मजुरीच्या निधी’ ची उपपत्ति असें त्यानें नांव दिलें होतें तिचे केर्न्सनें समर्थन केलें. मजुरांची स्थिति नुसती उत्पादनाची प्रगति होऊन सुधारणार नाहीं कारण त्या प्रगतीचा त्यांच्या मजुरीवर कांहींच परिणाम होणार नाहीं. म्हणून सहकारितेच्या तत्वांवर भांडवलवाल्यांनां काढून टाकून भांडवलाचा नफा मजूरींत सामील केल्याशिवाय गति नाहीं असें त्याचें मत होतें सार्वराष्ट्रीय. व्यापारांत आयात व निर्यात माल यांची बरोबरी होते असें मिलच्या उपपत्तींत शब्द होते ते बदलू त्यानें ‘एकंदर कर्ज’ हे शब्द घातले, कारण मालाशिवाय खंडणी, बँकिंग कमिशन, कर्जरोखे इत्यादिकांचा अशा व्यापारींतील वस्तूंच्या किंमतीवर परिणाम होतो. खुल्या व्यापाराचें समर्थन करण्याकरितां केर्न्सनें संरक्षकपध्दतीच्या प्रचलित सर्व आक्षेपांचें खंडन केलें. परंतु हें खंडन विशेष समाधानकारक नव्हतें. केर्न्स हा सांप्रदायिक इंग्रजी अर्थशास्त्रयांपैकीं शेवटचा होता असें म्हणण्यास हरकत नाहीं. परंतु हीं सांप्रदायिक मतें टिकतील ही केर्न्सची आशा व्यर्थ होती.
फ्रान्समध्यें बहुतांशीं इंग्रजी संप्रदायाचाच पुरस्कार ग्रंथकारांनीं केला. स्मिथच्या ग्रंथाचें विशदीकरण करण्याचें काम जे.बी.से.याने केले. त्याचे पुस्तक स्मिथच्या ग्रंथांपेक्षां जास्त पध्दतशीरं व विशद होतें परंतु स्मिथच्या ग्रंथांतील ऐतिहासिक पुराव्याचा त्यानें विशेष उपयागे केला नाहीं. एकंदरीनें पहातां सेच्या ग्रंथांत नवीन असें कांहीं नव्हतें, परंतु प्रचलित सिध्दांत मनोरंजक रीतीनें लोकप्रिय करण्यांत त्याचें कौशल्य अप्रतिम होतें. सिसमाँडी हा सांप्रदायिक मतांच्या विरूध्द होता. प्रचलित अर्थशास्त्रांत सहानुभूतीचा पूर्ण अभाव होता व श्रीमंत जमीनदार व भांडवलवाले यांस त्यांतील सिध्दांत अनुकूल होते असें त्यांचें मत होते, समाजसत्तावादाविषयीं त्यांचें अनुकूल मत होतें परंतु नवीन समाजघटना करण्याविषयीं त्यांचें मन साशंक होतें. सरकारचें नियंत्रण पुष्कळ बाबतींत फायदेशीर असतें, व फिजिओकॅट-पंथाचें ‘पूर्ण स्वातंत्र्य’ हें हितकारक नाहीं असें त्यास दिसून आले. त्यामुळें ‘सरकार’ही शक्ति फक्त शांतता राखण्याकरितां नसून संमाजांतील सर्व वर्गास समाजांतील प्रगतीचे फायदे प्राप्त करून देण्याकरितां आहे असें त्यानें प्रतिपादन केलें. यांत्रिक युगाचा तो द्वेष करीत असे. परंतु यांत्रिक युगांत नैतिक भावनांचा प्रवेश कसा करावा हें त्यास सांगता आलें नाहीं. जमिनीवरील कुळांच्याच मालकीची जमीन असावी असें मिलप्रमाणेंच त्याचें मत होते. व यापासून प्रजानियंत्रणास मदत होईल अशी त्याची कल्पना होती. यानंतर चार्लस द्युनोयर यानें अर्थशास्त्राचा समाजशास्त्रांत अंतर्भाव करून त्याला ऐतिहासिक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. प्रगतीचे नियम अथवा कायदे त्यानें स्थापित केले. आर्थिक उत्पादनावर मानववंश, व संस्कृति याचा व इतर बाह्य परिस्थितीचा काय परिणाम होतो, याचें त्यानें वर्णन केलें. मानवी वस्तुविनिमयाच्या मुख्य उद्देश एकमेकांची सेवा व उपयुक्त कामें करणें हा आहे; सर्व मूल्याचा उगम मनुष्यांच्या प्रयत्नांत आहे; सृष्टि ही मनुष्य प्रयत्नांस विनमोबदला मदत करिते; जमिनीचा खंड हा एक व्याजाचा प्रकार आहे. हे बास्तियाचे सिध्दांत द्युनोयरच्या ग्रंथांत सांपडतात. सरकारी नियंत्रण हें नेहमीं त्रासदायक व प्रजेच्या स्वातंत्र्यास विरोध आणणारे आहे असें त्यांचे मत होतें.
अमिरिकेंत पहिला महत्त्वाचा अर्थशास्त्रज्ञ कॅरे होता. त्याच्यापूर्वी वेंजामिन, फ्रँकलिन व अलेक्झँडर हॅमिलटन यांनीं कांहीं लहान पुस्तकें व अहवाल इत्यादिकांत आपले विकार नमूद केले होते पण ते विचार करण्यासारखे नव्हते. जान रेमंड हा एक महत्त्वाचा व स्वतंत्र विचारांचा ग्रंथकार कॅरेच्या अगोदर होऊन गेला. कॅरे स्मिथचा विरोधी होता;मालथसची प्रजावृध्दीची उपपत्ति त्यास समंत नव्हती. जमिनीचें उत्पन्न हलकें हलकें कमी होतें, हें तत्व सर्व समाजांचील अवस्थांत लागू पडत नाहीं. असें त्याचें मत होतें. विनिमयमूल्यापासून संपत्ति उत्पन्न होते हें खरें नाहीं. संपत्ति ही उपयोग व सुख यांवर अवलंबून असते. विनिमयमूल्य समाजाच्या प्रगतींत कमी होते परंतु खरी संपत्ति वाढत जाते. वस्तूची किंमत तिच्या प्रथम उत्पादनास जो खर्च पडला त्यावर अवलंबून नसून नवीन उत्पादनाच्या खर्चावर अवलंबून आहे. रिकार्डोच्या मतानें जमीन ही निसर्गाची देणगी असल्यामुळें तिचा मनुष्याच्या श्रमाशीं कांहीं एक सबंध नाहीं. परंतु केरेच्या मतानें जमीन ही निसर्गाची देणगी असली तरी हल्लीची जमीन ही मनुष्याच्या अकटेविकट प्रयत्नांनीं मशागतीस लायक झालेली आहे. त्यामुळें जमिनीवर पहिल्यांदां मेहनत करणार्याचा तिच्यावर पूर्ण हक्क असतो व तो न्याय्य आहे. या हक्कामुळें खंड घेणें हें अन्ययाचें नाहीं. कॅरेच्या मतानें रिकार्डोची जमिनीच्या खंडाची उपपत्ति काल्पनिक आहे व इतिहासाच्या विरूध्द आहे. प्रथम उत्तम जमीन लागवडीस येत नसून प्रथम कनिष्ट व नंतर मध्यम व नंतर उत्तम अशा क्रमानें जमिनीची लागवड होत. जमीनदार व मजूर यांचे हितसंबंध ऐक्याचे आहेत. जमीनींतून जें आपम काढतों तें तिच्यांत परत घातलें पाहिजे म्हणून स्वदेशांतील धान्य परदेशीं पाठविणें घातक आहे. साकरितां संरक्षक जकातीची पध्दति आवश्यक आहे. नवीन वसाहतींस खुला व्यापार अनिष्ठ आहे. कॅरेच्या विचारांवर लिस्टच्या ग्रंथाचा पुष्कळ परिणाम झाला होता.
यानंतर पुन्हां फ्रान्सकडे वळलें पाहिजेत-कॉबडेनच्या खुल्या व्यापाराच्या तत्त्वाचा बास्तिया यानें जोरानें पुरस्कार केला. याचा मुख्य ग्रंथ १८५० मध्यें प्रसिध्द झाला व त्याचें नांव ‘अर्थशास्त्रांतील एकतानता’ असें होतें. बास्तियाच्या ग्रंथाचें आद्यतत्त्व आशावाद हें होतें. एकंदर सृष्टीची रचना अशी आहे कीं, सर्व गोष्टींचा परिणाम चांगला होऊन सर्व भावनांचें सुखांत पर्यवसान होतें प्रत्येक मनुष्य स्वार्थी असला तरी सर्वांच्या क्रियापासून परार्थ निष्पन्न होतो. मूल्य हें वस्तूंत नसून “मनुष्याच्या एकमेकांस केलेल्या उपयुक्त कामांचें तें प्रमाण आहे” ही नवीन उपपत्ति त्यानें काढली. समाजाच्या प्रगतीमुळें व्यक्तिचा मालमत्तेचा भाग कमी होऊन सामाजिक संपत्तीचा अधिक होतो. जमिनीच्या खंडाविषयीं त्याची उपपत्ति कॅरेच्या उपपत्तीप्रमाणें होती. ह्या उपपत्तींत असा दोष आहे कीं, जरी जमीन हल्लींच्या स्थितीला आणण्यास श्रम पडलेले असले तरी जमीनीचा सर्व खंड हा व्याजाचा स्वरूपाचा आहे असें नाहीं. त्याचा कांहीं अंश तरी नैसर्गिक जमीनीच्या गुणाबद्दल आहे असें मानलेंच पाहिजे. एकंदर बास्तियाची प्रवृत्ति प्रचलित संस्थांचें समर्थन करण्याकडे होती. निसर्गाचे हक्क व सृष्टींतील अंतिम हेतू अशा तर्हेच्या कल्पना त्याच्या सिध्दांतांच्या मुळाशीं असल्यामुळें तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनें त्याची पध्दति सदोष होती. समाजांत अनेक कलह व घोंटाळे होत असतां एकतानतेचें स्तोम माजविणें, व आशावादाचा ध्वनि काढणें हें अप्रयोजक आहे. नियंत्रणाभाव व व स्वातंत्र्य यापासून फायदे झाले आहेत; परंतु तोटेही झाले आहेत. समाजांत स्थितिस्थापकता आहे हें निर्विवाद आहे परंतु सर्व गोष्टींत स्थिरता येईल व शांति उत्पन्न होईल असें मानणें म्हणजे वस्तुस्थितीचा विपर्यास करणें होय.
कूर्नो हा गणितज्ञ व अर्थशास्त्राज्ञ होता. त्यानें अर्थशास्त्राचे सिध्दांत प्रस्थापित करण्याकडे गणिताचा उपयोग प्रथमत:केला. गणिताच्या पध्दतींत असा दोष आहे कीं, प्रत्येक प्रश्नाच्या घटकांपैकीं पुष्कळसे वगळावे लागतात, यामुळें त्याचे सिध्दांत विशेष महत्त्वाचे नाहींत; व जे आहेत त्यांचें सत्यत्व संशयग्रस्त आहे. पुढें पुढें त्यानें ही पध्दति सोडून दिली. या पध्दतींत प्रथम जीं गृहीतप्रमेयें मानलीं जातात तीं लोकांनां ग्राह्य व आत्यंतिक अशीं वाटण्याचा संभव असतो. शिवाय या पध्दतीत ज्या गोष्टींपासून अनुमानें काढावयाचीं त्या सर्व विचारांत घेऊन फार्म्युला म्हणजे संक्षिप्तसूत्र बनविण्याची जबाबदारी ग्रंथकारावर असते. तत्त्वत: ही पध्दति फलदायी नाहीं कारण सुखदु:ख, उपयुक्तत्ता, किंमत इत्यादिकाचें ‘युनट’ म्हणजे मूलमान ठरविणें अशक्य आहे. गणिताचा अर्थशास्त्राला एवढाच फायदा आहे कीं, आपलीं गृहीतकृत्यें मूलसिध्दांत हें घोटाळ्यांचें व संदिग्ध नाहींत अशा बद्दल गणितज्ञ खबरदारी घेतो व स्पष्ट अर्थ ज्यांस नाहीं अशीं तत्त्वें व सिध्दांत तो बाजूला टाकून देतो.
इटलींतील अठराव्या शतकांतील अतिशय प्रसिध्द अर्थशास्त्रज्ञ गिओजा हा होता. मोठ्या प्रमाणावर व्यापार करणें व यांत्रिक उत्त्पादन यांची तो स्तुति करतो. व्यापारावर नियंत्रण असावें व राजसत्तेचें अधिक बाबतींत नियमन व मार्गदर्शकत्व असावें असें त्याचें मत आहे. धार्मिक सत्तेचा पगडा व इतर मध्ययुगांतील संस्था यांच्या तो विरूध्द होता. दुसर्या कांहीं ग्रंथकारांची नांवें पुढें दिलीं आहेत:-रोमॅनोसी, सिऑलोजा, सिब्रॅरिओ, बोकॅर्डो, फेरेरा, बिअँकिनी.
स्पेनमध्यें ऑर्टीझनें स्मिथच्या ग्रंथाचें भाषांतर केलें. याशिवाय जोव्हेलेनॉस यानें एक ग्रंथ लिहिला आहे.
जर्मनीमध्यें प्रथम स्मिथच्या ग्रंथाकडे कोणी लक्ष दिलें नाहीं. फ्रेडरिक दि ग्रेट याला त्या ग्रंथाची माहिती नव्हती. एकोणसाव्या शतकाच्या प्रारंभीं स्टाईन या मुत्सद्यावर स्मिथचें वजन पडलें व त्याच्या जवळचे सर्व मुत्सद्दी स्मिथला मान देऊं लागलें, स्मिथच्या ग्रंथाचें विशदीकरण कॉस्, सारटोरियम, ल्यूडर, डूफलँड, लॉझ्,याकोब, यांनीं केलें. सोडन यानें स्मिथच्या ग्रंथावर कडक टीका केली. राऊ याच्या ग्रंथांत पूर्वीचा अर्थशास्त्राचा इतिहास असून शिवाय आंकडे दिले आहेत. निबीनियस यानें राष्ट्रीय जमाखर्चावर एक लहान पुस्तक लिहिलें. हर्मन याचा ग्रंथ रिकार्डोच्या पध्दतीचा आहे. थ्यूनन याच्या ग्रंथांत शेतकीचें सांगोपाग वर्णन आहे. यांत अनेक सूचना व विचारास चालन देणारे असे सिध्दांत आहेत. रशियामध्यें स्टॉर्क व पॉसोशकॉफ हे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ होते. यांपैकीं स्टॉर्क यानें इंग्रजी व फ्रेंच ग्रंथकारांचा अनुवाद केला आहे व रशियांतील सर्फडम या अर्धगुलामगिरीच्या पध्दतीचा विशेष विचार केला आहे. श्लोझरनें स्मिथच्या ग्रंथाचा पुष्कळ प्रसार केला. स्मिथच्या ग्रंथाच्या विरूध्द ज्यांनीं टीका केली व नवीन पध्दतीचा ज्यांनीं उपक्रम केला असे ग्रंथकार मुलर, व फेडरिश लिस्ट हे होत. मुलर हा बर्कप्रमाणें पुराणमतवादी होता. मध्ययुगांतील संस्थांविषयीं त्याच्या मनांत आदर असे व समकालीन उदारमताविषयीं तो तिरस्कार व्यक्त करीत असे. मुलर ह्मणतो. स्मिथची उपपत्ति आगदीं यांत्रिक, आध्यात्मिक विचारांनीं शून्य अशी होती व समाजांतील प्रत्येक व्यक्ति हा स्वतंत्र परमाणु आहे व त्या सर्वांचें मिश्रण म्हणजे समाज अशी स्मिथची कल्पना होती, खाजगी मालमत्ता व खाजगी हितसंबंध यांचाच तिच्यांत विंचार केला जातो. समाज म्हणून निराळी, विशिष्ट, नैतिक बलानें युक्ति अशी एक शक्ति आहे, ही त्यास कल्पना नव्हती. स्मिथ ह्यानें आधिभौतिक भांडवलाचा विचार केला. पण भाषा संकृति नैतिक भावना, मुत्सद्दीपणा इत्यादि आध्यात्मिक भांडवलाकडे त्यानें लक्ष दिलें नाहीं; सरकार हें नेहमींच दुष्ट असतें असें नाहीं; समाजाचीं उच्च ध्येयें प्राप्त करून घेण्यास सरकार हेंच मुख्य साधन असतें. स्मिथची विचारपध्दति इंग्लंड देशास अनुकूल आहे परंतु इतर यूरोपांस ती घातक आहे. नुसती संपत्ति वाढून उपयोग नाहीं तर राष्ट्रीय ऐक्य, नैतिक उन्नति हीं सुध्दां साध्य केलीं पाहिजेत इ.या सर्व मतांत अर्थशास्त्रज्ञांच्या ऐतिहासिक संप्रदायाचें पूर्वस्वरूप सूचित झालें आहे.
मुलरचा लिस्टच्या मतांवर पुष्कळ परिणाम झाला. त्याचा विशेष कटाक्ष सार्वराष्ट्रीयत्वाच्या भावनेविरूध्द होता. राष्ट्रास तो जास्त प्राधान्य देत असे. व प्रत्येक राष्ट्रानें आपापलें हित पाहावें असें त्याचें मत असे. वैयक्तिक हित पाहिल्यानें समाजाचें हित कधींहि साध्य होणार नाहीं. समाजाची उन्नति झाल्याशिवाय व्यक्तिस सुख संस्कृति, नीति इत्यादिकांचा गंधहि राहणार नाही. शेतकी, कारखाने व व्यापार हीं तीनहि एकदम वाढविलीं पाहिजेत. नुसती शेतीकरून देश अडाणी व उत्साहरहित व साहसविहीन असा होतो. समाजास सर्व अवस्थांमधून क्रमानें नेण्याचें काम राजसत्तेचें आहे. प्रथम प्रत्येक राष्ट्रानें खुला व्यापार स्वीकारून परदेशांतून माल येऊं द्यावा. हलके हलके स्वत: कारखाने काढण्याची तयारी होतांच संरक्षक जकातीची पध्दति स्वीकारून कारखाने पूर्णतेस न्यावे. हें झाल्यानंतर पुन्हां खुल्याव्यापारांचें तत्त्व अमलांत आणण्यास हरकत नाहीं. इंग्लंड सारख्या देशानें अशा रीतीनेंच आपली उन्नति करून नंतर खुला व्यापार स्वीकारला आहे. म्हणून जर्मनी, युनायटेड स्टेटस् अशा देशांस खुला व्यापार अनुकूल होणार नाहीं. कांहीं काळ संरक्षक पध्दतीनें नुकसान झालें तरी उत्पादनशक्ति वाढल्यामुळें तें भरून येतें. या लिस्टच्या मतांनीं जर्मनींत क्रांति घडून आली व त्याच्या मतांचा मुत्सद्यांच्या धोरणावरहि परिणाम झाला. इंग्रजी अर्थशास्त्र जर्मनीस बिलकुल लागू नाहीं हा लिस्टचा एकंदर रोख होता. राष्ट्राच्या अवस्थेवर व परिस्थितीवर त्याचें अर्थशास्त्र त्याचें अर्थशास्त्र अवलंबून असतें व एकच सिध्दांत जगांतील सर्व देशांत लावतां येणार नाहीं हें लिस्टनें शिकविलें. हिंदुस्थानच्या दृष्टीनें लिस्टजीं मतें फारच महत्त्वाचीं आहेत असें गेल्या पिढींत रानडे, गोखले सांगत होते. त्यांच्या मतें त्याच्यावेळेस जर्मनीची जी स्थिति होती तशीच बरहुकूम हल्लीं हिंदुस्थानची आहे.
आतांपर्यंत उल्लेख केलेल्या कांहीं ग्रंथकांरानीं स्मिथच्या सिध्दांतांत फेरबदल करण्याचा प्रयत्न केला व त्याच्या ग्राह्यतेच्या मर्यादा दाखविल्या तरीहि बहुतेक सर्व ग्रंथकार स्मिथसंप्रदायापैकीं होते असें म्हणतां येईल. कांहींच्या ग्रंथांत ऐतिहासिक संप्रदायाचीं कांहीं मतें दृग्गोचर होतात, परंतु अगदीं नवा संप्रदाय काढण्याचें यांपैकीं कोणाच्याही मनांत आलें नाहीं. हें काम ऐतिहासिक संप्रदायानें केलें व त्याचें परिक्षण आतां आपणांस केलें पाहिजे.
ऐतिहासिक पंथ. - अठराव्या शतकांत जो विचार क्रम प्रचलित होता त्याचा परिणाम असा झाला कीं, सरकारी अडथळ्यांपासून आर्थिक आयुष्यक्रम बराचसा मुक्त झाला. तथापि हें तत्तज्ञान संवर्धनाचें नसून केवळ नियंत्रणाभावाचें होतें. अर्थशास्त्राच्या अभ्यासांत यावेळेस क्रांति झाली त्याचीं कारणें अनेक देतां येतील. ( १ ) सोशिआलाजीसारखें शास्त्र पाहिजे अशी कल्पना उत्पन्न झाली. ( २ ) आर्थिक प्रश्नांच्या विचांरांत आंकडेशास्त्र शिरूं लागलें आणि तात्त्विक विचाराची तपासणी अनुभवानें करण्याचें साहित्य उत्पन्न झालें, आणि जी प्रवृत्ती आनुमानिक अर्थशास्त्र सांगे त्या प्रवृत्तींचें मोजमाप करण्याची संधि मिळाली ( आंकडेशास्त्र पहा ). १८३९ सालीं ओशिआलजी शब्द कोंटनें वापरला तर रायल स्टॅटिसटिकल सोसायटीची स्थापना त्या सालांतच झाली आणि त्या संस्थेचा उद्देश केवळ आंकडेशास्त्राचा नव्हता तर व्यापक समाजशास्त्राचा होता. जर्मनीमध्यें अनुमानाला प्रत्यक्षाची जोड देऊन आनुमानिक अर्थशास्त्रीय नियमांच्या मर्यादा नियमित करण्याच प्रयत्न झाला. त्यांचे प्रवर्तक रोशेर हिलेब्रांट व क्नीस हे होते. या प्रत्येकाचें कार्य देण्यांचें येथें प्रयोजन नाहीं प्रवृत्ति दर्शनार्थ विवेचन केल्यास पुरें होईल.
१८३९ च्या सुमारास कोंटनें सोशिआलजी ( समाजशास्त्र ) हा शब्द निर्माण केला आणि आपली विचारमालिकाहि प्रगट केली. त्याच्या विचारांतील प्रधान अंगें येणेंप्रमाणेः- इतर मानवी आयुष्याची विविध अगें लक्षांत घेतलीं असतां सर्व समाजाचें एकच शास्त्र आहे आणि अर्थशास्त्र हें विवेचनीय भाग म्हणजे केवळ समाजाची स्थिति नाहीं तर केवळ भाग आहे असें दिसून येईल. समाजाचा समाजाची गति हाहि एक महत्त्वाचा विवेचनीय भाग आहे. यामुळें विशिष्ट कालीन स्थिति पाहून अंतिमसत्य ज्ञेय नाहीं तर वारंवार बदलत जाणार्या समाजाविषयीं उपलब्ध सत्य विशिष्टकालीन आणि विशिष्ट परिस्थितीनें अंकित आहे, ही गोष्ट लक्षांत घेतली पाहिजे सामाजिक प्रश्नांमध्यें अर्थांत ऐतिहासिक रीति प्रामुख्यानें वापरली पाहिजे. आणि गरजा, किंवा सुखें यांचें अर्थशास्त्रीय विवेचन करतांना नैतिक आध्यात्मिक, भावनांकडे दुर्लक्ष करून चालावयाचें नाहीं. वैयक्तिक स्वातंत्र्य हेंच केवळ आयुष्यध्येय नाहीं तर सामाजिक कर्तव्यांचें ध्येय लोकांपुढें पाहिजे. समाजाची आर्थिक कारणांमुळें गति अशी होत चालली आहे कीं, दिवसानुदिवस लोकपक्षाचीं जीं महत्वाची ध्येयें आहेत तीं साध्य होतील आणि जीं साध्य व्हावयाचीं तीं क्रांतीमुळें न होतां विकासस्वरूपी हळूहळू होत जाणार्या फरकामुळें होतील. कोंटची एकंदर पॉझिटिव्ह फिलासफी किंवा ज्यास तो “समाजशास्त्र” म्हणून म्हणत होता तें शास्त्र किंवा त्याच्या शास्त्रविषयक कल्पना येथें देण्यास अवकाश नाहीं. ( समाजशास्त्र” व ‘कोंट’ पहा ). पण येथें एवढेंच सांगितले पाहिजे कीं, सामाजिक व्यापक विचारांचा परिणाम अर्थशास्त्रावर बराच झाला. परंतु कोंटच्या विचारांनीं अर्थशास्त्रास एकदम निराळी दिशा लागली नाहीं. ही दिशा लावण्याचें श्रेय जर्मन “ऐतिहासिकसंप्रदायी” अर्थशास्त्राज्ञांस आहे.
अर्थशास्त्रीय ऐतिहासिक पंथाचा जर्मनींत उद्भव झाला तो कोंटप्रमाणें समाजशास्त्रीय पध्दतीसाठीं व्यापक तत्त्वज्ञान शोधतां शोधतां झाला नाहीं तर कायद्याच्या अभ्यासांत जी ऐतिहासिक पध्दति साव्हिनी वगैरे अभ्यासकांनीं सुरू केली त्या पध्दतीचा प्रवेश अर्थशास्त्रांत होऊन झाला. अर्थशास्त्रांत या पध्दतीचे आद्यप्रवर्तक म्हणऊन तिघे ग्रंथकार गणले जातात ते, रोशेर, हिलेब्राट व नाईस ( काईस क्निस ) हे होत. समाजहितावह सर्वकालव्यापक नियम शोधण्यांत अर्थ नाहीं. समाजाच्या गरजा वारंवार बदलतात आणि जें कायदेतत्त्व एका काळीं योग्य असेल ते पुढील काळाला जुळावयाचें नाहीं. त्याप्रमाणेंच अर्थशास्त्रीय उपाय एका काळाला लागू पडतील तें दुसर्या काळाला लागूं पडणार नाहींत. इत्यादि तत्त्वे त्यांनीं पुढें मांडली. रोशेरनें ( १८१७-१८९४ ) आपला अर्थशास्त्रीय ऐतिहासिक पध्दतीवर ग्रंथ १८४३ सालीं प्रसिध्द केला, त्यानें त्यांत प्रस्तावनेंत आपली तत्त्वें दिलीं तीं सामान्यत: येणेंप्रमाणें ऐतिहासिक पध्दति म्हणजे केवळ कालानुक्रमानें वृत्तकथन नाहीं. तर कांहीं गोष्टींची जाणीव त्यांत आली पाहिजे. त्या गोष्टी येणें प्रमाणें:-ऐतिहासिक अर्थशास्त्र, म्हणजे कोणतेहि राष्ट्र आर्थिक बाबतींत काय विचार करीत आहे, काय प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करीत आहे आणि त्यांनीं काय संपादिलें आहे याचा तपशील होय; शिवाय राष्ट्र म्हणजे केवळ आजचे लोक नाहींत तेव्हां विशिष्ट कालांत येणार्या आर्थिक गोष्टीच अभ्यासून कार्य पुरें व्हावयाचें नाहीं. आर्थिक संस्था पाहून त्या चांगल्या किंवा दुष्ट आहेत असा तडका फडकीं निर्णय देणें शहाणपणाचें होणार नाहीं, कांकीं सर्वस्वीं चांगल्या किंवा सर्वस्वीं वाईट अशा कोणत्याच नाहींत. त्या संस्थाचें अवलोकन इतर परिस्थितीशीं सापेक्षतेनें करावयास पाहिजे. इ.स.१८४८ सालीं हिलेब्रांट ( १८१२-१८७८ ) चें अर्थशास्त्रावरील पुस्तक बाहेर पडलें या पुस्तकांत स्मिथ, मुल्लर, लिस्ट इ. पूर्वकालीन अर्थशास्त्रवेत्त्यांच्या पुस्तकांचें परिक्षण चांगल्या तर्हेनें केलें आहे. या पुस्तकांत अर्थशास्त्रीय नियमाचें विवेचन करणें हें शास्त्रध्येय ठेवलें नसून ज्या रीतींनीं राष्ट्रें आर्थिक प्रगति संपादितात त्या नियमांचें संशोधन करणें हें शास्त्रध्येय ठेवलें आहे. हिलेब्राटनें ऐतिहासिस अर्थशास्त्रास आदर्शभूत म्हणून ऐतिहासिक कायदेशास्त्र घेतलें नाहीं तर भाषाशास्त्र घेतलें ही गोष्टहि विशेष लक्षांत ठेवण्याजोगी आहे.
इ.स.१८५३ मध्यें कार्ल नाईस ( १८२१-१८९८ ) याचा ग्रंथ प्रसिध्द झाला. या ग्रँथामध्यें ऐतिहासिक पध्दति अत्यंत व्यापकपणें विवेचिलेली आहे. प्रत्येक कालांतील अर्थशास्त्रीय स्थिति आणि त्या कालांतील अर्थशास्त्रीय विचार हीं दोन्हीहि पूर्वकालीन वृत्तपरंपरेची आणि विचारपरंपरेची परिणतस्वरूपी होय आणि या दोन्हींचा एकंदर सामाजिक परिस्थितींशीं अवयवअवयवीसंबंध आहे. एकंदर संस्कृतीमध्यें उच्चोच्चतादर्शक पायर्या असतात आणि प्रत्येक कालच्या आर्थिक परिस्थितीच्या त्या कालच्या एकंदर सांकृतिक परिस्थितीशीं निकट संबंध असल्यानें दोहोंचाहि अभ्यास साहचर्यानें झाला पाहिचे इत्यादि गोष्टी त्यानें पुढें मांडल्या. आणि आजचीं जीं उराशीं बाळगलेलीं अर्थशास्त्रीय सत्यें आपण समजतों तीं केवळ विशिष्ट परिस्थितीचीं आणि सांस्कृतिक पायरींचीं दर्शक आहेत. अंतिम सत्यें नव्हत.
या ऐतिहासिक पध्दतीचे जर्मनींतील पुढील महत्त्वाचे अनुयायी म्हटले म्हणजे लूयोब्रेटानो, आडोल्फ हेल्ड, अरविन नास, गस्टाव्ह श्शोलर, एच रोझलेर, आलबेरट शाफेल. हान्स व्हान शील, गस्टाव्ह स्कोनबर्ग आणि आडोल्फ बाग्नर हे होत. यांच्याविषयीं येथें अधिक मजकूर देत नाहीं.
अमेरिकेतील अर्वाचीन अर्थशास्त्रज्ञांच्या अर्वाचीन ग्रंथाविषयीं येथें माहिती न देतां त्यांचें विवेचन विशिष्ट प्रश्नांचा उहापोह करतेवेळेस देऊं आणि आतां येथें भारतीय अर्थशास्त्राकडेस लक्ष देऊं.
हिंदी अर्थशास्त्र.- ( उपोद्धात ) अडॅम स्मिथनें आपला ‘वेल्थ ऑफ नेशन्स’ हा अर्थशास्त्रावरील ग्रंथ लिहिला त्यावेळीं इंग्लंड व यूरोपांतील दुसरे कित्येक देश ‘राष्ट्र’ या पदवीस पोहोचलेले होते. शिवाय इंग्लंडांत तर लोकनियंत्रित राज्यपध्दति आधींच चांगली व्यवस्थित सुरू झालेली होती, आणि राज्य म्हणजे राजे लोकांची केवळ खाजगी मालमत्ता ही कल्पना बहुतेक नष्ट झाली होती. सत्ता लोकांनीं आपल्या हातांत घेतली होती, आणि तिचा लोकांचें सामुच्चीयक हित साधण्याकडे कसा उपयोग करून घ्यावयाचा या प्रश्नांचा विचार चालू होता. अर्थशास्त्रीय विचारांत मोठी क्रांन्ति घडवून देणारा जो अडॅम स्मिथ यानें तत्पूर्वीच्या थॉमस मुन वगैरे कित्येक अर्थशास्त्रावरील लेखकांच्या, राष्ट्राला सांपत्तिक दृष्ट्या हितावह काय, यासंबंधाच्या कांहीं चुकीच्या कल्पना खोडून काढल्या. इंग्लंडसारख्या एखाद्या विशिष्ट राष्ट्राला हितावह गोष्टी कोणत्या हें ठरवीत असतां अर्थशास्त्रांतर्गत कित्येक सर्व सामान्य गोष्टींचा उहापोह त्यानें आपल्या ग्रंथांत केला, व अप्रत्यक्षपणें अर्थशास्त्रांतील कित्येक सिध्दांतांचा पाया घातला. या पायावर पुढें अर्थशास्त्राची इमारत उठाविणारे इंग्लंडमधील अर्थशास्त्री यांनीं सदरहू शास्त्रविषयाचा अधिक अभ्यास करून अर्थशास्त्रांतील प्रश्नांवरच्या अनेक प्रमयप्रतिज्ञा ठरवून टाकल्या व त्याच जगांतील प्रत्येक देशास लागू होण्यासारख्या आहेत अशी आपली समजूत करून घेतली. परंतु केवळ इंग्लंडच्या तत्कालीन विशिष्ट परिस्थितीला धरून अर्थशास्त्राचे सिध्दांत ठरविणें म्हणजे सर्वव्यापक अर्थशास्त्राची इमारत आकुंचित पायावर उभरणें आहे, तीं पुढें मागें ढासळण्याचा संभव आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षांत आली नाहीं. इंग्लंडमधील सामाजिक परिस्थिति विषयक ज्या गोष्टी गृहीत धरल्या त्या पुढील प्रमाणें:-देश व राष्ट्र म्हणजे कल्पना एकच, त्यावर सत्ता चालविणारी अशी तद्देशीय एक संस्था, देशांतील सर्व समाज एक भाषा बोलणारा, सर्व समाजाचा सांस्कृतिक दर्जा सारखाच, शिवाय देशांत मांडलीक किंवा संस्थानिकाचा अभाव, व तसेंच अर्थशास्त्राला विघातक अशा तत्त्वज्ञानविषयक किंवा पारमार्थिक कल्पनांचा पूर्ण अभाव, आणि अनियंत्रित राजसत्ता मोडून लोकनियंत्रित राज्यव्यवस्था स्थापण्याकरितां करावे लागणारे सर्व झगडे आधींच होऊन गेलेले अशी विशिष्ट सामाजिक व राजकीय परिस्थिति गृहित धरून लिहिलेलें अर्थशास्त्र एक किंवा अनेक बाबतींत भिन्न असलेल्या दुसर्या कोणत्याहि देशास कसें लागू व उपयोगी पडणार ? उदाहरणार्थ जर्मनीच घ्या. जर्मनी त्या वेळीं एक राष्ट्र बनलेला नव्हता, त्यांत अनेक संस्थानें व लोकसत्ताक नगरराज्येंहि होतीं. अशांनां हितावह असे अर्थशास्त्राचे सिध्दांत जर्मन पंडितांनीं पुढें मांडले. ते अर्थात् इंग्रज पंडितांनीं जागतिक म्हणून ठरविलेल्या सिध्दान्तांहून निराळे होते; पण त्यांत अत्यंत जरूर अशी खरी राष्ट्रीय दृष्टी होती त्यांतूनच वैयक्तिक किंवा राष्ट्रीय अर्थशास्त्राचा उगम झाला. या जर्मन अर्थशास्त्राचा विशेष असा होता कीं, अर्थशास्त्राचे प्रश्न राजकीय व सामाजिक प्रश्नांशीं अत्यंत निगडित आहेत ही गोष्ट जर्मन पंडितांनीं ओळखली होती.
स्वतंत्र हिंदी अर्थशास्त्राची अवश्यकता.- हिंदी अर्थशास्त्रासंबंधानें जेव्हां आपण विचार करूं लागतों तेव्हां इंग्लिश व हिंदी समाजाची स्थिति अत्यंत भिन्न आहे. हीच गोष्ट आपण प्रामुख्यानें लक्षांत ठेवून इंग्रज पंडितांनीं ठरविलेले अर्थशास्त्राचे पुष्कळ सिध्दन्त हिंदुस्थानास सांप्रत तरी पुष्कळसे लागू नाहींत असें धरून चाललें पाहिजे. आपल्या हिंदुस्थानाची आर्थिक उन्नति करण्याचे मार्गांत राजकीय व सामाजिक अशा फारच अडचणी आहेत. आणि त्या नीट लक्षांत घेतल्याशिवाय आर्थिक उन्नतीबद्दल केलेली धडपड अरण्यरूदनवत् निष्फळच होणार. म्हणून प्रथम हिंदुस्थानांतील सामाजिक, राजकीय व भावनात्मक परिस्थितीचा आधीं नीट विचार झाला पाहिजे, व त्यांचा आर्थिक स्थितीवर होणारा परिणाम नीट ओळखला पाहिजे. ब्रिटिश व इतर पाश्चात्य विद्वानांनीं ठरविलेले सिध्दांत आयते उचलून ते तंतोतंत इकडे लागू करून हिंदुस्थानची आर्थिक उन्नति करण्याच्या प्रयत्नास यश येणें तर शक्य नाहींच, पण उलट पाश्चात्त्यांच्या अर्थशास्त्रीय सिध्दांतातील फोलपणा मात्र सहज दिसून येईल. फार कशाला, आजपर्यंत शंभर दीडशे वर्षांच्या ब्रिटिश अमदानींत पुष्कळ ब्रिटिश अर्थशास्त्र शिकलेल्या विद्वानांनीं अर्थशास्त्रीय विषयांचें शिक्षण दिलें पण अद्याप हिंदुस्थानची आर्थिक स्थिति फारशा सुधारली नाहीं. सामाजिक व राजकीय व्यंगाकडे दुर्लक्ष झालें परदेशी भांडवल रेल्वे वगैरे सुधारणाहि आल्या पण लोकांचीं आर्थित स्थिति फारशी सुधारली नाहीं. हिंदुस्थानांत वारंवार पडणार्या नुसत्या दुष्काळांस बळी पडणार्या लाखों लोकांकडे पाहिलें म्हणजे तेवढ्यानेंहि या सरकारी पंडितांच्या बुध्दीची योग्य कल्पना होते. आणि म्हणूनच आपल्या देशाची प्रत्यक्ष स्थिति आपण स्वत:च अवलोकन करून आपलें स्वतंत्र हिंदी अर्थशास्त्र निर्माण करणें आपणास जरूर आहे. असें येथील हिंदी रक्ताच्या अर्थशास्त्रज्ञांस वाटूं लागून तदनुसार प्रयत्नहि होऊं लागले आहेत. व या विषयावर डॉ.केतकर यांनीं स्वतंत्र विचाराचा ‘इंडियन एकानामिक्स’ नांवाचा एक ग्रंथ लिहून नवीन दिशेनें विचार करण्यास सुरूवात केली त्या ग्रंथाचा आशय पुढें दिला आहे.
हिंदी अर्थशास्त्र तयार करण्याकरतां प्रथम हिंदी समाजाची, त्याच्या बौध्दिक परंपरेची, सांस्कृतिक इतिहासाची, वाङ्मयाची तसेंच प्रस्तुतच्या राजकीय परिस्थितिची लेखकांनां चांगली माहिती पाहिजे. शिवाय त्यांनीं सुचविलेल्या प्रकारांनीं सामाजिक व आर्थिक स्थिति सुधारण्याची लोकांमध्यें प्रबल इच्छा पाहिजे; आणि त्या सुधारणा प्रत्यक्ष अमलांत येण्याकरतां राज्यसूत्रें हातीं असलेल्या मुत्सद्यांस मार्ग दाखविणारें अर्थशास्त्रांतील तज्ज्ञांचें सल्लागारमंडळ पाहिजे. वरील गोष्टींचा अभाव हें आजपर्यंत हिंदुस्थानची आर्थिक उन्नति न होण्याचें एक कारण, पण त्याहूनहि बलवत्तर कारण म्हणजे हिंदी बौध्दिक परंपरा नष्ट करून येथें पाश्चात्त्य संस्कृति प्रस्थापित करण्याची मनीषा हें होय. पण आतां तो काल पालटला आहे, आणि खरें हिंदी अर्थशास्त्र जन्मास येऊन हिंदुस्थानची आर्थिक उन्नति लवकरच होईल, अशीं चिन्हें स्पष्ट दिसूं लागलीं आहेत
हिंदी अर्थशास्त्र.- ( उपोद्धात ) अडॅम स्मिथनें आपला ‘वेल्थ ऑफ नेशन्स’ हा अर्थशास्त्रावरील ग्रंथ लिहिला त्यावेळीं इंग्लंड व यूरोपांतील दुसरे कित्येक देश ‘राष्ट्र’ या पदवीस पोहोचलेले होते. शिवाय इंग्लंडांत तर लोकनियंत्रित राज्यपध्दति आधींच चांगली व्यवस्थित सुरू झालेली होती, आणि राज्य म्हणजे राजे लोकांची केवळ खाजगी मालमत्ता ही कल्पना बहुतेक नष्ट झाली होती. सत्ता लोकांनीं आपल्या हातांत घेतली होती, आणि तिचा लोकांचें सामुच्चीयक हित साधण्याकडे कसा उपयोग करून घ्यावयाचा या प्रश्नांचा विचार चालू होता. अर्थशास्त्रीय विचारांत मोठी क्रांन्ति घडवून देणारा जो अडॅम स्मिथ यानें तत्पूर्वीच्या थॉमस मुन वगैरे कित्येक अर्थशास्त्रावरील लेखकांच्या, राष्ट्राला सांपत्तिक दृष्ट्या हितावह काय, यासंबंधाच्या कांहीं चुकीच्या कल्पना खोडून काढल्या. इंग्लंडसारख्या एखाद्या विशिष्ट राष्ट्राला हितावह गोष्टी कोणत्या हें ठरवीत असतां अर्थशास्त्रांतर्गत कित्येक सर्व सामान्य गोष्टींचा उहापोह त्यानें आपल्या ग्रंथांत केला, व अप्रत्यक्षपणें अर्थशास्त्रांतील कित्येक सिध्दांतांचा पाया घातला. या पायावर पुढें अर्थशास्त्राची इमारत उठाविणारे इंग्लंडमधील अर्थशास्त्री यांनीं सदरहू शास्त्रविषयाचा अधिक अभ्यास करून अर्थशास्त्रांतील प्रश्नांवरच्या अनेक प्रमयप्रतिज्ञा ठरवून टाकल्या व त्याच जगांतील प्रत्येक देशास लागू होण्यासारख्या आहेत अशी आपली समजूत करून घेतली. परंतु केवळ इंग्लंडच्या तत्कालीन विशिष्ट परिस्थितीला धरून अर्थशास्त्राचे सिध्दांत ठरविणें म्हणजे सर्वव्यापक अर्थशास्त्राची इमारत आकुंचित पायावर उभरणें आहे, तीं पुढें मागें ढासळण्याचा संभव आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षांत आली नाहीं. इंग्लंडमधील सामाजिक परिस्थिति विषयक ज्या गोष्टी गृहीत धरल्या त्या पुढील प्रमाणें:-देश व राष्ट्र म्हणजे कल्पना एकच, त्यावर सत्ता चालविणारी अशी तद्देशीय एक संस्था, देशांतील सर्व समाज एक भाषा बोलणारा, सर्व समाजाचा सांस्कृतिक दर्जा सारखाच, शिवाय देशांत मांडलीक किंवा संस्थानिकाचा अभाव, व तसेंच अर्थशास्त्राला विघातक अशा तत्त्वज्ञानविषयक किंवा पारमार्थिक कल्पनांचा पूर्ण अभाव, आणि अनियंत्रित राजसत्ता मोडून लोकनियंत्रित राज्यव्यवस्था स्थापण्याकरितां करावे लागणारे सर्व झगडे आधींच होऊन गेलेले अशी विशिष्ट सामाजिक व राजकीय परिस्थिति गृहित धरून लिहिलेलें अर्थशास्त्र एक किंवा अनेक बाबतींत भिन्न असलेल्या दुसर्या कोणत्याहि देशास कसें लागू व उपयोगी पडणार ? उदाहरणार्थ जर्मनीच घ्या. जर्मनी त्या वेळीं एक राष्ट्र बनलेला नव्हता, त्यांत अनेक संस्थानें व लोकसत्ताक नगरराज्येंहि होतीं. अशांनां हितावह असे अर्थशास्त्राचे सिध्दांत जर्मन पंडितांनीं पुढें मांडले. ते अर्थात् इंग्रज पंडितांनीं जागतिक म्हणून ठरविलेल्या सिध्दान्तांहून निराळे होते; पण त्यांत अत्यंत जरूर अशी खरी राष्ट्रीय दृष्टी होती त्यांतूनच वैयक्तिक किंवा राष्ट्रीय अर्थशास्त्राचा उगम झाला. या जर्मन अर्थशास्त्राचा विशेष असा होता कीं, अर्थशास्त्राचे प्रश्न राजकीय व सामाजिक प्रश्नांशीं अत्यंत निगडित आहेत ही गोष्ट जर्मन पंडितांनीं ओळखली होती.
स्वतंत्र हिंदी अर्थशास्त्राची अवश्यकता.- हिंदी अर्थशास्त्रासंबंधानें जेव्हां आपण विचार करूं लागतों तेव्हां इंग्लिश व हिंदी समाजाची स्थिति अत्यंत भिन्न आहे. हीच गोष्ट आपण प्रामुख्यानें लक्षांत ठेवून इंग्रज पंडितांनीं ठरविलेले अर्थशास्त्राचे पुष्कळ सिध्दन्त हिंदुस्थानास सांप्रत तरी पुष्कळसे लागू नाहींत असें धरून चाललें पाहिजे. आपल्या हिंदुस्थानाची आर्थिक उन्नति करण्याचे मार्गांत राजकीय व सामाजिक अशा फारच अडचणी आहेत. आणि त्या नीट लक्षांत घेतल्याशिवाय आर्थिक उन्नतीबद्दल केलेली धडपड अरण्यरूदनवत् निष्फळच होणार. म्हणून प्रथम हिंदुस्थानांतील सामाजिक, राजकीय व भावनात्मक परिस्थितीचा आधीं नीट विचार झाला पाहिजे, व त्यांचा आर्थिक स्थितीवर होणारा परिणाम नीट ओळखला पाहिजे. ब्रिटिश व इतर पाश्चात्य विद्वानांनीं ठरविलेले सिध्दांत आयते उचलून ते तंतोतंत इकडे लागू करून हिंदुस्थानची आर्थिक उन्नति करण्याच्या प्रयत्नास यश येणें तर शक्य नाहींच, पण उलट पाश्चात्त्यांच्या अर्थशास्त्रीय सिध्दांतातील फोलपणा मात्र सहज दिसून येईल. फार कशाला, आजपर्यंत शंभर दीडशे वर्षांच्या ब्रिटिश अमदानींत पुष्कळ ब्रिटिश अर्थशास्त्र शिकलेल्या विद्वानांनीं अर्थशास्त्रीय विषयांचें शिक्षण दिलें पण अद्याप हिंदुस्थानची आर्थिक स्थिति फारशा सुधारली नाहीं. सामाजिक व राजकीय व्यंगाकडे दुर्लक्ष झालें परदेशी भांडवल रेल्वे वगैरे सुधारणाहि आल्या पण लोकांचीं आर्थित स्थिति फारशी सुधारली नाहीं. हिंदुस्थानांत वारंवार पडणार्या नुसत्या दुष्काळांस बळी पडणार्या लाखों लोकांकडे पाहिलें म्हणजे तेवढ्यानेंहि या सरकारी पंडितांच्या बुध्दीची योग्य कल्पना होते. आणि म्हणूनच आपल्या देशाची प्रत्यक्ष स्थिति आपण स्वत:च अवलोकन करून आपलें स्वतंत्र हिंदी अर्थशास्त्र निर्माण करणें आपणास जरूर आहे. असें येथील हिंदी रक्ताच्या अर्थशास्त्रज्ञांस वाटूं लागून तदनुसार प्रयत्नहि होऊं लागले आहेत. व या विषयावर डॉ.केतकर यांनीं स्वतंत्र विचाराचा ‘इंडियन एकानामिक्स’ नांवाचा एक ग्रंथ लिहून नवीन दिशेनें विचार करण्यास सुरूवात केली त्या ग्रंथाचा आशय पुढें दिला आहे.
हिंदी अर्थशास्त्र तयार करण्याकरतां प्रथम हिंदी समाजाची, त्याच्या बौध्दिक परंपरेची, सांस्कृतिक इतिहासाची, वाङ्मयाची तसेंच प्रस्तुतच्या राजकीय परिस्थितिची लेखकांनां चांगली माहिती पाहिजे. शिवाय त्यांनीं सुचविलेल्या प्रकारांनीं सामाजिक व आर्थिक स्थिति सुधारण्याची लोकांमध्यें प्रबल इच्छा पाहिजे; आणि त्या सुधारणा प्रत्यक्ष अमलांत येण्याकरतां राज्यसूत्रें हातीं असलेल्या मुत्सद्यांस मार्ग दाखविणारें अर्थशास्त्रांतील तज्ज्ञांचें सल्लागारमंडळ पाहिजे. वरील गोष्टींचा अभाव हें आजपर्यंत हिंदुस्थानची आर्थिक उन्नति न होण्याचें एक कारण, पण त्याहूनहि बलवत्तर कारण म्हणजे हिंदी बौध्दिक परंपरा नष्ट करून येथें पाश्चात्त्य संस्कृति प्रस्थापित करण्याची मनीषा हें होय. पण आतां तो काल पालटला आहे, आणि खरें हिंदी अर्थशास्त्र जन्मास येऊन हिंदुस्थानची आर्थिक उन्नति लवकरच होईल, अशीं चिन्हें स्पष्ट दिसूं लागलीं आहेत
‘हिंदी अर्थशास्त्र’ म्हणजे काय ? - अर्थशास्त्र हा विषय सामान्य अर्थानें हिंदुस्थानांतील लोकांस नवीन आहे, असें नाहीं. नफातोटा यासंबंधाच्या शास्त्रास संस्कृतांत ‘वार्ता’ असें नांव आहे. शिवाय राज्यांतील जमाखर्च व इतर संपत्तिविषयक गोष्टींचा विचार ज्या शास्त्रांत येतो असें ‘अर्थशास्त्र’ हि हिंदुस्थानांत रूढ आहे. पण ‘राष्ट्र’ या पदवीस पोहोचलेल्या सर्व हिंदी समाजाचें अर्थशास्त्र अशा अर्थानें मात्र हें शास्त्र हिंदुस्थानांत आजपर्यंत निर्माण झालेलें नाहीं. सांप्रत हिंदुस्थानच्या एकराष्ट्रीकरणाचा प्रयत्न चालू असल्यामुळें त्याबरोबरच नवें ‘हिंदी अर्थशास्त्र’ निर्माण होणेंहि जरूर आहे, हें उघड आहे.
‘हिंदी अर्थशास्त्र’ म्हणजे हिंदु लोकांची सामाजिक, राजकीय, भावनात्मक वगैरे परिस्थिति लक्षांत घेऊन प्रतिपादिलेलें अर्थशास्त्र. असल्या अर्थशास्त्राचें प्रतिपादन करतांना प्रथम हिंदुस्थान देशाची भौगोलिक स्थिति विचारांत घेतली पाहिजे. पण केवळ नैसर्गिक स्थितीला फाजील महत्त्व देतां कामा नये. उदाहरणार्थ, बकलसारख्या कांहीं लेखकांनीं, सर्व भारतीय संस्कृति ही केवळ हिंदुस्थानच्या भौगोलिक स्थितीचा परिणाम आहे, असें म्हटलें आहे. असें म्हणण्यांत थोडें तथ्य आहे पण सर्वस्वीं नाहीं. शिवाय नैसर्गिक कारणांस फाजील महत्त्व दिल्यानें असा घातक परिणाम होतो कीं, सामान्य जनांनां आपली स्थिति सर्वस्वीं निसर्ग-( दैव ) निर्मित आहे. व ती सुधारण्याचे मानवी प्रयत्न अर्थात निरर्थक होत असें वाटूं लागतें करतां सर्वांनीं हें लक्षांत ठेविलें पाहिजे कीं, देशांतील जनतेच्या विशिष्ट आर्थिक परिस्थितीला भौगोलिक कारणांप्रमाणें सामाजिक, राजकींय वगैरे कराणेंहि वळण लावीत असतात. म्हणून अशा सर्व प्रकारच्या कारणांची एकत्र मीमांसा होणें जरूर आहे. त्याबरोबरच एकेवेळीं जगांतील देशांत सर्वांत पुढें असलेला हा हिंदुस्थान आज पाश्चात्त्य देशांच्या मागें कां पडला या प्रश्नाचाहि विचार झाला पाहिजे. व शेवटी हिंदुस्थानची आर्थिक उन्नत्ति होण्याकरितां जे उपाय योजणें जरूर आहे, त्याचाहि उहापोह झाला पाहिजे. तात्पर्य, प्रत्येक विषयाला तात्त्विक व व्यवहारिक अशीं दोन अंगें असतात, असा भेद मान्य केल्यास ‘हिंदी अर्थशास्त्राला’अर्थशास्त्राचें व्यवहारिक अंग असें म्हणतां येईल.
येथें ब्रिटिश साम्राज्य स्थापन होण्यापूर्वी गारो, गोंड, संताळ वगैरे समुच्चयांचें जातिविशिष्ट अर्थशास्त्र प्रचलित होतें असें म्हणतां येईल. शिवाय येथें असलेलीं अनेक लहान राज्यें किंवा संस्थानें यांचें आर्थिक हित पाहणारें अर्थशास्त्रहि चालूं असावयाचेंच. मराठेशाहीचे अर्थशास्त्र उदाहरणार्थ मागेंच विवेचिलें आहे पण ती सर्व स्थिति बदलून आतां सर्व राष्ट्राचें असें एक ‘हिंदी अर्थशास्त्र’ निर्माण करण्याची वेळ आली आहे.
सामाजिक परिस्थिति व आर्थिक परिस्थिति.- हिंदु समाजव्यवस्था व तिचा आर्थिक स्थितीवर होणारा परिणाम या गोष्टींचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा व मनोरंजक आहे. या विषयाचें विवेचन करावें तितकें थोडेंच होणार आहें. येथें त्याचें थोडक्यांत दिग्दर्शन करावयाचें आहे. हिंदुसमाजातील विशेष लक्षांत घेण्यासारखा प्रकार म्हणजे जातिभेद हा होय. हिंदुस्थानांतील एकंदर लोकसंख्येपैकीं दोन तृतीयांश हिंदु आहेत; पण ते सुमारें तीन हजार निरनिराळ्या जातींमध्यें विभागले गेले आहेत; आणि शिवाय या मुख्य जातींच्या पोटजातीहि अनेक आहेत. या जातींमध्यें परस्पर विवाहसंबंध होत नसल्यामुळें त्या स्वतंत्र टोळ्याप्रमाणें एकमेकांपासून निराळ्या अलग राहत आलेल्या आहेत. यांपैकीं कांहींच्या रीतिरिवाजांत स्थलकालमानाप्रमाणें फेरफार झाले आहेत, तर कांहींत आज शेंकडों वर्षांत यत्किंचितहि फरक झालेला नाहीं. शिवाय पुष्कळशा जातींचें धंदे ठरलेले असून त्यांनां धंदेवाईक जातींचें स्वरूप प्राप्त झालेलें आहे. शिवाय या जातींत स्पृश्यास्पृश्यतेच्या विशिष्ट कल्पना पसरलेल्या आहेत. यामुळें प्रत्येक जातीची राहणी निरनिराळी झालेली असून, हा उच्च, हा नीच या भावना सर्वत्र प्रबल होऊन बसल्या आहेत.
जातिभेदे व अस्पृश्यता याचे आर्थिक परिणाम - जातिभेदामुळें हिंदुसमाजात पडलेली फूट व स्पृश्यास्पृश्यतेच्या कल्पना याचा हिंदुस्थानच्या आर्थिक स्थितीवर भयंकर परिणाम झालेला आहे. जातीजातींमध्यें विवाहसंबंध होत नाहींत, इतकेंच नव्हे तर आपसात अन्नोदकव्यवहार किंवा साध्या बसण्याउठण्याचाहि फारसा संबंध येत नाहीं. याचे तीन मोठे परिणाम होतात, ते असे कीं, ( १ ) सर्व समाजाच्या राहणीला समान स्वरूप येत नाहीं; ( २ ) हलक्या जातींची रहाणी सुधारून ती उच्च होऊं शकत नाहीं; आणि ( ३ ) पदार्थांची निपज करतांना श्रमविभागाच्या तत्त्वानुसार जरूर असणारे सहकार्य निरनिराळ्या जातींत होऊं शकत नाहीं. निरनिराळ्या जातींचीं व वर्णांची राहणी निरनिराळी असल्यामुळें त्यांच्या गरजा निरनिराळ्या असतात. त्यामुळें प्रत्येक जातीच्या लहान लोकसंख्येच्या मानानें पदार्थांची निपज अर्थांत् थोडक्या प्रमाणांत करावी लागते. उदाहरणार्थ, प्रत्येक जातीचा पोशाख निरनिराळ्या तर्हेचा असल्यामुळें प्रत्येकीचा शिंपी निराळा असतो. हिंदूंचा पोशाख निराळा, मुसलमानांचा निराळ;इतकेंच नव्हे तर, गुजरातीयांचा निराळा. दक्षिण्यांचा निराळा; यामुळें एकाच मुंबई शहरांत निरनिराळ्या समाजांचे स्वतंत्र शिंपी आहते. तसेंच गुजराथी व दक्षिणी यांच्या रूचिभिन्नत्वामुळें दोघाकरतां खाण्याचे पदार्थ बनविणारे स्वयंपाकीहि निरनिराळे लागतात. खाण्याचे पदार्थ भिन्न असतात. इतकेच नव्हे तर, पदार्थ एकच असला तरी तो तयार करण्याच्या पध्दती भिन्न असतात, म्हणूनहि भिन्न आचारी लागतात. यामुळें खाद्येंपुरवणार्या धंद्यास लहानपणा व वैशिष्ट्य हीं उत्पन्न होतात.
याप्रमाणें एकाच समाजांत भिन्नभिन्न वर्ग व त्यांच्या भिन्नभिन्न गरजा यामुळें एकंदर समाजाची आर्थिक उन्नति होण्याच्या मार्गांत भयंकर अडचणी येतात. समाजाची राहणी उच्च उच्च होत जाऊन पदार्थांची निपज मोठ्या प्रमाणावर होणें व प्रत्येक धंद्यात कामाची वाटणी होऊन प्रत्येक अंगात प्राविण्य संपादन करणें, या गोष्टी जातिभेदामुळें फूट पडून विस्कळित झालेल्या हिंदुसमाजात मुळींच संभवत नाहींत स्थानिक गरजा भागविण्यापुरती पदार्थांची अल्प प्रमाणात निपज करणें हाच नियम सर्वत्र दृष्टीस पडतो. हा नियमहि पूर्वीच्या काळीं जगापासून अलग असलेल्या हिंदुस्थानाला मोठासा घातक झाला नाहीं. पण अलीकडे सर्व परिस्थिति बदलून जगातील अनेक, पदार्थांची निपज मोठ्या प्रमाणावर करणार्या व धंद्याच्या प्रत्येक अंगात अत्यंत वाकबगार बनलेल्या राष्ट्राच्या व्यापारी स्पर्धेत हिंदुस्थान देश सापडला आहे. या नूतन परिस्थितीला तोंड देण्यास समर्थ होण्याकरिता हिंदी समाजाची सामाजिक व आर्थिक पुनर्घटना करणें जरूर आहे. या पुनर्घटनेचें स्वरूप नीट लक्षात येण्याकरिता हल्लींच्या सामाजिक व्यवस्थेत असलेल्या काहीं व्यंगाचीं येथें अधिक फोड करूं.
कोणत्याहि पदार्थाची निपज मोठ्या प्रमाणांत किंवा कोणताहि व्यापार मोठ्या प्रमाणावर हातीं घेण्याकरितां बुध्दि, शारीरिक श्रम व भांडवल हीं तिन्हीं एकत्र होणें जरूर असतें. पण हाच योग जमून येणें प्रस्तुत हिंदु समाजस्थितींत कसें कठीण असतें तें पहा. वरील तीन साधनें पृथकपणें भिन्न जातींच्या हातीं आहेत, म्हणजे महाराष्ट्रीय ब्राह्मणांजवळ बुध्दि, तर मारवाड्याजवळ भांडवल तर शूद्राजवळ शरीरबल; आणि हिंदु समाजीरचनाच अशी आहे कीं, या तीन वर्णांचा परस्पराशीं फारसा संबंध येऊं शकत नाहीं. आजहि पाश्चाच्य शिक्षण मिळविलेला वर्ग भांडवलवाल्याहून अगदीं भिन्न आहे. उदाहरणार्थ, आज एखादा महाराष्ट्री किंवा बंगाली सुशिक्षित ब्राह्मण एखाद्या श्रीमंत मारवाड्याकडे जाऊन काहीं एखादा मोठा उद्योगधंदा काढण्याची योजना त्याला सांगू लागला तर त्यावर त्या मारवाडी भांडवलवाल्यांचा विश्वास बसणार नाहीं; पण तोच एखादा शिकलेला मारवाडी आपल्या जातभाईकडे भांडवल मागण्यास गेल्यास त्याचें परस्परसहकार्य होऊं शकेल. पण दुर्दैवाची गोष्ट ही कीं, आमच्या गुजराथी बनिया किंवा मारवाडी समाजापैकीं परदेशांत जाऊन उच्च शिक्षण मिळविणारे इस मच नाहींत. यामुळें बुध्दि व भांडवल याचें सहकार्य दुरापास्त झालें आहे.
वरील तीन साधनें एकत्र येण्यास दुसरी अडचण म्हणजे स्पृश्य, अस्पृश्य या कल्पनांची. उदाहरणार्थ, कातडीं कमावून त्यांचे जिन्नस करण्याचा धंदा आमच्यांतील अस्पृश्य मानलेल्या चांभार जातीकडे आहे. पण या वर्गाजवळ बुध्दि नाहीं व भांडवलहि नाहीं. पूर्वी लहान प्रमाणांत धंदे करण्यानें फारसें बिघडत नव्हतें; पण आतां परदेशी मालाबरोबर टक्कर देण्याकरितां मोठ्या प्रमाणांत, मोठें भांडवल व त्या धंद्यांतलें चांगलें शिक्षण मिळवून धंदा करण्यावाचून गत्यंतर नाहीं. पण चांभार, ब्राह्मण व मारवाडी यांचें सहकार्य होण्यास जातिभेद व अस्पृश्यता आडवी येते. त्यामुळें हा धंदा आतां मुसलमान किंवा पारशी या समाजाच्या किंवा अगदीं परकी लोकांच्या हातीं जाऊं पहात आहे.
तिसरा धंदा हॉटेलें व खाणावळी हा घ्या. हिंदु लोकामध्यें ब्राह्मणाखेरीज इतर जातींच्या हातचे पदार्थ दुसर्या जातीचे लोक खात नसल्यामुळें ब्राह्मणाव्यतिरिक्त इतर जातींच्या हातीं हा धंदा फारसा जाणें शक्य नाहीं; किंवा प्रत्येक जातीचीं निरनिराळीं हॉटेलें व खाणावळी निघाल्या पाहिजेत, म्हणजे तात्पर्य हें कीं, हाहि धंदा मोठ्या प्रमाणावर चालूं शकत नाहीं. शिवाय जातीजातींचें व प्रांतोप्रांतीचे खाण्यापिण्याचे पदार्थ वेगवेगळे असल्यामुळेंहि मोठ्या प्रमाणावरील धंद्यास अडचण येते. यामुळें भारीभारी जकाती किंवा कर बसवूनहि जो घातक परिणाम होऊं शकत नाहीं तो वरील कारणांमुळें होत असतो.
आता व्ययाच्या दृष्टीनें पाहिलें तर हिंदुस्थानांतील बहुतेक लोकांची राहणी इतर सुधारलेल्या देशाच्या मानानें खास हलक्या दर्जाची आहे. अमेरिकेतला साधा मजूर सुध्दां आपल्या देशांतील मध्यम स्थितींतल्या माणसापेक्षा चांगलें अन्न खाचो व अधिक कपडे वापरतो. लोकांमध्ये पोशाख, राहणी व घरांतील सामानसुमान व सुखसोयी वगैरे बाबतींत स्पर्धा व अनुकरण चालूं असतें. यूरोप व अमेरिकेंत मोठमोंठीं व उत्तम बाइंडिंगचीं पुस्तकें खरेंदी करण्यामध्यें सुध्दा चढाओढ दृष्टीस पडते. संस्कृतीच्या व रसिकरतेच्या दृष्टीनें स्वत:स इतरांनीं मागासलेले म्हणूं नये, एवढ्याच केवळ हेतूनें मोठमोठे ग्रंथ खरेदी करून घरांत सुशोभित लायब्ररि ठेवणारे लोक तिकडे पुष्कळ असतात. आपल्या देशांत उच्च राहणीचे व वरील विचारसरणीचे लोक नाहींत, असें नाहीं. पण मुख्य अडचण अशी आहे कीं, अशा लोकांचा वर्ग अल्पसंख्याक असून त्याच्याशीं स्पर्धा व अनुकरण करण्याची बुध्दि जागृत होण्याकरितां इतरांचें त्या वर्गाशीं दळणवळण व संबंध जितका यावयास पाहिजे तितका जातिभेद व अस्पृश्यता या दोन भयंकर अडचयणीमुळें येऊं शकत नाहीं. वरील प्रकारची चढाओढ विशेषत: परस्परांच्या घरीं बायकाबायकांच्या जाण्यायेण्यानें वाढत असते. पण आमच्या हिंदु समाजांत बायकांमध्यें तर सोवळ्याओवळ्याच्या व विटाळचंडाळाच्या कल्पना फारच पसरलेल्या त्यामुळें घरगुती राहणी वरील प्रकारच्या चढाओढीनें सुधारण्याची शक्यता आजपर्यंत तरी मुळींच नव्हती
रेल्वे रचनेंतील दोष. - हिंदु संस्कृतीचें केंद्र असें एक मध्यवर्ती शहर हिंदुस्थानांत नाहीं, याचें कारण हल्लींची आगगाडीच्या रस्त्यांची योजनाच चुकीची आहे. हल्लींचें रस्ते हिंदुस्थानांतल्या कोणत्याहि एका शहराला येऊन मिळत नसून ते निरनिराळ्या बंदराकडे जाणारे आहेत या योजनेचा मृख्य उद्देश हिंदुस्थानच्या निरनिराळ्या भागांचा लंडनशीं संबंध जोडणें हा आहे हें कोणाच्याहि सहज लक्षांत येण्यासारखें आहे. याकरतां या रस्त्यांची पुन्हां नीट मांडणी करून सव प्राताच्या परस्पर दळणवळणाची व एका मध्यवर्ती शहराशीं सर्वांचा संबंध येईल अशी सोय करणें जरूर आहे. या योगानें सर्व प्रांतांत समान पध्दतीची राहणी चालू होण्यास चांगली मदत होईल. अद्याप हिंदुस्थानांत अशा अनेक जाती आहेत कीं, त्यांत सुधारणेंनें बिलकुल प्रवेश केलेला नाहीं, व त्या अगदी मागसलेल्या स्थितींत व सुधारलेल्या समाजापासून अलग राहत आहेत. रेल्वचा फैलाव पुष्कळ झाल्यानें त्यांच्या सुधारणेस मदत होण्यासारखी आहे. तसेंच निरनिराळ्या प्रांतातील राहणी उच्च असली तरी ती भिन्न भिन्न आहे. त्याऐवजीं एक प्रकारची राहणी सर्वत्र पसरण्यास, नवी राजधानी दिल्ली या शहराशीं सर्व प्रांताचा रेल्वेसंबंध वाढत गेल्यानें बरीच मदत होण्यासारखी आहे.
विवाह पध्दतीचे आर्थिक परिणाम. - हिंदुस्थानची आर्थिक सुधारणा होण्याच्या मार्गांत आणखी एक अडचण आहे ती पडदापध्दती व प्रचलित विवाहपध्दति याची. निरनिराळ्या प्रांतांतील स्त्रीपुरूषप्रमाणाविषयीचें आकडे पाहिल्यास असें दिसून येतें कीं, कांहीं प्रातांत स्त्रियांची संख्या अधिक, तर इतरांत पुरूषाची अधिक. कांहीं जातींत विधवांची व वृध्द-तरूणी जोडप्याचीं संख्या पुष्कळ तर दुसर्या कांहीं बळकट, तरूण पण अविवाहित पुरूषांची अशा संख्या अधिक. अशा प्रकारची स्थिति लोकसंख्येच्या वाढीला हितावह नाहीं. तसेंच विवाहसंबंध जुळवून आणण्यांत आईबाप व इतर नातलग यांचें अंग जितकें अधिक व प्रत्यक्ष वरवधूंचा संबंध जितका कमी तितक्या मानानें त्या समाजाच्या गरजा कमीच राहावयाच्या. उलट जेथें प्रीतिविवाहाची चाल प्रचलित आहे तेथें उच्च दर्जाची राहणी प्रचारांत येण्यास फार मदत होते. याचें कारण उघडच आहे. ज्या समाजांत विवाहसंबंध जुळविण्यांत स्वत: तरूणतरूणी भाग घेतात. तेथें उभयपक्षीं पोशाख व नीटनेटकेपणा याबद्दल फारच काळजी घेतली जाते. स्त्रीजनाला संतुष्ट करण्याकरतां पुरूषवर्ग बराचसा खर्च करण्यास उत्सुक असतो. चांगलीचांगलीं पुस्तकें व चित्रें खरेदी करून ती वधूला समर्पण करावी लागतात. उलटपक्षीं पुरूषांच्या आवडीच्या होण्याकरतां स्त्रियांनाहि स्वत:मध्यें अधिकाधिक गुण आणावे लागतात. यामुळें शिक्षण वाढून सुधारणा होते, राहणी उच्च दर्जाची होत जाते. व त्याबरोबर पुरूष व स्त्री दोन्ही वर्गांचीं अर्थोंत्पादक शक्ति वाढणें जरूरीचें होतें.
स्त्री पुरूष मिश्र व्यवहार व पडदा पध्दतीचे परिणाम - तंसेंच समाजांत स्त्रीपुरूषांचा मिश्र व्यवहार चालू असण्यानेहि समाजाच्या आर्थिक उन्नतीस फार मदत होतें. उदाहरणार्थ, उपहारगृहांत स्त्रीपुरूषांनीं बरोबर जाण्याची पध्दत असल्यास, रस्त्यावरील उघड्या जागेंतल्या अस्ताव्यस्त गृहांत लोक केव्हांहि शिरणार नाहींत, बरोबर असलेल्या स्त्रीस बसण्यास योग्य अशा व्यवस्थित उपहारगृहांतच पुरूष जाईल. पुण्यामुंबईंतल्या व लंडनमधल्या हॉटेलांची तुलना केंल्यास वरील विवेचनांतलें मर्म लक्षांत यईल. इतकेंच नव्हें तर समाजांत स्त्रिया सार्वजनिकपणें वावरूं लागल्यानें समाजाच्या चालीरीतींना चांगलें, शिष्टसंमत असें वळण आपोआप लागतें. पुरूषांच्या वागणुकींतील अश्लील, बीभत्स प्रकार बंद होतात, निदान त्यांना पुष्कळ आळा पडतो. परंतु अशा प्रकारच्या स्त्रीपुरूषमिश्र व्यवहाराला पडदापध्दतीची व प्रचलित विवाहपध्दतीची मोठी अडचण आहे. शिवाय ज्या प्रांतांत पडदापध्दति आहे तेथील स्त्रियांनां इतर प्रांतांतील स्त्रियांप्रमाणें साध्या, सोप्या धंद्यांतहि भाग घ्यावयास सांपडत नाहीं. त्यामुळें पुण्यामुंबईतल्याप्रमाणें कलकत्ता वगैर उत्तर हिंदुस्थानातल्या शहरांत स्त्रियांच्या ऐवजीं पुरूषांचा भरणा अधिक दृष्टीस पडतो. कलकत्त्यास लोकसंख्येंत १०० पुरूषांस ३२ स्त्रिया असें प्रमाण पडतें. आणि एकंदर हिंदुस्थानांतील शहरांत घरगुती कामासारखे सामान्यत:सोपे धंदेहि पुरूषांनीं करण्याचीच पध्दति असल्यामुळें सर्व शहरांत पुरूषांचे प्रमाण स्त्रियांपेक्षां बरेंच अधिक असतें. उलटपक्षीं इंग्लंडांतील शहरांत पुरूषांपेक्षा स्त्रियांची संख्या बरीच अधिक असलेली आढळते.
शिवाय हिंदुस्थानांतील शहरांत उद्योगधंद्याकरतां जाणारे तरूण लोक विवाहित असूनहि मुंबईकलकत्तादि शहरांत बिर्हाडानें राहण्याच्या इमारती इतक्या महाग व गैरसोयीच्या असतात कीं, त्यांत सहकुंटुंब जाऊन राहणें त्यांनां पत्करत नाहीं. न्यूयॉर्क, लंडन, पॅरिस येथील गरीबगुरीबांच्या राहण्याच्या सोयी इकडच्या मानानें स्वर्गतुल्य आहेतं. येथील शहरांतल्या उपरिनिर्दिष्ट पुरूषसंख्याधिक्यामुळें नैतिक दृष्ट्या परिणाम भयंकर होतात. एकट्या कलकत्त्यांत वेश्यांची संख्या पन्नास ते शंभर हजारांपर्यंत आहे. शिवाय पानपट्टी, विडी, सिगारेट वगैरे विकणार्या स्त्रियाहि अप्रसिध्द शरीरविक्रयाचा धंदा करीत
असतातच. तात्पर्य, नुसत्या पडदापद्धतीमळें लहान सोपे धंदे करण्यासहि स्त्रियांस अडचण, हलकी व राहणी, व व्यसनांत पैशाची उधळपट्टी वगैरे तोटे होत आहेत. जातिभेदामुळें मोठ्या प्रमाणावर पदार्थांची निपज होण्यास अडथळा येतो; हलक्या जातींतल्या श्रीमंत लोकांची राहणी उच्च होऊं शकत नाहीं, व त्यामुळें दारूबाजीसारख्या व्यसनांत त्यांची द्रव्यहानि व शरीरहानि होते. शिवाय जातींचे धंदे ठरलेलें असल्यामुळें परजातीच्या माणसास धंदेशिक्षण मिळूं शकत नाहीं. धंद्यामध्यें आपआपल्या जातीच्या इसमासच मदत करण्याची प्रवृत्ति असते. येणेंप्रमाणें हिंदुसमाजाच्या विशिष्ट सामाजिक बाबींचा येथील आर्थिक स्थितीवर फार घातक परिणाम होत असल्यामुळें सदरहू बाबी लक्षांत घेउनच आर्थिक उन्नतीचे उपाय सुचविले पाहिजेत.
हिंदी अर्थशास्त्र व हिंदी मन. - मनाच्या प्रेरणेप्रमाणें व्यक्तीच्या हातून कृत्यें होत असतात. त्याचप्रमाणें समाजाच्या भावनांप्रमाणें देशांतील लोकांच्या हातून कृत्यें होत असतात. म्हणून लोकांचे विचार, भावना, इंद्रियवासना व बौध्दिक परंपरा या सर्वांचा समाजाच्या आर्थिक स्थितीवर फार परिणाम होत असतो. स्वतंत्र देशांत म्हणजे जेथें राज्यकर्ते व प्रजाजन एकाच भावनेचे व परंपरेचे असतात तेथें सदरहू विवेचनाची विशेष आवश्यकता नसते. परंतु परतंत्र असलेल्या हिंदुस्थानांत परक्या परंपरेच्या व संस्कृतीच्या लोकांच्या हातीं राज्यकारभार असल्यामुळें व त्यांचें आर्थिक उन्नतीचे आजपर्यंतचे प्रयत्न निष्फळ झाल्याचें सिध्द झालें असल्यामुळें समाजाच्या आर्थिक स्थितीवर लोकांतील ज्या भावनांचे व परंपरेचे परिणाम होत आहेत त्यांचें हिंदी अर्थशास्त्रांत विवेचन करणें अत्यंत जरूर आहे.
आर्थिक उन्न तीस विघातक अशा भावनांचें वर्गीकरण. - जगांतील सर्व मानवजातींच्या सामान्य मन:स्थितीच्या बाबतींत साम्य असलें तरी देशकालपरत्त्वें विशिष्ट समाजांत विशिष्ट भावना उत्पन्न होत असतात. यांपैकीं कांहीं सामाजिक व राजकीय परिस्थितीमुळें आणि कांहीं बौध्दिक परंपरेमुळें उत्पन्न होतात. आपल्या हिंदु समाजांत जातिभेद असल्यामुळें व चातुर्वण्यव्यवस्थेचें ध्येय असल्यामुळें उद्योगधंद्यासंबंधानें लोकांनां शिक्षण मिळत आलेलें आहे त्यामुळें त्या त्या वर्णोच्या व जातींच्या मनांत विशिष्ट भावना दृढमूल होऊन बसल्या आहेत. एकेकाळच्या तत्त्ववेत्त्यांनीं समाजधारणासुधारणेला अत्यंत योग्य व आवश्यक वाटून स्तुति केलेल्या चातुर्वर्ण्यविषयक ज्या भावना उत्पन्न झाल्या त्या अध्याप ती चातुर्वर्ण्गावस्था बहुतेक विस्कळित झालेली असली तरी, लोकांच्या मनांतून नाहींशा झालेल्या नाहींत म्हणून जेव्हां समाजव्यवस्थेला नवें व निराळें स्वरूप द्यावयाचें असेल तेव्हां प्रथम या जुन्या भावनांचा व नैतिक कल्पनांचा आणि नव्या कल्पनांचा खटका उडणारच. आर्थिक परिस्थितीशीं संलग्न असलेल्या जुन्या भावनांचें वर्गीकरण पुढील प्रमाणें करतां येईल:-
( १ ) ज्या भावनांमुळें निवृत्ति, संन्यास, उर्फ कर्मत्यागाची बुध्दि उत्पन्न होते व बळावते त्या भावाना.
( २ ) ज्या भावानांमुळें नैष्कर्म्यबुध्दीचें समर्थन होत नसलें तरी अर्थोंत्पादनेतर क्रिया करण्याकडे लोकांची प्रवृत्ति होते त्या भावना
( ३ ) ज्या भावना सामाजिक व आर्थिक व्यवस्थेला धरून असल्या तरी नव्य सामाजिक व आर्थिक ध्येयांनां पोषक नाहींत त्या.
( ४ ) नव्या ध्येयांनां उत्तेजक नाहींत आणि विरोधकहि नाहींत पण ज्या सांप्रतच्या अर्थांत्पादन व व्यय यांच्या मार्गांनां विशिष्ट स्वरूप देत आहेत त्या भावना;
( ५ ) आणि प्रत्यक्ष भावनांव्यतिरिक्त ज्या गोष्टी अशा आहेत कीं, त्यांची योग्य दिशेनें सुधारणा केल्यास त्या नूतन आर्थिक ध्येयांनां परिपोषक होतील त्या गोष्टी.
आतां वरील कलमांचा क्रमश:विचार करूं
हिंदूंतील दैव वादाचे परिणाम. - आज समाजामध्यें ऐहिक व आर्थिक उन्नतीसंबंधानें शैथिल्य उत्पन्न करणार्या ज्या भावना व कल्पना हिंदु समाजाच्या हाडी मासीं खिळलेल्या आहेत त्या कोणत्याहि विचारी हिंदु माणसाच्या लक्षांत आल्यावांचून राहणार नाहींत;इतकेंच नव्हें तर असा विचारी माणूसहि स्वत:एकदां वरील शैथिल्य स्थिति अनुभवलेलाच असतो. स्वत:ची ऐहिक स्थिति सुधाण्याकडे दुर्लक्ष्य करण्याची बुध्दि उत्पन्न करणारीं अनेक कारणें आहेत. त्यापैकीं कांहीं दैववादामुळें व कांहीं कलियुग व कल्पांत यांच्या कल्पनांमुळें उत्पन्न झालेलीं आहेत. या अनंत कालांतील अनंत, अतर्क्य व मानवशक्तीच्या आटोक्याबाहेरच्या अशा अवाढव्य घडामोडी या विश्वांत चालत असलेल्या पाहून मनुष्याच्या मनांत एक प्रकाची निराशा उत्पन्न होत असते, व सर्व मानवी प्रयत्न व्यर्थ आहेत असें वाटूं लागतें, सर्व गोष्टी नैसर्गिक किंवा परमेश्वरी नियमांच्या आधीन आहेत अशी त्याची ठाम समजूत होऊन बसते, आणि समाज किंवा जग सुधारण्याचे सर्व प्रयत्न तो सोडून देतो. अशा प्रकारचा दैव वाद हिंदु समाजांत फार पसरलेला आहे. याचा परिणाम हिंदूच्या आर्थिक स्थितीवर किती होत असतो याची कल्पना यूरोपीय लोकांस येणार नाहीं. वरील प्रकारच्या दैववादी इसमास, तुझें तुझ्या समाजासंबंधानें कर्तव्य काय, असें विचारल्यास, ‘कांहीं नाहीं,’ असें तो उत्तर देणार ! शेवटीं सर्व सचेतन व अचेतन विश्व, ब्रह्मांत विलीन होणार आहे व म्हणून स्वत:हि शक्य तितक्या लवकर मोक्ष गांठणें, हें तो आपलें कर्तव्य समजत असतो. हिंदुसमाजांत पसरलेली ही बुद्भि नष्ट करणें हें काम फार कठीण आहे, आणि त्या संबंधानें प्रयत्न झालेले आहेत. कित्येक म्हणतात, मोक्ष मिळवावयाचा तरी त्याला दोन मार्ग आहेत, एक प्रवृत्तिपर ( कर्मयोग ) व दुसरा निवृत्तिपर ( संन्यास ). भगवदगीतेचा उद्देश मनुष्यांनां प्रवृत्तिपर किंवा कर्मयोगी बनविण्याचा आहे. मोक्षावर दृध विश्वास असणार्या लोकांनां कार्यप्रवृत्त करण्यास वरील भगवदगीतेचा उपदेश चांगला आहे यांत शंका नाहीं. पण तेवढ्यानें भागत नाहीं. कारण अलीकडे असाहि एक वर्ग आपल्या समाजांत उत्पन्न झालेला आहे कीं, त्याचा मोक्षावर विश्वास नाहीं, पण जो दैववादी आहे अशा वर्गास कार्यप्रवृत्त करण्यास त्याच्यापुढें एकादें मोठें राजकीय व सामाजिक ध्येय ठेविलें पाहिजे, व तें ध्येय उपदेशिणारे समाजशास्त्रवेत्ते निर्माम होणें जरूर आहे.
समाजाची आर्थिक स्थिति सुधारल्यास त्याची नीतिमत्ताहि सुधारते. दारिद्र्यग्रस्त मनुष्य व समाज दुर्गुणी व दुर्वर्तनी असतो. उलट सुस्थितीतल्या समाजांत लवकरच चांगले आचार विचार सुरूं होतात. संपन्न व विपन्न स्थितींतल्या दोन समाजांतील नीतिमत्तेची तुलना करून दाखविल्यास पक्का दैववादी विद्वानहि कार्यप्रवृत्त होण्याचा फार संभव आहे.
कलियुगाची कल्पना व तिचे परिणाम. - हिंदु लोकांस निराशावादी व कार्यनिवृत्त करणारी दुसरी गोष्ट म्हणजे कलियुगाची कल्पना. आमच्यांतील जुन्या लोकांची अशी कल्पना आहे की, आजकाल हिंदुसमाजांत ज्या वाईट गोष्टी दिसून येतात त्या सर्व कलियुगाचे परिणाम आहेत. भविष्यपुराण नामक ग्रंथांत पूर्वींच्या पंडितांनीं असें भविष्य लिहून ठेविलें आहे कीं, चालू असलेल्या कलियुगांत अनीति, व अनर्थोंत्पात्ति वाढतच जाणार व अखेर कलियुगांतीं सर्व जग बुडणार ! अर्थांत् हिंदु समाजांतील प्रस्तुतचीं व्यंगें व दु:खे ईश्वरीसंकेतानेंच उत्पन्न केलेलीं आहेत ! तर तीं नाहींशीं करणें शक्य नाहीं. अशा प्रकारच्या कल्पना नाहींशा करणें हें समाजसुधारकांचें कर्तव्य आहे, अर्थशास्त्रज्ञांचें नव्हें.
स्वर्ग मोक्ष प्राप्तीची कल्पना व तिचे परिणाम.- स्वर्गप्राप्ति किंवा जन्ममरणमुक्ति अशा प्रकारच्या पारमार्थिक ध्येयामुळें हिंदूसमाज सर्वस्वी कार्यनिवृत्त बनलेला नसला तरी त्यांतील बराचसा सुशिक्षित वर्ग स्वर्गमोक्ष दायक वृत्ताचरण, तीर्थयात्रा, तपाचरण वगैरेंवर विश्वास ठेवणारा या कल्पनांचा आहे अर्थशास्त्राच्या दृष्टीनें घातक परिणामच होत असतो. हे लोक कार्यनिवृत्त नसले तरी ऐहिक स्थिती सुधारण्याकडे किंवा अर्थोप्तादक करण्याकडे यांचे फारसें लक्ष नसतें. स्वर्ग किंवा मोक्ष मिळविण्याची कल्पना बलवत्तर झाल्यामुळें पुष्कळ चांगले बुध्दिमान व सुविचारी लोकहि देशाची आर्थिक उन्नति करण्याच्या कामीं पूर्ण निरूपयोगी असे होऊन बसले आहेत. याच लोकांनीं आपल्या पुढें एखादें राजकीय किंवा सामाजिक ध्येय ठेवल्यास त्यांचा देशसुधारणेच्या कामीं उत्तम उपयोग होण्यासारखा आहे. केवळ अर्थोप्तादन व अर्थसंचय असलें प्रत्यक्ष आर्थिक ध्येय त्यांच्यापुढें नसलें तरीहि चालेल. त्यांनीं समाजसुधारणेचा आस्थापूर्वक कोणताहि उद्योग केला तरी तो अप्रत्यक्षपणें समाजाच्या आर्थिक उन्नतीस पोषकच होणार आहे. लोकांच्या गरजांमध्यें मानसिक गरजांचें प्रमाण मोठें आहे. कलावृध्दि व ज्ञानवृध्दि म्हणजे मानसिक गरजांची प्रगति होय. या गरजांच्या प्रगतीमध्यें कांहीं अनिष्ट अंश आहे काय हें मधून मधून पाहिलें पाहिजे. हिंदूच्या सौंर्दयाविषयीच्या असलेल्या जुन्या कल्पना इंग्रज वगैरे परकी लोकांहून थोड्याशा निराळ्या होत्या. अलीकडे चित्रकला, संगींत, वाद्यें वगैरे बाबतींत परकीयांच्या परिचयामुळें आपल्या आवडीनावडी बदलत आहेत. आपल्याच जुन्या गोष्टींत सुधारणा करणें निराळें, व केवळ परकीयांच्या गोष्टी ग्रहण करणें निराळें. उदाहरणार्थ, तबला, तंबोरा, सतार वगैरे हिंदी वाद्यांतच सुधारणा करणें, व उलट पियानो वगैरे परकीय वाद्यें प्रचारांत आणणें यांत आर्थिक दृष्टया अत्यंत मोठा फरक आहे. हिंदी वाद्यांऐवजीं परकी वाद्यें पसरू लागल्यास आपला कारागीर वर्ग नष्ट होऊन परदेशच्या धंदेवाल्यास आश्रय मिळणार. म्हणून कलांचे बाबतींत परकीयांचीं अभिरूचि हिंदूंनीं स्वीकारल्यास आर्थिक हानि होणारी आहे. तथापि हेंहि लक्षांत ठेविलें पाहिजे कीं, आपल्या कारागिरांच्या नालायखीमुळें त्याचा आश्रय जाईल म्हणून मागासलेल्या वस्तूंचाच स्वीकार समाजानें चालू ठेवणें समाजाच्या हिताचें नाहीं. कारण तशानें नव्या गरचा पुरविणारा वर्ग तयार व्हावयाचा काल दूर जातो परक्या वाङ्मयाची गोडी लागल्यानें देशी कारागिरीवर अनिष्ट परिणाम तितका होत नाहीं; कारण परदेशी पुस्तकें परकी भाषा जाणणारें लोकच फक्त विकत घेणार; सर्वजनसमाज घेणार नाहीं. वाङ्मयांचे बाबतींत सुध्दां स्वभाषा व स्वकीय वाङ्मय यांचा अभिमान नष्ट होतां कामा नये; उलट परकीय वाङ्मयाच्या अभ्यासानें स्वत:च्या वाङ्मयांत भर पडली पाहिजे. या दृष्टीनें पाहतां इंग्रजी भाषेच्या अभ्यासानें आपला फायदाच झालेला आहे असें दिसून येईल. ब्रिटिश अमलाखालीं हिंदुस्थानांत जो शिक्षणप्रसार झालेला आहे त्यामुळें आपला सर्व जगाशीं बौध्दिक संबंध जोडला जाऊन आपली समाजाविषयीची कल्पना विस्तृत झालेली आहे. शिवाय मराठी वगैरे हिंदुस्थानांतील सर्व वाङ्मयांत विचार व कल्पना फार वाढल्या असून पूर्वीपेक्षां इतिहास, काव्य, नाटकें, कादंबर्या तसेंच प्रत्यक्ष नाट्यप्रयोग वगैरे वाङ्मयांमध्यें सर्वं अंगांत आपली आवड वाढत आहे. खुद्द जुन्या संस्कृत वाङ्मयाचा अभ्यास सुध्दां अधिक जोरात सुरू झालेला आहे देशाभिमानाची कल्पना जागृत झाल्यामुळें तिला उत्तेजक असें गद्य व पद्य ग्रंथ निर्माण होत आहेत.
शिक्षक व वाङ्मयाभि रूचीचा परिणाम. - लोकांत शिक्षण व वाङ्मयांभिरूचि वाढल्यानें सामाजिक व आर्थिक परिणाम कसे होतात ते पहा. शिक्षणानें लोकाची बुध्दि तीव्र होऊन अर्थोत्पादन व व्यय दोन्ही वाढत जातात त्यांची राहणी उच्च होत जाते. पुस्तकें व वर्तमानपत्रें यांचा सुशिक्षित मनुष्य ग्राहक बनतो, त्यामुळे त्यांची निष्पति व विक्रि या धंद्यांची फार वाढ होते; इतकेंच नव्हेतर हरएक प्रकारच्या जाहिराती वाचण्यांत आल्यामुळें मनुष्य खेडेगांवांत राहत असला तरी नव्यानव्या जिनसा तो खरेदी करतो. जर्मनींत व अमेरिकेंत सुशिक्षित शेतकरी स्वत:उत्पन्न केलेले पदार्थ दलाल वगैरे मध्यस्थावांचून पोस्टानें शहरांतील गिर्हाइकांकडे पाठवीत असतात. शिवाय सुशिक्षित मनुष्य पावत्या, खतें वगैरे बाबतींत फसला जाण्याचा संभव नसतो सुशिक्षित शेतकर्यांची व्यवहारांत पतहि अधिक असते. शिक्षणाचा परिणाम स्वभावावर व नैतिक आचरणावर होऊन मनुष्याचा भित्रेपणा व संशयीवृत्ति कमी होत जाते व या नैतिक फरकाचा एकंदर समाजाच्या सामाजिक व राजकीय व्यवहारावर फार परिणाम होतो. त्यांपैकीं विशेषत: राजकीय परिणामांकडे आतां वळूं.
हिंदी राजकीय स्थितीसंबंधाची अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंदुस्थानचें पारतंत्र्य होय. नव्या झालेल्या राजकीय सुधारणांनीं सुध्दां स्वत:च्या देशाचें भवितव्य ठरविण्याची खरी सत्ता हिंदी लोकाच्या हातांत फारशी आलेली नाहीं. प्रजेच्या इच्छा व आकांक्षा समजून घेतां याव्या म्हणून इंग्रज राज्यकर्त्यांनीं हिंदी लोकांत इंग्रजी भाषा जांणणारा असा एक वर्ग तयार करून आपल्या हाताशीं घेतला; पण या वर्गांचें वजन अधिकारी वर्गावर फारसें पडलें नाहीं, व खरी लोकमतानुवतीं राज्यपध्दति अद्यापहि स्थापन झाली नाहीं. राजकीय परावलंबनाचा आर्थिक स्थितीवर अत्यंत मोठा परिणाम होत आहे. तथापि अशा परकी सरकारनेंहि आर्थिक व राजकीय स्थिति सुधारण्यांसंबंधाची मागणी प्रत्येक वेळीं फेंटाळूनच लावली असें मात्र नाहीं. उलट आपल्या हातीं सत्ता आल्यास आपण काय सुधारणा करणार, याबद्दल नक्की कार्यक्रम हिंदी पुढार्यांजवळ फारसा तयार नसे. आज प्रांतिक व वरिष्ठ कायदेकौंसिलांतील सभासदांजवळ सुध्दां देशसुधारणेच्या योजना असाव्या तितक्या तयार नाहींत. शिवाय आज इंग्रज अधिकारीवर्ग स्वत:चें हित साधण्याकरतां हिंदुस्थानचें हित बुडविण्यास जसा तयार असतो तसा हिंदी अधिकारी वर्ग सुध्दा स्वार्थाकरतां लोकांच्या हितावर पाणी सोडण्यास मागेंपुढें पाहीलसें वाटत नाहीं. आणि दारूटी बंदी करण्यास सरकारी उत्पन्न कमी होईल या भीतीमुळें सांप्रतचे हिंदी दिवाणसुध्दा विरूध्द जाण्याच्या संभव आहे. तात्पर्य, आजपर्यंतच्या देशातील दु:स्थितीचें खापर सर्वस्वी इंग्रज सरकारच्या माथ्यावर फोडणें वाजवी होणार नाहीं;किंवा दारूचें व्यसन वगैरे युक्त्यांनीं हिंदुस्थानचा नाश करण्यांत इंग्रज अधिकारी वर्गाला आनंद आहे, असें मानणें चुकीचें आहे.
उलटपक्षीं. हें खरें आहे कीं, ब्रिटिश वसाहतींना संपूर्ण स्वराज्याचे हक्क देऊन हिंदुस्थानला मात्र कायम परतंत्रच ठेवावयाचें, असें चुकीचें धोरण ब्रिटिश मुत्सद्यांनीं बरेंच काल ठेविलें होतें. हिदुस्थानचें एक राष्ट्र बनून तें इंग्लंडला मदत करण्याइतकें समर्थ होऊं शकेल, हें त्यांनां शक्य वाटत नसे; व म्हणून हिंदी लोकांत एकी उत्पन्न करून त्यांची उन्नति करण्याचा मनापासून प्रयत्न ते करीत नसत. शिवाय हिंदी राष्ट्र एक व प्रबल झाल्यास तें ब्रिटिश अम्मल तत्काल झुगारून देईल अशीहि भीति त्यांस वाटे. तथापि आतां वरील सर्व धोरण पालटून हिंदुस्थानला स्वराज्य देण्याचें व त्याला ब्रिटिश साम्राज्यव्यवस्थेंत एक समान हक्काचा भागीदार बनविण्याचें धोरण जाहीरपणें स्वीकारण्यांत आलें आहे.
हें राजकीय धोरणासंबंधानें उभयपक्षी विवेचन करण्याचे कारण हेंच कीं, परकी ब्रिटिश अंमलाचे गुणदोष यथार्थ लक्षांत यावे व सरकाराबद्दल विनाकारण अविश्वास किंवा गैरसमज राहूं नये. आतां ब्रिटिश अंमलाचे आर्थिक दृष्टया नफे तोटे काय आहेत ते क्रमानें पाहूं.
ब्रिटिश अंसलापासून झालेला पहिला फायदा म्हणजे शांतता हा होय. गेल्या शंभर वर्षांत देशांतील सर्व लोकांस जो शांततेचा लाभ झाला आहे तसा पूर्वी कित्येक शतकांत कधींच झाला नव्हता. त्यामुळें प्रस्तुत सरकारची पतहि फार वाढलेली आहे. खुद्द मराठ्यांचें स्वराज्य होतें तेव्हांहि सरकारी कर्जावर व्याजाचा दर बराच मोठा म्हणजे शेकडा १४ ते १८ रूपयेपर्यंत असे; फार क्वचित १९ | २० रूपये असे. हल्लीं देशांत शांतता व सुव्यवस्था असल्यामुळें परदेशांतले धनिक लोकहि हिंदुस्थानांत आपलें भांडवल गुंतविण्यास कचरत नाहींत. उदाहरणार्थ, येथील बहुतेक रेल्वे कंपन्या परकीयांच्या भांडवलानेंच चालल्या आहेत. यामुळें या देशाचा मोठा तोटाहि होत आहे, त्याचा विचार पुढें करूं
आतां ब्रिटिश अंमलामुळें होणार्या तोट्यांचा विचार करूं. या तोट्यांची वर्गवारी पुढीलप्रमाणें करतां येईल.
( १ ) हिंदुस्थानचा बराच पैसा इंग्लंडमध्यें खर्च होत असतो.
( २ ) ब्रिटिश सरकार हें परकी सरकार असल्यामुळें या देशांतील कोणत्याहि सामाजिक सुधारणा करण्याचें काम हातीं घेत नाहीं व सामाजिक स्थितीचा आर्थिक स्थितीवर परिणाम होत असल्याकारणानें सामाजिक सुधारणांच्या बाबतींतील सरकारच्या तटस्थवृत्तीमुळें देशाचा तोटाच होत आहे.
( ३ ) ब्रिटिश सरकारचें राज्य चालू झाल्यावर जें राजकीय धोरण स्वीकारण्यांत आलें, तदनुसार आर्थिक धोरण ठरविलें गेलें व तें देशाच्या खर्या हितास विघातक झालें आहे.
( ४ ) इंग्रजी भाषा वगैरे अनेक इंग्रजांच्या गोष्टी आपणांवर लादल्या गेल्यामुळें अनेक तोटे होत आहेत.
हिंदुस्थानचा पैसा इंग्लंडांत खर्च होतो त्याचा तपशील येणेंप्रमाणें देतां येईल. ( १ ) इंडिया कौन्सिलच्या सभासदांचा व इंडियाआफीसच्या लोकांचा पगार, ( २ ) विलायतेंत हिंदुस्थान सरकारनें काढलेल्या कर्जावरील व्याज, हें सर्वच सुधारणेसाठीं काढलेल्या रकमेवर नाहीं तर हिंदुस्थान जिंकण्याच्या खर्चावर, आणि साम्राज्याच्या फायद्यासाठीं हिंदुस्थानला युध्दांच खर्च आले तेहि त्यांत आहेत. ( ३ ) हिंदुस्थानसरकारकरतां सरकारी ऑफिसांना वगैरे लागणारे जिन्नस स्टेट सेके्टरी विलायतेंतून खरेदी करून पाठवितो त्यांची किंमत ( ४ ) विलायतेंत रजेवर असलेल्या इंग्रज अधिकार्यांचा पगार व ( ५ ) नोकरीची मदत संपून इंग्लंडमध्यें परत गेलेल्या इंग्रज मुलकी व लष्करी अधिकार्याच्या पेन्शनांकरतां खर्च होणारी रक्कम यांचा समावेश होतो. हा खर्च सुमारें २४ कोट रूपये आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे सिव्हिल सर्विसच्या किंवा बॅरिस्टरीच्या परिक्षेकरितां इंग्लंडांत राहणार्या हिंदी विद्यार्थ्यांकरतां इंग्लंडांत होणार, खर्च, या खर्चाकरतां हिंदुस्थानचे दरसाल सुमारें तीस लाख रूपये विलायतेंत जात असतात. शिवाय ब्रिटिश साम्राज्य सरकारचा देश म्हणून इंग्लंडला फार महत्त्व असल्यामुळें अनेक हिंदी संस्थानिक इंग्लंडांत जाऊन बराच काल राहतात. त्यांचा तेथें होणारा खर्च हिंदुस्थानांतील पैशानेंच चालत असतो व हीं रक्कम फार मोठी आहे. “हिंदकी कमाई लंडनमे गमाई” हें वाक्य सर्वांस परिचित आहेच. शिवाय इंग्लंजमध्यें राहिल्यानें तिकडचे पदार्थ वापरण्याची त्यांनां संवय लागते व अशा रीतीनें जरूरीच्या व चैनीच्या अनेक विलायती जिनसा विकत घेण्याकरतां हे संस्थानिक विलायतेंत पैसा धाडीत असतात. इतकेंच काय पण या संस्थानिकांचे बंगले, राजवाडे बाधण्यास सुध्दां विलायतेंतील इंजिनियर लागतात. या प्रमाणें संस्थानिकांच्या मार्फत हिंदुस्थानांतला पुष्कळ पैसा विलायतेत जात आहे.
तिसरी गोष्ट वरिष्ट साम्राज्याचें कोर्ट उर्फ प्रीव्हीं कौल्सिल. हें विलायतेंत असून तेथें हिंदी लोकांनां अपीलें करावीं लागत असल्यामुळें या कोर्टोतील दाव्याकरतां म्हणून व इंग्लंडांतील बॅरिस्टर व सॉलिसिटर यांच्या फीचा म्हणून पक्षकारांमार्फत हिंदुस्थानचा कितीतरी पैसा दरसाल विलायतेंत जातो. हा सर्व पैसा ब्रिटिशांचा म्हणजे परकीयांचा अंमल येथें असल्यामुळें विलायतेंत जात आहे, म्हणजे हल्लींच्या राजकीय स्थितीचा हा आर्थिक स्थितीवर फार मोठा परिणाम होत आहे.
ब्रिटिश राज्यकर्ते परकी म्हणून सामाजिक बाबतींत हात घालूं इच्छित नाहींत व दुसर्या पक्षीं हिंदीं लोकांच्या हातांत सामाजिक सुधारणा करण्याचा अधिकार नाहीं. ब्रिटिश सरकारला स्वत:च्या वजनानें सामाजिक बाबीसंबंधानें कायदे करण्यास लावील असा वजनदार हिंदी पुढार्यांचा वर्ग नव्या कौन्सिलांमुळें निर्माण झालेला आहे व तो कायदे करून कांहीं सामाजिक सुधारणा घडवून आणील, परंतु सर्व समाजिक सुधारणा कायद्यानें होऊं शकत नाहींत. सर्व राष्ट्रांत अनुकरण परिणामकारीहि होतें. पण त्याकरितां समाजांत मान असलेला असा वर्ग लागत असतो. हिंदीसंस्थानिक हा अशा तर्हेचा एक वर्ग असून तो सामाजिक सुधारणेला उपयोगी पडण्यासारखा आहे. परकी राज्यकर्त्यांना असले वजन हिंदी समाजांत मिळणें शक्य नाहीं. बंगाल्यात आज दिडशें वर्षें ब्रिटिश अम्मल चालू आहे; तरीहि तिकडे पडदापध्दति पूर्ववत् कायम आहे. पण ब्रिटिशाऐवजीं जर तेथें मराठ्याच्या अम्मल असता तर त्यांच्या सहवासानें बंगाली लोकाच्या चालीरीतींत खात्रीनें पुष्कळ फरक पडला असता.
विशिष्ट राजकीय धोरणामुळें आर्थिक परिणाम कसे होत असतात तें पाहूं. रेल्वेचें उदाहरण घेतल्यास त्याची सर्व मांडणी हिंदुस्थानांतील प्रमुख बंदराचा म्हणजे मुंबई, मद्रास, कलकत्ता, कराची, रंगून याचा लंडनशीं संबंध जोडण्याच्या दृष्टीनें केलेली आहे, हें पूर्वी सांगितलेंच आहे. हें राजकीय धोरण हिंदुस्थानाला विघातक झालेलें असल्यामुळें तें सोडून देण्याचें सरकारनें आता कबूलहि केलें आहे. तथापि पूर्वीच्या धोरणाचे तोटे अद्याप सोसावे लागत आहेत. निरनिराळ्या प्रांताच्या व्यापारी दळणवळणास रल्वे उपयोगी पडत नाहींत. यामुळें एका प्रांतातील माल दुसर्या प्रातांत नेणें दुरापास्त होते. उलट इंग्लंडातून माल मागविणेंच सोयीचें पडतें, त्यामुळें परदेशी माल फार येत आहे. रेल्वेनीं दळणवळण वाढल्यास प्राताप्रातामध्यें मालाची निपज करण्याच्या बाबतींत चढाओढ सुरू होऊन औद्योगिक उन्नतीस मदत होईल. पण तें आज शक्य नाहीं. शिवाय निरनिराळ्या प्रांतातील लोकाच्या आवडनिवडींत व सामाजिक चालीरीतींत सारखेपणा उत्पन्न होऊन हिंदुस्थानच्या एकराष्ट्रीकरणास मदत होईल.
हिंदुस्थान हा जित देश आहे व केवळ इंग्लंडच्या फायद्याकरितां आहे, हें धोरण आजपर्येंत चालत आलें होतें. त्यामुळें हिंदुस्थानची खरी सुधारणा करण्याकडे ब्रिटिश मुत्सद्दयांचें लक्ष नव्हतें. हिंदुस्थान यावच्चंद्रदिवाकरौ इंग्लंडच्या पारतंत्र्यांत रहावा हीच प्रत्येक इंग्रजाची इच्छा असल्यामुळें त्याकरितांच प्रत्येक इंग्रज अधिकार्याची धडपड प्रातांप्रातातील दळणवळण वाढण्यास सोइस्कर अशा धोरणानें रेल्वे बांधल्या गेल्यास हिंदुस्थानास ब्रिटिश सत्तेविरूध्द बंड करणें सोपें होईल, ही मनांत भीति, व हिंदी लोकांच्या राजनिष्ठेबद्दल सतत साशंक वृत्ति या गोष्टी इंग्रज अधिकारी तोंडानें कबूल न करोत पण नुकत्याच जिंकलेला अवाढव्य हिंदुस्थानबद्दल वरील प्रकारची भीति इंग्रजानां वाटणें साहाजिक आहे. ही भीति नाहींशीं होण्याकरितां ब्रिटिश राज्यपध्दति व पाश्चात्य सुधारणा यांबद्दल हिंदी लोकांत प्रेमादर उत्पन्न व्हावा अशी त्यांनीं खटपट केली. पण या उपायानें हिंदुस्थान व ब्रिटिश साम्राज्य यांचा संबंध दृढ होऊन चिरकाल नांदेल ही गोष्ट कोणाला फारशी पटलेली दिसत नाहीं. हा प्रश्न जितक्या सविस्तर रीतीनें लोकापुढें मांडावयास पाहीजे तितका मांडला गेला नाहीं. वास्तविक पाहतां हा संबंध कायम टिकणें जरूर आहे व हितावहहि आहे, ही गोष्ट अनेक कारणें दाखवून सिध्द करतां येण्यासारखी आहे.
इंग्रजी वाङ्मयात सोशलिझम विरूध्द इंडिव्हिज्युअलिझम असा वैरूध्दयन्यास माडलेला सापडतो तर त्या दोन्ही संप्रदायाचें तात्विक स्वरूप काय याचें विवेचन, आणि सोशिलिझम हिंदुस्थानाला कितपत ग्राह्य आहे याचा विचार डॉ. केतकर यांनीं एका प्रकरणांत केला आहे.
अर्थशास्त्रीचीं तत्त्वें ठरविण्याच्या दोन परस्पर विरूध्द दृष्टी आहेत. एक दृष्टि अशी कीं, समाज हाच इष्टवर्ग समजून विचार करावयाचा. उलटपक्षीं, व्यक्ति हाच इष्टवर्ग समजून विचार करणें, ही दुंसरी दृष्टी. राजकीय अर्थशास्त्र ( पोलीटिकल इकानीमि ) हा व्यापक अर्थशास्त्राचा एक भाग असून त्यांत केवळ समाजाला सामुच्चयिक दृष्ट्या हितकारक अशा गोष्टींचा विचार प्रामुख्यानें केलेला असतो. समाजसत्ताकपध्दति ( सोशीऑलिझम ) म्हणजेच समाजहितवादी अर्थशास्त्र ( कम्यूनल इकानगीक्स ) असा अर्थ नव्हे. उलटपक्षीं, समाजसत्ताकपध्दतीच्या व्यवस्थेंत व्यक्तिश: प्रत्येक इसमाला अत्यंत फायदा मिळवून देता येईल असें धरलेलें असतें. समाजहितवादी अर्थशास्त्राला, व्यक्तिला कार्यस्वातंत्र्य असावें व व्यक्तिस्वातंत्र्यावर सरकारनें शक्य तितकें कमी नियंत्रण घालावें, हें तत्त्व मान्य आहेच. व्यक्तीचा फायदा होत असेल तर समाजाचा घात करण्यास हरकत नाहीं, असें व्यक्तित्ववादीहि म्हणत नाहीं. तात्पर्य समाजहितवादी अर्थशास्त्रात समाजाच्या हिताला प्राधान्य दिलेलें असतें, आणि व्यक्तिहितवादी अर्थशास्त्रांत व्यक्तिच्या हिताला प्राधान्य दिलेलें असतें, इतकेंच.
समाजसत्तावादात एखाद्या विशिष्ट राज्याचें चिरस्थायित्व लक्षांत घेत नाहींत, किंवा अमुक एक धर्माचा अनुयायी किंवा अमुक एक राष्ट्राचा प्रजानन या दृष्टीनें व्यक्तिचें कर्तव्य ठरविलें जात नाहीं; तर अर्थांत्पादन करणारा व उपभोग घेणारा या दृष्टीनें व्यक्तिचा विचार करण्यात येतो. कोणत्या एका व्यक्तीला कोणत्याहि दुसर्या व्यक्तिइतका वस्तूंचा उपभाग घेण्याचा हक्क आहे असें समाजसत्तावादी म्हणतो. समाजसत्ताकपध्दतींत व्यक्तिला हल्लींपेक्षा फार अधिक स्वातंत्र्य मिळेल, असें समाजसत्तावाद्याचें म्हणणें आहे व त्यांत तथ्यहि बरेंच आहे. व्यक्तिला शासनसंस्थेची जरूरी नाहीं, असें समाजसत्तावादी म्हणत नाहींत पण व्यक्तीचें सर्वांत अधिक हित साधून देतां येईल अशी शासनसंस्थेची रचना नाहीं आणि ती आपणांस धडवून आणावयाची आहे एवढेंच त्यांचे म्हणणें आहे. म्हणून समाजसत्तावाद व्यक्तित्ववाद हे परस्परविरोधी आहेत असें म्हणतां येत नाहीं. त्या दोहोंतील संबंध पुढें दिल्याप्रमाणें आहे. व्यक्तित्ववादाचें मागणें असें कीं, व्यक्तिमात्राच्या बौध्दिक शक्तींना व मानसिक भावनाना स्वतंत्र कार्यक्षेत्र भरपूर असावें हें कार्यक्षेत्र समाजसत्ताकपध्दतींतच सर्वांत अधिक मिळेल असें समाजसत्ताकपध्दतींतच सर्वांत अधिक मिळेल असें समाजसत्तावाद्याचें म्हणणें आहे. उलटपक्षीं व्यक्तिमात्रांतील स्पर्धेला पूर्ण मोकळीक दिल्यानें तें साधेल, अशी व्यक्तित्ववाद्याची समजुत आहे. म्हणून व्यक्तित्ववाद्याच्या दृष्टीनें चालू समाजरचनेंत मुळींच फरक करावयास नको आहे, उलट समाजसत्तावाद्याचें ध्येय साधण्याकरता समाजरचनेंत फार महत्त्वाचे फेरफार केलेच पाहिजेत. उदाहरणार्थ, सर्व संपत्ति सर्वांना सारखी उपभोग घेता यावी म्हणून समाजसत्ताक करणें जरूर आहे. ही एकच गोष्ट करावयाची म्हटली तर समाजव्यवस्थेंत भयंकर फरक होणार. उदाहरणार्थ, समाजसत्ताकपध्दतींत हल्लींचीं विवाहबंधनें फार शिथिल होतील. संपत्तींचा उपभोग सर्वांना सारखा द्यावयाचा म्हटल्यास बेकायदा संततीच्या वारसाहक्कास बाध असतों कामा नये. म्हणजे विवाहाच्या व विवाहबाह्य संततीस वारसा सारखाच राहणार. असें झाल्यास विवाहबाह्य संततीवर घेतला जाणारा नैतिक आक्षेप त्या मानानें कमजोर होणार, म्हणजे वैवाहिक संबंध जोडण्याची आवश्यकता कमी होणार. शिवाय प्रत्येक स्त्री द्रव्यार्जन करण्यास समर्थ झाल्यानें व तिला समाजाचा आधार असल्यानें ती पुरूषावर अवलंबून राहण्याचें कारण उरणार नाहीं, व त्यामुळेंहि वैवाहिक बंधनें शिथिल होणार.
समाजसत्तापध्दति अमलांत राहण्यास ती सर्व जगभर स्थापन झाली पाहिजे. तरच ती टिकाऊ होईल. कारण एका देशांत ती पध्दति चालू झाली तरी त्याचा स्पर्धा संबंध व्यापार, उद्योगधंदे वगैरे कारणांनीं इतर समाजांशीं येणार व त्यामुळें एकट्याच देशाला त्या पध्दतीचा अवलंब करणें अशक्य होईल. स्पर्धंत जें समाजस्वरूप जय देईल तेंच देशांत टिकलें.
समाजसत्ताकपध्दति व व्यक्तिस्वातंत्र्यपध्दति यांत राजकीय दृष्टया भेद नसून मुख्यत: संपत्तीच्या वाटणीसंबंधाचा दोहोंत फरक आहे. अर्थांत् समाजसत्तापध्दति व्यक्तित्वादाला विघातक नसून उलट ती त्याची पुरस्कर्ती आहे; व त्या मानानें ती समाजहितवादी अर्थशास्त्राचें उच्चाटन करणारी आहे.
अशा या समाजसत्ताकपध्दतीसंबंधानें कोणतें धोरण हिंदवासीयांस हितावह होईल त्याचा आतां विचार करूं. हा विचार दोन प्रकारें करतां येईल. समाजसत्तावाद्यांनीं सुचविलेल्या गोष्टींपैकीं कांहीं उपयोगी पडणार्या तेवढ्याच गोष्टी हिंदुस्थानांत सुरू कराव्या असें म्हटल्यास तें इष्ट आहे व शक्यहि आहे. उदाहरणार्थ, रेल्वे, पोष्टखातें वगैरे सार्वजनिक हितसंबंधाच्या गोष्टींवर सरकारची मालकी रहाणें ही गोष्ट हिंदुस्थानालाहि फायद्याचीच आहे. अशा तर्हेच्या पुष्कळ गोष्टी समाजसत्तावद्यांपासून घेण्यासारख्या आहेत. परंतु समाजसत्तावाद्यांचें प्रत्येक तत्त्व इष्टातानिष्टतेचा विचार न करतां हिंदुस्थाननें स्वीकारणें मात्र धोक्याचें आहे. समाजसत्ताकपध्दति सर्वस्वीं आपल्या देशांत सुरू करण्याचा विचार वेडगळपणाचा व घातक होईल. खुद्द यूरोपांतील किंवा
अमेरिकेंतील पुढारलेल्या देशांत सुध्दां समाजसत्तापध्दति पूर्णपणें चालूं होण्याचा काल अद्याप फारच दूर आहे. मग हिंदुस्थानासंबंधानें विचार त्याहूनहि नंतरचा समाजसत्तावाद्याचें ध्येय पूर्णपणें अमलात येण्यास, सर्व जग मिळून एकच देश इतकी बंधुभावाची व्यापक भावना मनुष्यजातींत उत्पन्न झाली पाहिजे. व्यापारविषयक स्थानिक म्हणजे देशादेशातील स्पर्धा लयास गेलीं पाहिजे. विशिष्ट समाज, विशिष्ट देश व तत्संबंधीचा अभिमान व उन्नत्याकाक्षा वगैरे भावना लोकात जागृत आहेत तोंपर्यंत समाजसत्तावाद्याचीं तत्त्वे आपआपल्या फायद्यापुरतींच देश किंवा राष्ट्रें स्वीकारणार हें उघड आहे.
शिवाय समाजसत्तावाद्याची बरीचशी तत्त्वे मजूर वर्गाच्याच फायद्याची आहेत. हा मजुर वर्ग तर हिंदुस्थानांत अद्याप फारच अज्ञानी व मागासलेला आहे. येथें सुशिक्षित अशा धनिक लोकांची सुध्दा एक जुट अद्याप झालेली नाहीं. मग मजुर वर्ग सज्ञान होऊन त्याची एकी होण्याचा काल फारच दूर आहे. या मार्गांत भाषा, धर्म, जातिभेद वगैरे अनेक मोठाल्या अडचणी आहेत. आणखी गोष्ट अशी कीं, हल्लीं हिंदुस्थानांत उद्योगधंद्याची वाढ झपाट्यानें पाहिजे आहे. अशा वेळीं मजूरवर्गाची सुधारणा जितकी उद्योगधंद्याच्या वाढीनेंच होईल तितकी वाटणीं करता भाडत बसल्यानें होणार नाहीं. शहराबाहेर खेड्यात पाहिलें तर अद्याप उद्योगधंदे लहान प्रमाणावरच चालू असल्यामुळें मजुर व भांडवलवाले अशा भेद उत्पन्न झालेलाच नाहीं. या अनेक कारणांस्तव उत्पादनविषयक समाजसत्ताकपध्दतींत सरकारच्या हातात अधिकाधिक सत्ता जात असते, आणि हिंदुस्थानांत अद्याप बहुतेक सत्ता परकीय सरकारच्या हातीं असल्यामुळें समाजसत्तावादाप्रमाणें काहीं कांहीं गोष्टी करण्याला सागणें म्हणजे जनतेचें जीवित परक्या लोकांच्या तावडींत अधिकाधिक देणें होईल. म्हणजे लोकांच्या दु:खांत भर घालण्यासारखेंच आहे. म्हणून प्रथम संपूर्ण स्वायत्तता मिळविणें, हेंच अर्थशास्त्रीय कर्तव्य आहे.
भारतीय अर्थशास्त्राच्या भवितव्याविषयीं विचार करूं लागलों म्हणजे अनेक प्रश्नांकडे लक्ष द्यावें लागतें. भारतीय आर्थिक स्वायत्ताता राजकीय दृष्टीनें जरी प्राप्त झाली तरी सध्यांच्या मागसलेल्या आर्थिक स्थितीमुळें खरी स्वायत्तत्ता बराच काळपर्यंत प्राप्त होणार नाहीं व यामुळें भावी कार्यक्रम आपणांस काय आहे याचा थोडक्यांत विचार केला पाहिजे. देशांतील भांडवल एकदम वाढत नसतें. हा देश असा आहे कीं, येथें अर्थोत्पादनास नैसर्गिक साधनें पुष्कळ आहेत, तथापि त्या साधनांची प्राप्ति करून घेण्यास भांडवल व उच्च प्रकारचे मजूर या गोष्टी देशांत पाहिजेत पण त्या एकदम उत्पन्न कशा होणार ? इंग्लंडसारख्या देशांचें भांडवल इकडे ओढल्याखेरीज आपल्या आर्थिक आयुष्याची वाढ होणार नाहीं. परदेशाचें भांडवल येथें ओढलें जाण्यास येथील लोकांच्या व्यावहारिक कर्तृत्वाविषयीं इतका विश्वास वाढला पाहिजे कीं परदेशी भांडवलास इकडे येण्यांत धोका नाहीं, मुद्दल अगदीं सुरक्षित राहील आणि परक्या मनुष्यास ( त्याच्या देशांतल्या ऐवजीं ) येथें पैसा पेरला तर अधिक प्राप्ति होईल असें वाटेल. देशांत राज्यतंत्र स्वायत्त झालें तर त्याचा जगातील रोकड बाजारावर काय परिणाम होईल याचा विचार आपणांस करावाच लागेल.
भांडवलाकरतां मागणी करणारा कराखानदार आपल्या व्यवहाराच्या अंतर्व्यवस्थेंत हात न घालणारा सावकार पहातो, त्याप्रमाणे राज्यतंत्रहि बाहेरची रक्कम ओढतानां ज्याच्या योगानें स्वातंत्र्यनाश होणार नाहीं याबद्दल खटपटत राहणार, हें उघड आहे. पण उलटपक्षीं सावकार असें पहाणार की जर आपली रक्कम वसूल करता आली नाहीं तर ज्या उत्पादनसाधनाला रक्कम द्यावयाची त्या साधनावर आपणांस अधिकार उत्पन्न व्हावा. या मनोवृत्तीमुळें देणेदार राष्ट्रांचें स्वतंत्र्य जाण्यास परकीय भांडवल कारण झालें आहे. सावकाराला धंदा करावयास नको असतो पण त्याचा धंदा करणार्यावर विश्वास पटावा लागतो. तर येथील सरकार लोकसत्तानुवर्ती जरी झालें तरी त्याची सावकारास खात्री वाटावी इतके तें व्यवस्थित रीतीनें राज्य करीत असलें पाहीजे.
येथें इंग्लंडमधील भांडवल जितक्या लौकर येईल तितक्या लौकर इतर ठिकाणचें येणार नाहीं. आपलें तर परकी भांडवलाशिवाय चालणार नाहीं. आणि इंग्लंडमध्ये जर राष्ट्रीय अर्थशास्त्राऐवजीं साम्राज्यीय अर्थशास्त्राचा विकास होऊ लागला तरच तें इकडे येणार, त्यामुळें इंग्लंडचें जें साम्राज्यीय अर्थशास्त्र असेल त्याचा विचार करणें आपणांस प्राप्त होतें. त्यांच्या साम्राज्यीय अर्थशास्त्रांत हिंदुस्थानच्या हितास विरोधी अशा ज्या बाबी असतील त्या आपणांस नीट तपासून आपलें हित इंग्लंडच्या रोकडबाजारांत मांडलें पाहिजे, आणि हिंदुस्थान व साम्राज्य यांचे आर्थिक संबंध उभयतासहि हितावह कसे होत जातील हें पहावें लागेल. यासाठीं हिंदुस्थानांतील आर्थिक आयुष्यावर परिणाम घडवूं इच्छिणारे जे कर्ते पुरूष उत्पन्न होतील. त्यांचें कार्यक्षेत्र मुंबई व कलकत्ता हीं न राहतां लंडन व लिव्हरपूल हीं होतील.
हिंदुस्थानामध्यें सर्व प्रकारचा माल व्हावा आणि तो मुबलक व्हावा, आणि जुन्या अत्यंत महाग अशा उत्पादनपध्दती बंद होऊन अर्वाचीन पध्दतीनें उत्पादन व्हावें हें ध्येय साधण्यास येथील उद्योगधंद्याची पध्दतशीर मोजणी उर्फ सेन्सस झाली पाहिजे. देशांत आज यांत्रिक शक्ति किती आहे आणि गरजा काय आहेत आणि त्या गरजांचें उत्पादन होण्यास देशांतील यांत्रिक शक्ति किती वाढवावी लागेल इत्यादि गोष्टींसंबंधानें पध्दतशीर योजना येथील सरकरापाशीं तयार पाहिजेत. आणि तें आर्थिक ध्येय साध्य करून घेण्यासाठीं इंग्लंडातील यंत्राच्या कारखानदारांनां विश्वासांत घेतलें पाहिजे. इंग्लंडसारख्या देशांतील कारगिरांशीं स्पर्धेचा आणि सहकार्याचा संबंध आल्याशिवाय येथील कारागिरी सुधारणार नाहीं. यासाठीं तेथील कारागिरांनीं इकडे येणें व इकडच्या कारागिरांनीं तिकडे जाणें हे सुलभ झालें पाहिजे. आज परदेशगमन हें केवळ श्रीमंतांसच शक्य आहे; गरीबांस नाहीं. उत्पादनांत गुंतलेल्या लोकांच्या परदेशगमनाशिवाय देशाच्या मजूरवर्गाची खरी सुधारणा होणार नाहीं, संरक्षक व्यापारपध्दतीचा हेतू गचाळपणें काम करणार्यांस उत्तेजन देण्याचा कधींहि नसाव. असो.
भारतीय अर्थशास्त्रा वरील ग्रंथ. - याविषयीं माहिती येथें अत्यंत त्रोटकपणानें देतों. प्रो. काळे, डॉ.केतकर, बानर्जी, प्रो. शहा इत्यादिकांची पुस्तकें उपयुक्त आहेत. प्रो. काळे यांनीं आपल्या ग्रंथांत अनेक विषयासंबंधने जें वाङ्मय दिलें आहे त्यांतील मुख्य ग्रंथ येणेंप्रमाणें.
ना. गोखले, ग. व्यं. जोशी यांची भाषणें. रिपोर्ट ऑन दि अँडमिनिस्ट्रेशन ऑफ दि बाँबे प्रेसिडेन्सी. अँल्स्टन-एले-मेंट्स ऑफ इंडियन टॅक्सेशन. बेडन पॉवेल-लँड रेव्हेन्यू इन ब्रिटिश इंडिया. दत्त-लेटर्स ऑन लँड रेव्हेन्यू इन इंडिया. प्रो. काळे-इंडियन अँडमिनिस्ट्रेशन, इंडियन एकॉनॉमिक्स व इंडियाज वार फॉयनन्स. लव्हडे-हिस्टरी अँड एकॉनॉमिक्स ऑफ इंडियन फायनॅन्स. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाज रेझोल्यूशन ऑन लँड रेव्हेन्यू पॉलिसी. फॅमिन कमिशनचे रिपोर्ट. इरिगेशन कमिशनचे अहवाल-ऐचिसन आणि इस्लिंग्टन कमिशन ऑन पब्लिक सर्व्हिसेस व वेल्बी कमिशन यांचे रिपोर्ट डीकिन-इरिगेटेड इंडिया. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रेझोल्यूशन ऑन एज्युकेशन, सॅनिटरी पॉलिसी, लोकलसेल्फ गव्हर्नमेंट.
[ या लेखांतील “मराठ्यांचे अर्थशास्त्र” हा भाग रा. स. वा. देशपांडे ( उपसंपादक ज्ञानकोश ) यांनीं लिहिला आहे आणि यूरोपीय अर्थशास्त्राच्या अर्वाचीन इतिहासांतील ऐतिहासिक संप्रदायापूर्वीचा भाग प्रा. वा. ना. गाडबाल यांनीं लिहिला आहे. ]
Comments
Post a Comment