हर्ष (६०६-६४७):
हर्ष (६०६-६४७):- ठाणेश्वरच्या वर्धन घराण्यांतील एक प्रसिद्ध राजा व चक्रवर्ती. प्रभाकरवर्धनाचा हा दुसरा मुलगा होय. वयाच्या १६ व्या वर्षी याला राज्यपद प्राप्त झालें व त्यानंतर त्यानें भरतखंड पादाक्रांत करण्याच्या निमित्तानें दिग्विजय आरंभला. अवघ्या सहा वर्षांच्या आंत त्यानें उत्तर हिदुंस्थानातील बहुतेक मुलुख जिंकिला, परंतु दक्षिणेस चालुक्या सम्राट पुलकेशीबरोबर झालेल्या युद्धांत त्याचा पराजय झाल्यामुळें दक्षिण हिंदुस्थान जिंकण्याच्या कामीं त्याला यश आलें नाहीं. तथापि त्यानें गुजराथेंतील बलभीच्या ध्रुवसेनाचा पराभव करून तेथेपर्यंत आपली सत्ता स्थापन केली. ६४३ साली त्यानें बंगालच्या उपसागरावरील गंजमच्या राज्यावर स्वारी करून विजय संपादन केला. ६४७ साली तो मरण पावला. हर्ष हा केवळ राजा या नात्यानेंच प्रसिद्ध नसून विद्वत्तेबद्दलहि तो प्रसिद्ध आहे. त्यानें रत्नावली प्रियदर्शिका व नागानंद ही नाटकें लिहिली. त्याच्या पदरी बाण, मयूर व दिवाकर मातंग असे प्रसिद्ध पंडित होते. त्याच्यावर आयुष्याच्या शेवटीं शेवटीं बौद्ध धर्माचा पगडा बराच बसला होता. तथापि त्यानें बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती असें दिसत नाहीं. सर्व धर्माच्या अनुयायांनां त्यानें चांगल्या रीतीनें वागविलें. त्यानें राज्याची व्यवस्थाहि उत्तम प्रकारें ठेविली होती. ह्युएनत्संग हा प्रसिद्ध चिनी प्रवासी याच्याच कारकीर्दीत हिंदुस्थानांत आला होता व हर्षासंबंधीची माहिती त्यानें आपल्या प्रवासवृत्तांत लिहून ठेविली आहे. हर्ष हा अत्यंत उदार राजा होता. दर पांच वर्षांनी अखिल हिंदुस्थानांतील पंडितांची धर्मपरिषद बोलावून तो आपल्या खजिन्यांतील सर्व द्रव्य वांटून टाकीत असें, असें ह्युएनत्संगानें म्हटलें आहे. (ज्ञानकोश खंड ९, पानें ३२२-३२७ पहा).
Comments
Post a Comment